संस्कृती व संवर्धन

संस्कृती म्हणजे चांगले जीवन जगण्याचा मार्ग. माणूस जगाच्या पाठीवर वेगवेगळया प्रदेशात वस्ती करुन स्थिरावला. तेथील निसर्गाशी मिळते जुळते घेऊन त्याने स्वत:चे व आपल्या भोवती असलेल्या इतर माणसांचे जीवन चांगले सफल व समृध्द करण्यासाठी काही जीवनपध्दती आचरणात आणल्या. अशा सु-आचार पध्दतींचा संच म्हणजेच संस्कृती ! उदाहणार्थ थंड हवामानाच्या देशांत सर्व इमारतींचे, दुकानांचे, कार्यालयांचे दरवाजे स्प्रिंगमुळे लगेच बंद होतात. आपण दरवाजा उघडून आत आल्यावर ते दार मागील माणसावर आदळू नये म्हणून पाश्चात्य जगात बहुतेक माणसे दरवाजा उघडून प्रवेश करतात व मागील माणसासाठी तो धरुन ठेवतात. उष्ण प्रदेशांत बाहेरुन आलेल्या व्यक्तीला प्रथम ‘पाणी हवे का’ असे विचारतात. ही संस्कृतीची काही उदाहरणे.

दुस-या संस्कृतीमधून आपण जरुर चांगले आचारविचार घ्यावेत; फक्त हे करताना एक पथ्य पाळले पाहिजे की आपल्या संस्कृतीत ते नाही म्हणून आपल्या संस्कृतीची निंदा, थट्टा करु नये. कारण आपल्याच संस्कृतीची थट्टा/ निंदा म्हणजे तो आपल्या संस्कृतीचा एक भाग असे आपण इतरांना दाखवून देतो.

भाषा हे आपले आचारविचार प्रकट करण्याचे एक साधन आहे. आपल्या भाषेमध्ये कमीपण वाटण्याचे काहीच कारण नाही इतर भाषा जरुर आत्मसात कराव्यात, कारण यामुळे ती भाषा वापरणाऱ्या संस्कृतीची, तिच्या चांगल्या आचारपध्दतींची माहिती मिळेल. पण आपली मातृभाषा वापरलीच पाहिजे, अन्यथा आपणच आपल्या संस्कृतीची अवहेलना करतो असे होईल.

धर्म व संस्कृती या संपूर्णपणे भिन्न गोष्टी आहेत. ‘धर्म पाळणे म्हणजे सुसंस्कृतपणा’ व सुसंस्कृत माणूस धर्माचे काटेकोर आचरण करतो’ हे केवळ गैरसमज आहेत. जसे भाषेचे आहे तसेच धर्माचे. आपल्या धर्माचा सार्थ अभिमान जरुर असावा, पण त्यासाठी दुसऱ्या धर्मास कमी लेखणे गैर आहे.

वरील पार्श्वभूमीवर आता आपण बघूया की दुसऱ्या संस्कृतीमधून आपणाला काही घेता येईल का – व काय? माणूस म्हणून त्याच्या जीवाची किम्मत : प्रगत देशांत माणसाच्या जीवाचा योग्य आदर केला जातो. आपल्याकडे याचा फारच अभाव जाणवतो. उदा – भ्रष्टाचार, लाचखोरी करताना त्यांच्या परिणामांकडे दुर्लक्ष करणे हे त्यांमुळे होणाऱ्या माणसांच्या नुकसानाला किम्मत न देण्यासारखेच आहे. आपल्या सभोवतालच्या माणसांची किम्मत त्यांच्या अर्थार्जनाच्या कुवतीवरुन वा बौध्दिक क्षमतेवरुन न करणे हा एक चांगला आचार घेण्यासारखा आहे.

