एक अविस्मरणीय भेट

दि. २० जुलै २००४ सकाळी नऊची वेळ मी माझ्या मित्रासोबत पुण्याच्या पर्वतीच्या पायथ्याशी असणाऱ्या श्री. बाबासाहेब पुरंदरे यांच्या घराच्या दारात पाऊल टाकल. घर तसं जुन्या घाटणीचं.
समोरील दार बंद असल्यामुळे मागच्या बाजूने चौकशी केली. एक पंचेविशीतला तरुण बाहेर आला. ‘कोण हवयं आपल्याला? ‘
‘बाबासाहेब पुरंदरे इथेच राहतात ना?’ मी
‘हो आपण कुठुन आलात?’ तरुण ‘मी भंडाऱ्याहुन आलो. यापूर्वी त्याना एक पत्र टाकलं होतं
‘ठीक आहे या त्यांची तब्बेत जरा बरी नाही. जरा सावकाश बोललात तर बरं होईल.’
‘आम्हाला त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे लगेच निघू आम्ही’ मी म्हणालो.

आम्ही आत गेलो. एखादया जुन्या पुणेरी घरात गेल्याची जाणीव झाली. दिवाणखाण्यात एका खुर्चीवर बाबासाहेब बसले होते. मी त्यांना नमस्कार केला ‘ या बसा !’ शांत आवाजात बाबासाहेब म्हणालेत त्यांनी मला बाजूला बसवून घेतलं मी माझा परिचय दिला आम्ही राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती त्यांना दिली. अगदी शांतपणे मी जे बोलत होतो ते ऐकत होते कुठे कुठे, ‘छान ! हं ! हे असंच करायला हवं’ यासारखे अभिप्राय सुध्दा देत होते माझ्या सारख्या सामान्य, अपरिचीत युवकाशी, पूर्वीचा कुठलाही परिचय नसतांना, अगदी मनमोकळे पणानं बोलणारे श्री बाबासाहेब पुरंदरे खरोखरच थोर आहेत २९ जुलै १९२२ ही बाबासाहेबांची जन्मतारीख येत्या जुलैत ते वयाची ८४ वर्षे पूर्ण करतील. परंतू आजही त्यांच्यातील जोश तेवढाच दांडगा आहे. आज त्यांचं इतकं वय असूनही त्यांची भ्रमंती सुरुच असते. आजच ते परगावाहुन सकाळी सहा वाजता परतले होते. कसलाही अहंभाव किंवा मोठेपणा मला त्यांच्यात आढळला नाही. आपुलकीनं त्यांनी चौकशी केली. पंधरावीस मिनीटांनी त्यांनी विचारलं ‘ चहा घेणार ना?’ मी असू द्या म्हणालो ‘का!’ चहाला का नाही म्हणता? अहो पहिल्यांदाच आलात तुम्ही. ‘मी आढेवेढे घेऊच शकलो नाही त्यांनी दोन टाळया वाजविल्या त्यासरशी मघाचाच तरुण पुढे येऊन म्हणाला, ‘बोला बाबासाहेब!’

‘जरा तीन चहा सांगा!’ त्याचं टाळी वाजविणं मला शिवकालीन युगात घेऊन गेलं टाळी वाजवून ‘कोण आहे रे तिकडं?’असं विचारावं त्याची आठवण झाली.

त्यांनी स्वत:बद्दल सांगितलं त्यांच्या ‘जाणता राजा’ ची सुरवात आणि आजचा ‘जाणता राजा’ या मधील घटना, काही प्रसंग सांगितले अगदी शुन्यातून विश्व उभारणे म्हणजे काय याची जाणीव क्षणाक्षणाला होत होती.

रिमांड होम मधील विद्यार्थ्याबद्दल मी त्यांना सांगत असंताना मला ते म्हणाले ‘ माझ्या जीवनातला एक अविस्मरणीय प्रसंग मी सांगतो ‘ मला खूप बरं वाटलं तो प्रसंग त्यांच्याच शब्दात ……

एक दिवस सकाळीच मला फोन आला ‘आपण बाबासाहेब पुरंदरेच ना?’ मी जेलर बोलतोय आपल्याला थोडयावेळा साठी जेल मध्ये येता येईल का?’ मी त्यांना विचारलं तेव्हा ते म्हणाले,
‘तसं काही नाही. आपण या मी सारं काही सांगतो मी आपल्यासाठी गाडी पाठवत आहे’ जेलर
क्षणभर मला कळलंच नाही मी त्यांना ‘बरं’ म्हणालो आणि फोन ठेवला मी जरा अस्वस्थ झालो एवढयात पोलीसांची गाडी आली, आणि आम्ही जेलमध्ये पोहचलो.

