सावरकर हे बुध्दिवादी होते. त्यांच्या संपूर्ण जीवनचरित्रातून आणि त्यांच्या तत्त्वज्ञानातून विशेष दृष्टिस पडणारी गोष्ट म्हणजे त्यांचा उपयुक्ततावाद. वेळ, धन, मनुष्यबळ, साधनसामुग्री इत्यादिंचा जास्तीत जास्त उपयोग झाला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. त्यांच्या आचारात, विचारात, लेखनात नि भाषणात आपल्याला हा गुण सातत्यानं दिसून येतो.
त्यांना आपल्या जीवनाची सार्थकता कशात वाटत होती ते त्यांनी आपल्या येसूवहिनींना पाठवलेल्या पत्रात वाचायला मिळतं. हे पत्र जेंव्हा त्यांनी पाठवलं त्यावेळी हिंदुस्थान क्रांतिचा वणवा पेटला होता. सावरकरांचे ज्येष्ठ बंधू बाबाराव सावरकरांना काळया पाण्याची शिक्षा झाली होती. इंग्रज सरकारकडून होणाऱ्या छळाबाबत सावरकरांना येसूवहिनींनी पत्रानं कळवलं होतं. अशा पार्श्वभूमीवर सावरकर आपल्या वहिनीला जीवनाची सार्थकता सांगताना म्हणतात,
अनेक फुले फुलती । फुलोनिया सुकोनी जाती ॥
कोण तयांची महती गणती । ठेविली असे? ॥
परि जे गजेंद्रशुंडेने उपटिले । श्रीहरीसाठी मेले ॥
कमळफूल ते अमर ठेले । मोक्षदा ते पावन ॥
अशीच सर्व फुले खुडवी । श्रीरामचरणी अर्पण व्हावी ॥
काही सार्थकता घडावी । ह्या नश्वर देहाची ॥
अमर होय ही वंशलता । निर्वंश जिचा देवांकरिता ॥
दिगंती पसरे सुगंधता । लोकहितपरिमलाची ॥
वास्तविक सावरकरांच्या कुटुंबावर निर्वंश होण्याचीच वेळ त्योवळी आली होती. ज्येष्ठ बंधू बाबाराव काळया पाण्यावर गेले होते. त्यांना मुले झाली पण ती अल्पायुषी ठरली. स्वत:चा (वि. दा. सावरकरांचा) मुलगा प्रभाकर हा ही देवाघरी गेला होता. त्यांना स्वत:ला फाशी होण्याची शक्यता होती. त्यांचा धाकटा भाऊ नारायणराव ह्याचं शिक्षण अजून पूर्ण झालेलं नव्हतं. ते ही क्रांतिकार्यात सहभाग घेत होते. त्यांनाही फाशीची शिक्षा होण्याची शक्यता होती. तरी सुध्दा सावरकरांना आपली वंशलता अमर वाटते कारण, देवांच्या कार्यासाठी ती निर्वंश होण्यास सिध्द झाली. एखाद्या उच्च, उदात्त ध्येय प्राप्तीसाठी मृत्युला कवटाळणं नि त्याबद्दल जराही भय न वाटणं, पश्चात्तापही न वाटणं, हेच तर जीवनाचं खरं सार्थक आहे. अशा प्रकारच्या जगण्यालाच जगणं म्हणतात.
कानाची खरी शोभा कुंडलाने नव्हे तर ज्ञानाने शोभते. देह देशासाठी, ज्ञान व बुध्दी देशाच्या विकासासाठी वापरली गेली पाहिजे. म्हणून सावरकर आपल्या ‘सागरास’ या कवितेत म्हणतात,
गुण-सुमने मी वेचियली या भावे । कीं तिने सुगंधा ध्यावें
जरि उध्दरणी व्यय न तिच्या हो साचा । हा व्यर्थ भार विद्येचा
आपल्या परतंत्र भारतमातेला स्वतंत्र करण्यासाठी आपल्या गुणांचा, आपल्या ज्ञानाचा, बुध्दिचा जर उपयोग केला नाही; तर तो विद्येचा भार फुका वाहिला असाच त्याचा अर्थ होईल. दुसऱ्या महायुध्दाच्या वेळीसुध्दा त्यांनी त्यावेळच्या तरूणांना सैन्यात भरती होण्याचा सल्ला दिला. त्यांच्या ह्या प्रचाराला लोकांनी विरोध केला. त्यांना ‘रिक्रूटवीर’ म्हणून हिणवलं. पण त्यांनी त्याकडे लक्ष दिलं नाही. त्यांचा त्याच्या निर्णयावर विश्वास होता.
