आजी-आजोबा जन नेक्स्ट

फोनच्या तारा आणि आठवणीचे मुलायम रेशीम धागे यांनी जपलेला नातेसंबंध! सातासमुद्रापलीकडे असणारा, वर्षातून एकदा भेटणारा आमचा नातू कुश आणि त्या भेटीतून आठवणींचे कण न् कण गोळा करुन त्यावर रमणारे आम्ही त्याचे आजी-आजोबा!

मी कुशाला प्रथम पाहिलं. पाहिलं म्हणजे प्रत्यक्ष पाहिलं, स्पर्श केला, तेव्हा तो आठ महिन्याचा होता. २२ जुलै (भारतातील २३) १९९९ चा त्याचा जन्म. आम्हाला फोनवरुन ही बातमी कळताच आपण त्याला केव्हा एकदा पाहतो असं झालं होतं. पण २४ तासांच्या आत हॉस्पीटलच्या वेबसाईटवर आम्ही त्या १ दिवसाच्या बाळाला पाहिलं आणि मन अत्यानंदानं भरुन आलं

आठ महिन्यांच्या बाळाला आई कळते, ओळख लागते त्यामुळे तो आपल्याकडे येईल का? महिनाभर इथे राहणार मग त्यातले किती दिवस आपल्या वाटयाला येणार अशा शंका तो येण्यापूर्वी छळत होत्या. पण तो आला, त्याला पाहिलं आणि सा-या शंका दूर पळाल्या. त्याला ओळख लागत नव्हती. कोणाकडेही जायचा तेवढाच आनंदी. त्यामुळे त्याच्याशी खेळणं हा एक छान विरंगुळा झाला. त्याच्या जन्माच्यावेळी अंजुचे म्हणजे माझ्या सुनेचे आई – वडील तिकडे गेले होते त्यामुळे तिने देखील ‘कुश’ला आमच्याकडे जास्त राहू दिलं.
कुश आमचा नातू होता पण त्याचे अजून आम्ही आजी-आजोबा नव्हतोच. त्याच्या दृष्टीने आम्ही इतरजनच ! आठ महिन्यांच्या मुलाला आणखी काय कळणार ? भारतातल्या सर्व नातेवाईकांना भेटवण्यासाठी त्याला पार मथुरेपासून ते रत्नागिरीपर्यंत इतका फिरवला (आजही नाही नाही म्हणत आम्ही तेच करतो) की त्या एवढयाशा बाळावर हवापाणी बदलाचे आपण अत्याचार करतो आहोत हे ध्यानीही आले नाही. खरंतर ध्यानात न आणून देण्याची कृपा भगवंताने केली. साधा सर्दी खोकलाही नाही. डास चावल्याच्या भरपूर खुणा मात्र होत्या. बघता बघता महिना भुर्रकन उडून गेला. त्याची पुढची भेट केव्हा होणार? त्यावेळी तो मोठा झालेला असेल. आपल्याला ओळखेल कां? पुन्हा घालमेल.

माझ्या मुलानं यावर छान तोडगा सुचवला. कुशला दरवर्षी आजी-आजोबा भेट घडविण्यासाठी त्या दोघांनी आळीपाळीने भारतात यायचं. तिघं एकावेळी भेटणार नाहीत याचं दु:ख कुश लवकर भेटणार या स्वार्थाने बाजूला सारलं. तेवढंच समाधान.

त्यानंतर कुश आला १॥ वर्षाने. आता तो जवळजवळ २॥ वर्षाचा होता. थोडं थोडं बोलायला लागला होता. बाबा बरोबर एकटा येणार होता. मला परत काळजी वाटू लागली. इथे येऊन त्यानं आईकडे जायचा हट्ट धरला तर ! निमिषला म्हणजे माझ्या मुलाला ट्रीप अर्धवट टाकून जावं लागेल काय? पुन्हा शंका. खरंतर तो यायचा आहे हे कळल्यानंतर ”आम्ही तुझी वाट बघतो आहोत’ असं फोनवर म्हटल्यानंतर त्याने निमिषला अतिशय आश्चर्याने ‘भारतात माझी वाट बघताहेत’ असं म्हटलेंल मला फोनवर ऐकू आलं होतं. म्हणजे आम्ही सर्व एकमेकांना भेटण्यास आतुर होतो. विमानतळावर बाहेर आल्याआल्या कुशने आम्हा दोघांनाही इतकी घट्ट मिठी मारली की, सा-या शंका कुठच्याकुठं पळाल्या. कित्येक जन्माची ओळख असल्यासारखा चिटकून बसला.