‘सर मी तुम्हाला त्रास दिला त्याबद्दल क्षमस्व! त्याचं काय झालं, आमच्या येथील एका कैदयानं आपल्याला भेटायची इच्छा प्रगट केली.
गंभीर आवाजात जेलर म्हणाले – ‘ बाबासाहेब, उदया सकाळी ह्या कैदयाला फाशी होणार आहे सारे सोपस्कार पूर्ण झालेले आहेत. त्याच्या नातेवाईकांना आम्ही बोलावणं पाठवलं परंतू अजूनतरी कुणी फिरकलं नाही शेवटी पुन्हा त्याला विचारंल ‘तुझी शेवटची इच्छा काय?’ तर तो म्हणतो, ‘बाबासाहेब पुरंदरेंना मला एकदा भेटायचं आहे कृपा करुन मला त्यांची एकदा भेट घालुन दया’! जेलर बोलत होते मी मात्र शहारलो होतो. कुठला कोण कैदी, मरणाच्या दारात उभा असलेला, मला का भेटू इच्छितो? मी काहीच बोललो नाही ते पाहून जेलर म्हणाले, ‘ बाबासाहेब आपली इच्छा नसेल तर काहीच हरकत नाही. त्या कैदयानं इच्छा प्रगट केली म्हणून आम्ही आमचं कर्तव्य म्हणून तुम्हाला बोलावलं. त्याला भेटायचं किंवा नाही हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे’.

मी सुन्न झालो होतो काय बोलावं मला कळेचना.
पण मी म्हणालो ‘जेलर साहेब, आपण भेटूयात त्याला’
‘थँक्यू सर ‘ जेलर म्हणाले,

आम्ही जेलरच्या कार्यालयातुन कैदयाच्या खोलीकडे निघालो मनात विचार हेच की हा कैदी कोण असावा? त्यानं मला भेटण्याची इच्छा का प्रगट करावी वैगरे वैगरे …..

कैदयाच्या खोलीपूढे येऊन आम्ही थबकलो. मी खोलीत बघितलं त्या अंधाऱ्या खोलीत एका कोपऱ्यात एक पंचविशीतला देह पडलेला होता. जेलरनं आवाज दिला तशी त्यानं बळेच मान वर केली मला पूर्ण जाणवलं तो गलीतग्रात्र झाला होता. त्याच्या हातापायात बळ नव्हतं. मला एकदम भरुन आलं. तो माझ्याकडे येण्याचा प्रयत्न करु लागला मला गहिवरुन आलं. तो हळूहळू सरकतच खोलीच्या कठडयाजवळ आला तो आत, मी बाहेर मला, काय बोलावं हे सुचेना. त्याला काय सांगावं हे कळेना. तो आशाळभूत नजरेनं माझ्याकडे बघत होता. माझ्या पायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न तो करीत होता मी घामानं चर्र झालो. मी जेलरला म्हणालो, ‘मला आत जाता येईल का?’ ‘नाही!’ करडया आवाजात जेलर माझ्यावर अक्षरश: ओरडलेच पण दुसऱ्याच क्षणी त्यांची चूक त्यांना उमगली असावी ते म्हणाले ‘ बाबासाहेब, माफ करा. तुम्हाला आत जाता येणार नाही !’ मी म्हणालो, त्याच्या समाधानासाठी तरी मला आत जाऊ द्या थोडा वेळ विचार करुन जेलरनं ते कठडयाचं दार उघडलं मी आत त्या कैदयाजवळ गेलो त्यानं माझे पाय घट्ट पकडले. तो ढसाढसा रडू लागला काय बोलावं मला कळेना मी फक्त प्रेमाने त्याच्या डोक्यावर हात ठेवला स्वत:ला आवरुन तो म्हणाला, ‘बाबासाहेब, मी चुकलो माझ्या हातून अपराध घडला मला झालेली ही फाशीची शिक्षा मान्य आहे ‘क्षणभर थांबून तो मला म्हणाला ‘ पण बाबासाहेब पुढील जन्मी मी शिवाजी महाराजांसारखा होणार आहे त्यांच्या सारखं कार्य करणार आहे. मला पुढला शिवाजी व्हायचयं! ‘
माझा उर भरुन आला मी नि:शब्द झालो मी त्याला आशिर्वाद तरी काय देणार?’

हे सांगत असतांना बाबासाहेब पुरंदरेंना भरुन आलं होतं माझ्याही डोळयातून अश्रू गळायला लागलेत एक जिवंत प्रसंग बाबासाहेब पुरंदरेंनी सांगितला. त्या कैदयाचं नाव होतं धोंडया जाधव बाबासाहेबांनी कित्येकांना घडविलं कित्येकांच्या खाण्यापिण्याचा, शिक्षणाचा भार वाहिला धर्म, जात, पथं, याला थाराच दिला नाही म्हणूनच आज ते महाराष्ट्राचे भुषण आहेत अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत त्यांच्या दिवाणखाण्यातील ते पुरस्कार त्यांच्या थोरवीची महती सांगतात.

एव्हाणा दहा वाजायला आले होते आम्ही त्यांची आज्ञा मागितली त्यांना नमस्कार केला आणि बाहेर पडलो, तो एक सुखद अनुभव घेऊनच

‘यशानं हुरळून जाऊ नका, खोटया स्तुतीला भाळून जाऊ नका, कुणाला फसवू नका, सत्याची कास धरा’ हा त्यांचा संदेश म्हणजे गुरुमंत्रच .

शिवशाहीर श्री बाबासाहेब पुरंदरेंच्या सहवासात घालविलेला तो एक तास आमच्या जीवनातील एक सुखद प्रसंग ठरला आहे.

– श्रीकांत तिजारे, भंडारा