तुम्हाआम्हा रसिकांच्या जीवनातील ‘प्राणस्वराचा’ आज अमृतमहोत्सव. गेल्या चार पीढयांच भावविश्व या स्वराने समृध्द केले आहे जगायला हूरूप देणाऱ्या आणि जीवनाला अर्थ देणाऱ्या ज्या मोजक्याच गोष्टी आहेत त्यात लताजींचा स्वर सर्वोच्च स्थानावर आहे. लताच्या या प्रतिभाशाली व अलौकीक स्वराचं वर्णन करताना कुसुमाग्रज म्हणतात ‘सृष्टीतील कोकीळा फक्त वसंतातच गात असतात, पण या कोकीळेने मात्र प्रत्येक ऋतुला वासंतिक स्वरांचा दिलासा दिला आहे.’ तर दुसरे ज्ञानपीठ विजेते वि. स. खांडेकर यांनी लताच्या स्वराबाबत#गाण्यांबाबत ‘अबोलीचा रंग व बकुळीचा गंध लाभलेली अक्षय स्वरातील गाणी’ असे कौतुकोद्गार काढले. खांडेकरांना लताचे ‘ओ सजना बरखा बहार आयी’ (परख) हे गीत खूप आवडायचे. अवघ्या महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व पु. लंनी ‘या आकाशात सूर्य आहे, चंद्र आहे नि लताचा स्वर आहे’ अशा शब्दात लताजींच्या स्वराला दाद दिली होती. पु. लं.ना लताजींचे ‘तू मेरे प्यार का’ खूप आवडायचे, त्यांनी या हळुवार अंगाई गीताबाबत खूप छान लिहीलय ! आ. अत्रेंनी या स्वराला ‘लोण्यात खडीसाखर मिसळलेला अवीट मधुर स्वर’ म्हटले आहे. असा एकही रसिक नाही ज्याने लताजींच्या स्वरावर प्रेम केले नाही. आज लताजींच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसा निमित्त त्यांनी गायलेल्या मराठी गीतांवर नजर टाकून सरलेल्या काळातील मधुर आठवणींचा वर्षावात चिंब न्हाऊयात
स्वरातील कोवळीकता
लताजींच्या गायनाचा शुभारंभ मराठी संगीतकाराकडेच झाला. दत्ता डावजेकर यांच्याकडे लतादिदी प्रथम गायल्या. तो काळ मोठा विलक्षण होता. देशात स्वातंत्र्य लढयाचा अपूर्व उत्साह खळाळत होता. जगात दुसऱ्या महायुध्दाने थैमान घातले होते. सांस्कृतिक विश्वात याच प्रतिबिंब उमटणं स्वाभाविकच होतं. पुढे फाळणीची वेदना कळ देवून गेली. मराठी सांस्कृतिक विश्वात त्या वेळी भावगीतांचा जमाना होता. भाव गीतांचा बादशहा गजानन वाटवे तेंव्हा आपल्या गायकीने रसिकांच्या दिलात अटळ स्थान मांडून होते. याच काळात बबनराव नावडीकर, गोविंद पोवळे, माणिक वर्मा, सरोज वेलींगकर, सुधीर फडके ही मंडळी जनतेच्या समोर होती. वाटव्यांच्या भावगीतांनी अफाट लोकप्रियता मिळवली होती. आणि याच काळात लताजींचा स्वर्णस्पर्शी स्वर रसिकांपुढे आला आणि स्वरानंदाचा अभिषेक सुरू झाला. गेली पन्नास-पंचावन्न वर्षे या स्वराने आम्हाला नवरसाची प्रचिती देण्याऱ्या गीतांची अनुभूती दिली. या स्वराने आम्हाला जगण्याचा अर्थ दिला व जीवन रसिल#सुरील बनवलं. लताजींच्या मराठी गीतांचा आपण जेंव्हा विचार करू लागतो तेंव्हा त्यांनी वसंत प्रभूं कडे गायलेल्या गीतांना प्रामुख्याने आठवू लागतो. एकीकडे ‘आशा भोसले-गदीमा-सुधीर फडके’ हे त्रिकूट रसिकांना प्रतिभेचे नवनवे अविष्कार देत होते आणि दुसरीकडे ‘लता-पी सवाळाराम-वसंतप्रभू’ हे त्रिकूट रसिकांच्या भावभावनांचे विश्व हळूवार पणे फुलवत होते. या काळातील मनात खोलवर रूजलेल्या काही गीतांची आठवण आपण जोजवूयात.
गंगा यमुना डोळयात उभ्या कां
या त्रयीची आठवण काढली की डोळयापुढे येते गंगायमुना डोळयात उभ्या का’ जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा’ हे गीत ! 1950 सालचं हे गाण आजही पापण्यांच्या कडा ओलावते. कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनीया बाबा गेला, वैभवाने बहरून आला, याल का हो बघायला’ या गीतातील लताच्या स्वरातील कातरता तिचं पितृप्रेम व्यक्त करते. खास दिनानाथांवर हे गाणं लिहीलं गेलं. या त्रयीने हर तऱ्हेचे प्रत्येक भावनांचे, प्रत्येक रसाचे गाणे दिले. लताजींच्या कोवळया स्वरातील ‘हृदयी जागा तू अनुरागा प्रीतीला या देशील कां ?’ ‘नववधू प्रिया मी बावरते लाजते पुढे सरते फिरते’ या कोवळया प्रेमाच्या अंकुराची नाजूकता लताजींनी लिलया टिपली आहे. त्या काळातील प्रेमातील मुग्धता, त्यातील कोवळीक, आणि मुख्य म्हणजे ‘लज्जा’ हा जेंव्हा स्त्रियांचा मुख्य अलंकार होता त्या काळातली प्रेमाची आर्तता या साऱ्यात एक नादमय गोडवा होता अन या गोडव्याचाच प्रत्यय ठायीठायी येतो. ‘ ‘मधु मागसी माझ्या सख्या परी’, ‘लेक लाडकी या घरची होणार सून मी त्या घरची’, ‘तुझे डोळे पाण्याने भरले माझे डोळे पाण्याने भरले’, ‘ये जवळी घे जवळी’ या भावगीतांनी तमाम तरूण तरूणींचे भावविश्व गुलाबी झाले. प्रेमातील समर्पणाच्या उदात्त भावनेचा जयघोष यात होता. या गीतात नाजूक शृंगार आहे, गुलाबी प्रणय आहे. स्वरात शुध्द चंचलता आहे, गीतात सात्विक भावना आहे तर सूरात लोभस अवीटता आहे.