तो संपूर्ण महिना खूप छान गेला त्यांची प्रत्येक आवड-निवड पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही दोघांनीही केला. डबलडेकर, लोकल (मुंबईमध्ये) रिक्षा व माझी सनी ही त्यांची आवडती वाहने. कार अजिबात आवडायची नाही. आता तो बोलू लागला होता. आजोबांना बाबा आणि मला ग्रँडमा म्हणू लागला होता. खाण्यापिण्यात फारसा रस नव्हता, पण दंगा, गोष्टी ऐकणं, स्वत: रचून काहीतरी सांगणं हे आवडीचे उद्योग! मुलं किती समजूतदार असू शकतात याचं तो उत्तम उदाहरण होता. पहिल्या दिवशी त्याला आईची खूप आठवण आली आणि तो थोडा रडवेला झाला. निमिषनं त्याला आईकडे जाणं किती अवघड आहे हे इतक छान समजावून सांगितलं की नंतरच्या महिनाभरात तो कधीच आठवणीने व्याकुळलेला दिसला नाही. उलट अंजूचा जेव्हा फोन आला आणि ‘तुझी आठवण येते’ असं ती म्हणाली तेव्हा तिकडे येणं कसं अवघड आहे हे त्यानं तिला समजावले.

रात्रीची जेवणं झाली की तो झोपायला आमच्याकडे येई; कारण ग्रँडमाकडून त्याला, चिऊ-काऊ आणि ससा-कासवाच्या गोष्टी ऐकायच्या असत. जेवणानंतर निमिषनं त्याला नाईट ड्रेस चढविला की ‘स्टोरीटाईम’ ‘स्टोरीटाईम’ असं तो तालावर म्हणू लागायचा. मी त्याला माझं स्वयंपाकघरातील काम आवरून येते म्हटलं की तो शांतपणे माझं काम संपायची वाट पाहत थांबायचा आणि गोष्टीची वसुली करूनच झोपी जायचा, तो अमेरिकेला गेल्यानंतर त्याच्या बेबीसीटर बाई तो आता आपली जास्त काळजी घेतो असं म्हणाली. तिला त्यानं आजी केलं.

त्यानंतर त्याच्या एकदा आई तर एकदा बाबा यांच्याबरोबर आणखी दोन फे-या झाल्या. आता आमच्यातला नातेसंबंध खूपच घट्ट झाला आहे. प्रत्येक भेटीगणिक त्याची मानसिक जडणघडण आम्हाला जास्तच आनंद देऊन जाते. त्याला फोनवर बोलायला जास्त आवडत नाही. एकतर त्याचे इंग्रजी उच्चार आम्हाला पटकन कळत नाहीत, त्यामुळे कधीमधी निमिषला दुभाष्याचे काम करावे लागते ते कुशला आवडत नाही. आता तो साडेपाच वर्षाचा झाला आहे.

त्याच्या प्रत्येक ट्रीपला त्याचे संवाद त्याच्या नकळत आम्ही टेप करून ठेवतो. तो परत जातो तेव्हा या टेप्स आणि फोटोग्राफ्स् हेच आमचं आनंदनिधान असतं. या ट्रीपनंतर आजोबांनी कुशला एक पत्र पाठवलं त्याला पत्र वाचतां येत नाही. पण निमिषने त्याला जेव्हा वाचून दाखवले तेव्हा त्याचे डोळे भरून आले, आणि त्यानं ह्या पत्राची २/३ पारायणं करायला लावली.

