पालकांसाठी रेड अलर्ट

कार्टून चॅनलऐवजी एम टीव्ही किंवा त्यासारखी चॅनल्स बघायला मुलांनी सुरूवात केली की, त्यांची पौडंगावस्था सुरू झाली आहे असं समजावं. एका अत्यंत तरल, उगाचच हूरहूर लावणाऱ्या अवस्थेत त्यांनी प्रवेश केलेला असतो. एका धोकादायक वळणावर ती उभी असतात.

या मुलांना लैंगिक शिक्षण द्यावं अशी चर्चा नेहमीच केली जाते. अजूनही शाळांमध्ये असं शिक्षण सक्तीचं झालेलं नाही. मग आपण आपल्या मुलांना हे शिक्षण द्यावं का? म्हणजे आपल्या पातळीवर द्यावं का? मला वाटतं याचं उत्तर होकारार्थीच द्यावं लागेल. शक्य असेल तर मुलाची आई वडिलांनी, ते शक्य नसेल तर मुलाची मावशी, आत्या, काका, शिक्षक, फॅमिली डॉक्टर यांच्या मार्फत या विषयीची शास्त्रीय माहिती मुलांपर्यंत पोहोचायला हवी. मुलीला ही माहिती स्त्रीकडून (आत्या, मावशी) तर मुलाला पुरुषामार्फत द्यायला हवी. या विषयावर अनेक पुस्तकं सध्या उपलब्ध आहेत.

हे पुस्तक देण्याआधी त्याच्याशी तिच्याशी अगदी थोडक्यात बोलावं त्यानंतर पुस्तक वाचायला देऊन जास्त बोलतं करण्याचा प्रयत्न करावा. त्यावेळेस त्याचा बोलण्याचा मुड नसेल तर तो विषय तात्पुरता थांबवून पुन्हा केव्हातरी त्याच्याशी बोलावं. हा प्रयोग शक्यतो दिवाळी#उन्हाळयाच्या सुट्टीत करावा. सर्वसाधारणपणे ज्या व्यक्तीशी त्या मुलाचे# मुलीचे जिव्हाळयाचे संबंध असतील त्या व्यक्तीने ही चर्चा करावी. अशी व्यक्ती कोण आहे हे ओळखणं हे मात्र आई-वडिलांचं (थोडया निरीक्षणाचं, कौशल्याचं) काम आहे.

ही चर्चा केव्हा-म्हणजे त्या मुलाच्या कितव्या वर्षी करावी असा प्रश्न या संदर्भात उपस्थित होऊ शकतो. मुले साधारण आठवीत असतांना ही माहिती त्यांना द्यावी असं त्या क्षेत्रातल्या तज्ञ व्यक्ती सांगतात. एकंदरीतच लैंगिक शिक्षणाच्या बाबतीत मुलांना लहान मानू नये. मुलींना अर्थातच त्यांची पहिली पाळी येण्याआगोदर या सगळया गोष्टी कळायला हव्यात. मुलामुलींना ही माहिती दिल्यानंतर ‘भविष्यातही तुला काही बोलावंसं वाटलं तर मोकळेपणानं बोल’ अस त्याला स्पष्टपणे सांगणं आवश्यक आहे. मुलानं आपल्याशी बोलतांना संकोच बाळगू नये यासाठीची वातावरण निर्मिती करणं हे मात्र दीर्घकाळ चालणारं काम आहे.

थोडक्यात, मुला-मुलींना या सगळया गोष्टी आपोआप समजतील अशा वेडगळ समजुतीत न रहाता त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न आवश्यक आहे. यानिमित्तानं, इंटरनेट-मोबईल आणि सीडी या मार्गानं लैंगिकतेचा जो प्रसार होत आहे त्याही बद्दल पालकांनी जागरूक राहणं आवश्यक आहे.

आजूबाजूला काय घडतं आहे, काय उपलब्ध आहे आणि ते किती सहजपणे मिळतं आहे याचं भान असू द्यावं अजून एक महत्वाची गोष्ट. ‘आपण आपल्या पाल्यावर खूप चांगले संस्कार केले आहेत. त्यामुळे तो बिघडणं शक्यच नाही.’ अशा भ्रमात आपण राहू नये. कारण आजूबाजूचं वातावरण झपाटयाने प्रदूषित होत आहे.

संस्कार निष्प्रभ करण्याची क्षमता या आजूबाजूच्या वातावरणात आहे याचं भान पालकांनी ठेवणं फारच आवश्यक आहे.

आपल्या पाल्यांना योग्य मार्गावर ठेवण्यासाठी पालकांना मुलांना ‘वेळ देण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आपण पैसा कमावण्याच्या नादात आपल्या मुलांकडे दुर्लक्ष तर करत नाही ना याचं कठोर आत्मपरीक्षण पालकांनी करायला हवं. ‘आम्ही पैसा मुलांसाठीच मिळवत आहोत.’ असं म्हणण्याचा दांभिकपण करू नये. पौडंगावस्थेत मुलं बिघडण्याचं प्रमुख कारण आई-वडिलांनी मुलांना न दिलेला वेळ हे आहे ही गोष्ट आपण पक्की लक्षात ठेवली पाहिजे. हा वेळ चांगल्या कामासाठी दिला पाहिजे. मुलांबरोबर टीव्हीवरच्या मालिका किंवा हिंदी सिनेमातलं नाचकाम, दारूकाम पाहण्यानं मुलाला वेळ दिला असं म्हणता येणार नाही. पालकांनी कधीतरी मुलाच्या कॉलेजमध्ये जाऊन तो वर्गात नियमित बसतो की नाही याचाही तपास त्याच्या नकळत करावा. त्याचे मित्र#मैत्रिण कोण आहेत. यावरही लक्ष ठेवावं. तरच त्याला तिला आपण वाचवू शकू.

आहार, निद्रा याबरोबर मैथुनाचे महत्व आपल्या सुभाषितकारांनी फार पूर्वीच वर्णन केलेलं आहे. मैथुन ही जबरदस्त नैसर्गिक प्रेरणा आहे याबद्दल दुमत होण्याची अजिबात शक्यता नाही, पण या प्रेरणेचं प्रकटीकरण कुठं करावं, किती वेळा करावं आणि कशा पध्दतीने करावं याचं तारतम्य आता सुटत चाललं आहे. ‘तरुण-तरुणींची सलज्ज कुजबूज’ वगैरे आता फक्त कवितेतच वाचायची. त्याऐवजी ‘तरूण-तरुणींचे निर्लज्ज चाळे’ बघण्याचे दिवस आले आहेत. प्रेमाचा शेवट सेक्समध्ये होण्याऐवजी (तथाकथित) प्रेमाची सुरवातच सेक्सने होत आहे. पाश्चात्य संस्कृती म्हणतात ती हीच. ‘प्रेम करणं म्हणजे फक्त ऐकमेकांकडे पाहणं नव्हे तर एका दिशेनं पाहणं’ असं म्हणतात. याचं मर्म पालकांनी आपल्या मुलांना (युक्तीने) समजावून दिलं पाहिजे-त्यासाठी वेळ काढला पाहिजे. हा लेख म्हणजे त्यासाठीचा ‘रेड अलर्ट!’

– प्रा. गिरीश पिंपळे
‘गावकरी – प्रतिमाच्या सौजन्याने’