घट डोईवर घट कमरेवर
लताजींच्या भावस्पर्शी स्वराने पुलकीत झालेल्या कित्येक गीतांचा वर्षाव आपल्याला अजून अनुभवायचा आहे. ‘चाफा बोलेना चाफा चालेना’, ‘हरवले ते गवसले का गवसले ते हरवले का?’, ‘काळज्या लागल्या जीवा मला ही इश्वरा’ वसंत प्रभूंनी स्वरसाज चढवताना कधीही सूरांना शब्दांवर आक्रमण करू दिलं नाही. त्यामुळेच आज इतक्या वर्षानंतरही भावगीतं लख्ख आठवतात! लताजींनी वसंत प्रभूंकडे बरीचशी भक्ती गीतही गायलीत. ‘जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला’, ‘राम हृदयी राम नाही’, ‘श्रीरामा घनश्यामा’, ‘घट डोईवर घट कमरेचवर सोडी पदरा नंदलाला नंदलाला रे’, ‘विठ्ठल रामचरण तुझे धरते’, ‘मुकुंदा रूसू नको इतका विनविते तुला राधिका’ या आणि इतर भक्तीगीतांचे लताजींनी अतिशय मंगलस्वराने त्यांचे सोने केले !
तिन्ही सांजा सखे मिळाल्या
आठवायला गलं तर लताजींची चिक्कार मराठी गाणी मनाचे फेर धरून नाचू लागतात. त्यात ज्ञानदेवांपासून भा. रा. तांबे, कुसुमाग्रज वसंत बापट पासून सुधीर मोघ्यां पर्यंतची गाणी असतात. लताजींच्या या मराठी गीतांनी तमाम मराठी रसिक सुखावला विशेषत: आजच्या कत्तलीच्या युगातही गाणी पहाटेच्या हळुवार#मंद वायुलहरी सारखी मनाला प्रसन्न करून जातात. आणि जगायला हुरूप येतो. ‘या चिमण्यांनो परत फिरारे घराकडे आपुल्या’ हे खळयांकडचं गाणं त्यातील आर्तता व हार्मोनियमच्या सूराने गीताशी जमवलेली समरूपता सारचं अलौकिक दिव्य ! बालकवीच्या लेखणीतून उतरलेले ‘माझे गाणे, एकच गाणे, नित्याचे गाणे, अक्षय गाणे अभंग गाणे हे गाणे’ हे गीत ऐकल्यावर ते लताजींच्या स्वराबाबातच लिहीलय की काय असा भास होतो. दैव जाणीले कुणी, बाळा जोजो रे, ही गदीमांची गाणी, जनपळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहीलं कार्य काय तिन्ही सांजा सखे मिळाल्या, सखे गं वैरीण झाली नदी, निजल्या तान्ह्यावरी माऊली दृष्टी सारखी करी, ही भा. रा. तांब्यांची गाणी आजही मनाला सुखावून जातात. जीवनात ही घडी अशीच राहू दे, राजा सारंगा माझ्या सारंगा, सावर रे सावर रे, सांग कधी कळणार तुला, श्रावणात घन नीळा बरसला, तुज स्वप्नी पाहीले रे, वादळ वारं सुटलं गं, मेंदीच्या पानावर मन अजून झुलते गं या गीतांवर गेल्या चार पिढया पोसल्या आहेत. लताजींच्या मराठी गीतातून दिसणारी सात्विकता, पारदर्शकता, सारे अमंगल जाळून मनाला परमतत्वाला जवळ नेणारी दिसतात. ‘प्रेमस्वरूप आई वात्सल्य सिंधू आई बोलावू तूज आता मी कोणत्या उपायी’ हे गीत तर प्रत्येक मराठी रसिकाच्या हृदयात विसावलेलं गीत आहे.
स्वर बरसणारा आनंदघन
लताजींच्या सर्वच गीतांचा आढावा निव्वळ अशक्य आहे. आज रिमिक्सच्या बाबतीत लताजींच्या परखड मनाला निश्चितच फार मोल आहे कारण या जुन्या रम्यस्मृतीला दिवसेंदिवस ओरखडे देण्याचं काम चालले आहे त्याला कुठेतरी शह द्यायलाच हवा. खैर लताजींच्या स्वरावर प्रेम करणारी मंडळी असल्या रिमिक्सकडे ढुंकुनही पाहत नाहीत !
लताजींच्या स्वरांच्या सावलीतच आपल्या आयुष्याची संध्याकाळ व्हावी ही रसिकांची इच्छा ! आमच्या सारख्यांच आयुष्य लताजींना लाभावं आणि हे भारतरत्न शतायुषी व्हावं, नाही तरी मरणाची वाट बघत जगण्याखेरीज आम्ही वेगळं करतोय तरी काय ?
लता मंगेशकर यांनी गायलेली काही गाणी
मराठीवर्ल्डतर्फे लताजींना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…!
– धनंजय कुलकर्णी