पोषाख : निसर्ग व हवामान हे दोन मुख्य घटक माणसांच्या पोषाखपध्दतीवर परिणाम करतात. आपले अघळपघळ पोषाख करणे कमीपणाचे नसून हवामानास अनुसरुन आहे. पण व्यवस्थित, स्वच्छ पोषाख करणे हे इतर काही संस्कृतींमधून घेण्यासारखे आहे. पाश्चात्य माणसांनी व तेथिल जाहिरात व विक्री उद्योगांनी उचलून धरल्यावर सुती /भ्त्रात्र्क्र/ कपडे घालणे व उचभ्रूपणाचे व प्रतिष्ठेचे समजले जाऊ लागले शतकानुशतके मध्य आशियात केवळ सुती कपडेच वापरले जात. पण त्यांच्याजवळ जाहिरात व विक्री करणारे उद्योग नसल्याने त्यांच्या सुती कापडाला मागासलेपणाचे लक्षण मानले गेले.

आहारसंस्कृती : आपण ग्रहण करतो ते अन्न आपल्या जगण्याचा आधार आहे. आपल्या संस्कृतीमध्ये त्याला ‘पूर्णब्रह्म’ असे म्हटले आहे. अन्न वाया घालवणे अथवा त्याची नासाडी करणे हे प्रत्यक्ष त्या पूर्णब्रह्माचा अपमान करणे आहे. अनेक संस्कृतीमध्ये समोर वाढलेले अन्न संपवणे हे आधाशीपणाचे व मागासलेपणाचे समजतात.

भारतासारख्या खंडप्राय व प्रचंड लोकसंख्येच्या देशात तर अन्न वाया घालवणे हा दखलपात्र गुन्हा ठरविण्याची वेळ आली आहे. त्यामुळे अन्न हे खरोखरच पूर्णब्रह्म मानून त्याचा आदर करणे हीच खरी संस्कृती आहे.

आहारामधील घटक : ‘अभक्ष्य भक्षण’ हा पुन्हा एकदा सभोवतालचा निसर्ग व हवामान यांच्यामुळे सुरु झालेला प्रकार आहे. मांसाहार करताना लागणारी स्वच्छता न पाळता फक्त इतर संस्कृतींचे अंधानुकरण करण्याकरता तसे करणे यासारखा मूर्खपण नाही. ज्या प्रदेशात अन्नधान्य, भाजीपाला, फळे भरपूक पिकू शकतात तेथे मांसाहाराची गरज नाही; आणि याला त्या त्या प्रदेशांतील धर्म – संस्कृती – जीवनशैली साक्षीदार आहेत. ज्या प्रदेशात पीक येणे अशक्य आहे /अतिथंड प्रदेश वगैरे / तेथे मांसाहार योग्य आहे हे समजू शकते. पण आपल्या देशाची भौगोलिक परिस्थिती पाहता हे सहज समजू शकते की आपल्या संस्कृतीत ‘अभक्ष्यभक्षण करु नका’ असे का सांगितले आहे. वर चर्चा केल्याप्रमाणे संस्कृतीचे चालीरीती, भाषा, आहार, पोषाख इत्यादी मुख्य घटक आहेत. संस्कृती समृध्द करणे म्हणजे पर्यायाने जीवन समृध्द करणे. कारण प्रारंभीच नमुद केल्याप्रमाणे संस्कृती हे जीवन समृध्द करण्याचे साधन आहे. व ही संस्कृती आपण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वारसा म्हणून सुपूर्त करतो. तेव्हा त्यात काय समाविष्ट करावे वा काय नाही हे फार विचारपूर्वक ठरवले पाहिजे.

मला नेहमी राहूनराहून खटकणारी एक गोष्ट इथे नमुद करावीशी वाटते ती म्हणजे संस्कृतीतील पध्दती, आचारविचार यांना इतरांसमोर नावे ठेवणे. व इतर संस्कृतीतील आचारविचार व पध्दती कुठल्याही विवेकाशिवाय आत्मसात करणे किंवा ते आत्मसात करण्यासाठी /केविलवाणी/ धडपड करणे. आपल्या संस्कृतीमध्ये जर खरोखरच उणीवा असतील तर त्या जरुर दुरुस्त कराव्यात, बदलाव्यात; पण म्हणून ‘माझी संस्कृती मागासलेली व खालच्या दर्जाची आहे’ असे म्हणणे हा केवळ संस्कृतीचाच अपमान नव्हे तर आपल्या जीवनदात्याचाच अवमान करण्यासारखे आहे.