त्याला आमच्याविषयी, आमच्या घराविषयी खूप प्रेम आहे. पण भारत देशाविषयी तो साशंक आहे. अजून तो लहान आहे. नाशिकविषयी किंवा भारताविषयी त्याला प्रेम वाटावं अशी आम्ही अपेक्षा करणं हा मूर्खपणा आहे. त्याचं बालमन आजूबाजूच्या वातावरणाचा वेध घेत असणार, त्याचे अर्थ तो आपल्या कुवतीनुसार लावणार, तिकडच्या वातावरणाशी नकळत का होईना (त्यानं तसं कधीच बोलून दाखविलं नाही) तुलना करीत असणार. घराच्या आजूबाजूला, रस्त्यावर, बागेत असणारा केरकचरा, बागेत खेळणा-या मुलांचा दंगा, बेशिस्त या गोष्टी त्याच्यासाठी नविन आहेत. घसरगुंडीवर पुढून पण मुलं चढतात, वर चढताना धक्काबुक्की करून पुढे घुसतात, रस्त्यावर गायी, म्हैशी, कुत्री नुसती फिरतच नाहीत, तर शी-सुध्दा करतात. या गोष्टीचं आश्चर्य त्याच्या चेह-यावर स्पष्ट दिसते.

पण मला खात्री आहे तो जसजसा मोठा होईल तसतसा त्याला हे भारतीय वातावरण खचितच आवडू लागेल. आताही परत जाताना विमानतळावर त्याचे डोळे भरून येतात. हे कोणाच्या लक्षात येऊ नये असा त्याचा प्रयत्न असतो. भौगोलिकदृष्टया आम्ही कितीही दूर असलो तरी भावनिकदृष्टया आम्ही खूप जवळ आहोत आणि याचे सारे श्रेय मी माझा मुलगा निमिष व सून अंजू यांना देते.
या एक महिन्याच्या वास्तव्यात तो आम्हाला इतकं काही देऊन जातो की आम्ही १०/१२ वर्षांनी लहान होतो. त्याच्या सर्व आठवणी पुरवून पुरवून वापरतो. पुढच्या ट्रीपपर्यंत…! मधल्या काळात परिसरातील सर्व नातवंडाचे आजी-आजोबा होतो.

आमच्या घराला लागून महानगरपालिकेची बाग (म्हणजे मोकळी जागा) आहे. त्याबरोबर लावलेले झोपाळे घराच्या अगदी जवळ आहेत. तिथे येणारी मुले तर हक्काने आम्हाला आजी-आजोबा बनवतात. त्यांची आपापसातील भांडणे सोडविण्यासाठी हाका मारून बोलावतात. झोपाळयावर बसण्यासाठी भांडणे होऊ नयेत म्हणून प्रत्येकाने १०० झोक्यानंतर दुस-याला बसू द्यायचे अशी शिस्त घालून दिली आहे. त्या निम्मित्ताने अंक मोजण्याचा त्यांचा अभ्यास होतो. झोके घेतांना सिनेमातली गाणी म्हणायची नाहीत, कविता म्हणायच्या असाही दंडक घालून दिलेला आहे. शिवाय महिना दोन महिन्यातून एकदा सुट्टीच्या दिवशी आम्ही सर्व मिळून झोपाळयाच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करतो. कारण महापालिका या जागेकडे ढुंकूनही बघत नाही, रहिवाशी त्या जागेचा कचराकुंडी म्हणून उपयोग करतात. वाढणा-या बोरी-बाभळी व पावसाळयात वाढणारे गाजर गवत आमच्या या नातवंडासाठी त्रासदायक ठरते.

एकूणच काय उतारवयात आजी-आजोबा या नात्याचा मान मिळणं, मग नातवंडे कुठली का असेनात, यासारख्या अवर्णनीय आनंद व विरंगुळा नाही..!

– सौ. स्मिता खानोलकर
‘गावकरी – प्रतिमाच्या सौजन्याने