या महायुध्दाचा लाभ आपल्या स्वातंत्र्यासाठी त्यांना करून घ्यायचा होता. सरकार (इंग्रज सरकार) अडचणीत होतं. त्यांना सैनिकांची आवश्यकता होती. त्यामुळे सैन्यात भरती होणाऱ्या हिंदी तरूणांना सैनिकी शिक्षण मिळणार होतं. शस्त्रास्त्रं हाताळता येणार होती. शस्त्रास्त्रांच्या कारखान्यातही काम करण्याची संधी प्राप्त होणार होती. शिवाय प्रत्यक्ष युध्दाचा अनुभवही मिळणार होताच. या गोष्टींचा फायदा घ्यायचा. एकदा हातात शस्त्रं आली, की तीच शस्त्रं इंग्रजांवर रोखून देश स्वतंत्र करता येणं कठीण नव्हतं. असा विचार करून येणाऱ्या संधीचा व परिस्थितीची देशहितासाठी लाभ घेण्यासाठी धडपडणारा एकमेव नेता म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर होय.
अंदमानात शिक्षा भोगत असताना त्यांनी तिथेही आपला वेळ वाया घालवला नाही. तिथल्या अशिक्षित बंदिवानांना त्यांनी शिक्षण दिले. जगाची ओळख करून दिली. त्यांच्यावर देशभक्तीचे संस्कार केले. त्यांना देशकार्याकडे वळवलं. त्यांच्यातल्या वीरवृत्तीचा उपयोग त्यांनी देशासाठी करावा असं त्यांच्या मनावर बिंबवलं. अंदमानात शिक्षा भोगत असताना, त्या मरणप्राय यातना, तो नरकवास भोगतानाही त्यांनी स्वत:च्या मनाला सांभाळलं. सहबंदिवानांच्या मनातली मरगळ दूर केली. अनेक बंदिवानांना ती भयानक शिक्षा भोगण्यापेक्षा आत्महत्त्या अधिक बरी असं वाटत होतं. सावरकरांनी त्यांना त्या पासून परावृत्त केलं. त्यांच्या मनात जगण्याची आशा निर्माण केली. यातनांना, कष्टांना सामोरं जाण्याची हिंमत निर्माण केली. अशा प्रकारे तिथेही त्यांनी आपलं काम चालू ठेवलं.
सावरकरांच्या मनाला निराशेने कधीही स्पर्श केला नाही. जेंव्हा जेंव्हा निराशा तसा प्रयत्न करू लागली तेंव्हा तेंव्हा त्यांनी त्या निराशेला दूर लोटलं. मृत्युलाही त्यांनी आपला धाक घातला. इंग्रज सरकारने त्यांना अट घातली की त्यांनी राजकारणात सहभाग घ्यायचा नाही. व रत्नागिरीतून बाहेर जायचं नाही. तिथेही सावरकर स्वस्थ बसले नाहीत. त्या स्थानबध्दतेते त्यांनी अस्पृश्यता निवारण चळवळ उभी केली. साक्षरता वर्ग सुरू केले.
तुम्ही अम्ही सकल हिंदु । बंधुबंधू
तो महादेवजी पिता आपुला चला तया वंदू॥ध्रु॥
ब्राह्मण वा क्षत्रिय चांग । जरि झाला
कसेलेंहि रूप वा रंग । जरि ल्याला
तो महार अथवा मांग । सकलांला
ही एकची आई हिंदु जाति आम्हास तिला वंदू॥१॥
असं गीत रचून लोकांमधल्या जातीच्या भिंती पाडून टाकण्याचा प्रयत्न केला. सावरकर हे बोलघेवडे देशभक्त किंवा समाजसुधारक नव्हते. ते कृती करून दाखवायचे. त्यांच्या आचाराविचारात अंतर नव्हतं.
जेंव्हा त्यांना जाणवंल आपला देह आता जीर्ण झाला आहे. हा देह पुन्हा तरूण होणं शक्य नाही. जेवढं करता येत होतं तेवढं त्यांनी केलं. आता आपला भार कोणावरही पडता नये. आपण जगलो तरी आपल्या हातून देशकार्य घडणं शक्य नाही तेंव्हा व्यर्थ जगायचं कशासाठी. त्यांनी अन्नपाणी, औषधे यांचा त्याग केला. वयाच्या २३व्या वर्षापासून ८३ व्या वर्षांपर्यंत सलग साठ वर्षे पाठलाग करणा-या मृत्यूला त्यांनी स्वत: साद घातली नि त्याच्या ताब्यात आपला देह दिला. नि कृतार्थतेने इहलोकाची यात्रा पूर्ण केली. अशा ह्या ज्ञानयुक्त क्रांतियोध्याचा जन्मदिवस २८ मे १८८३ नि आत्मार्पण दिन २६ फेब्रुवारी १९६६. त्यांच्या स्मृतींना विनम्र प्रणाम.
– दुर्गेश जयवंत परूळकर