ब्रिटनमध्ये जाऊन आवर्जून शेक्स्पीअरचे घर पहायला जाणा-या मराठी माणसांमध्ये मला एकही असा सापडला नाही जो आवर्जून संत ज्ञानेश्वरांचे जन्मस्थान, समाधीस्थान व गदिमांचे घर बघायला गेला आहे. जर आपण आपल्या संस्कृतीला योग्य स्थान दिले नाही तर आपण ती अपेक्षा इतरांकडून कशी करणार?

या लेखातून मला हेच सांगायचे आहे की संस्कृतीचे मुख्य आधारस्तंभ म्हणजे आचार, विचार, पोषाख, आहार व भाषा हे आहेत. यांविषयींच्या संकेतांचे पालन करुन सर्व जनसामान्यांचे जीवन समृध्द करणे व त्या संस्कृतीत कालानुरुप बदल करणे हे सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे.

आपण जेव्हा समोरील व्यक्तीला दोन्ही जोडून ‘नमस्कार’ म्हणतो, त्यावेळेस हेच सांगत असतो की तुझ्या हृदयामध्ये ईश्वर वसलेला आहे व त्याला मी वंदन, नमन करतो. आता व्यवसाय सोडून इतर ठिकाणी हा रिवाज पाळण्यास आपणांस काहीच हरकत नाही. याचा अर्थ असा नाही की हस्तांदोलन करणे अयोग्य आहे. पण नमस्कार करणे हे अर्थपूर्ण आहे व हस्तांदोलनापेक्षा कुठल्याही प्रकारे कमी दर्जाचे नाही.

एखाद्या देशी खाणावळीत जाऊन तेथील उत्तम पदार्थांचा आस्वाद लोक घेतात / उदा. वाडेश्वर, श्रेयस – पुणे, पांढरीपूल – नगर, पांढरा रस्सा – कोल्हापूर / पण मुलांना ‘ज्अउ’ मध्ये नेल्याचा पालकांना अभिमान का वाटतो हे न कळण्यासारखे आहे. या गोष्टीचा चारचौघांत उल्लेख करणे व ‘माझ्या मुलांना महिन्यातून १-२ वेळा तरी ‘मॅक’ मध्ये न्यावेच लागते’ हे सांगण्यात कौतुक व धन्यता व मोठेपणा मानणारे पालक स्वत:संस्कृतीचे संरक्षण व आचरण किती करत असतील याचीच शंका येते. मॅकच्या दुकानातील स्वच्छता, वाजवी किंम्मत व चवीतील सातत्य / आत ते किती चविष्ट वा बेचव असते हा वादाचा मुद्दा आहे/ हे घेण्यासारखे आहे.

संस्कृती आचरण, जोपासना व संवर्धन या क्रिया साखळीसारख्या आहेत. प्रथम आचरण, त्यातूनच तिचे पुढील पिढीकडे हस्तांतरण म्हणजेच जोपासना व त्यात काळानुरुप बदल – म्हणजेच संवर्धन होय.

अशा संस्कृतीसंवर्धनासाठी खालील काही आचार – विचारपध्दती आत्मसात करायला काहीच हरकत नाही. माणूस म्हणून त्याच्या जीवाची किंम्मत करणे व त्याचा आदर करणे.

स्वच्छता : सामाजिक व सार्वजनिक स्वच्छता पाळणे. प्रत्येक माणसाने स्वत:ला व सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी घेतलीच पाहिजे.

स्वयंशिस्त : स्वत:च्या फायद्यासाठी दुसऱ्याचे नुकसान व नियम व कायदे धाब्यावर बसवून आचरण करणे अयोग्य आहे. हा विषय तर शालेय स्तरावर सक्तीचा करणे आवश्यक आहे. प्रगत राष्ट्रांमध्ये तेथील माणसांच्या रक्तात स्वयंशिस्त भिनली आहे.

पोषाख : रुबाबदार पोषाख करण्याची इच्छा असणे हे मनुष्यस्वभावाला धरुनच आहे. पण सभोवतालचे हवामान, लोकांची बघण्याची दृष्टी याचे भान ठेवणे अत्यंत जरुरीचे आहे.

– श्री. रविन्द्र विष्णू गाडगीळ
मुक्काम – मिल्टन केयन्स, इंग्लंड