मुंबई नावाची एक धडकन्

मुंबईवरती लिहायचं म्हणजे! रोज मुंबईवर देशभरच्या पेपरांत किती छापून येतं, आणखी काय सांगायचं लोकांना! पण मुंबईबद्दल सांगून संपत नाही हे तिचं एक वैशिष्टय आहे. तर माझ्या जन्मापासूनच्या पंचवीस वर्षात मी अनुभवलेली मुंबई स्वत:ला वगळून, आकडे सनावळी टाळून साध्यासोप्या भाषेत सादर करीत आहे.

पोर्तुगीजांनी ब्रिटीशांना मुंबई आंदण दिल्यानंतर दिवसागणिक ती वाढत गेली. देशाची आर्थिक, औद्योगिक राजधानी होण्याचा मान सुरतेला मिळायचा तो मुंबईकडे चालत आला. ब्रिटीशांनी देशावरती नक्कीच अन्याय केला, पण मुंबईला त्यांच्या ऋणातून उतराई व्हायला शतकं लोटली.

देशातील पहिला रेल्वेमार्ग कोणता याबद्दल आज वाद असला तरी मुंबई ठाणे मार्ग हा सर्वार्थाने भारतीय रल्वेची जननी ठरला. देशातले सगळे लोखंडी रस्ते मुंबई बंदरालाच येऊन मिळतात. ब्रिटिशांनी सुरु केलेल्या वीज, पोस्ट, दूरध्वनी सारख्या संदेशवहन यंत्रणा आणि अल्प प्रमाणात निर्माण झालेली कारखानदारी त्यांच्यानंतर स्वकीयांनी काहिशा गलथानपणाने चालू ठेवली तरी, काळाबरोबर तिच्यात बदल होत गेले. आज देशातल्या सर्व सेवा उत्कृष्ट रितीने चालल्या आहेत. देशाच्या औद्योगिक प्रगतीची मूहुर्तमेढ मुंबईतूनच रोवली गेली आणि नेहरु, पंचवार्षिक योजनांच्या काळात या नगरीनं जितकं भरभरुन दिलं त्या प्रमाणात केंद्राकडून तिला काही मिळलं नाही ही वस्तुस्थिती आहे.

वर नमूद केल्याप्रमाणे मुंबई बंदराला देशाची औद्यागिक, आर्थिक राजधानी होण्याचा मान अगदी संयोगाने मिळाला. देशातील इतर अनेक बंदरं हा मान मिळवू शकली असती ब्रिटीशांच्या आमदानीत सात बेटं जोडून मुंबई शहराचा विस्तार करण्यात आला. मच्छीमार कोळी समाज हा इथला पूर्वापारचा रहिवाशी! पण मुंबई आपल्या ताब्यात ठेवणे हे या छोटया समाजाच्या शक्ती आणि बुध्दीबाहेरचं होतं, आणि हा समाज शिकून आपल्याला डोईजड होणार नाही याची पुरेपूर काळजी मुंबईवर आजवर राज्य केलेल्या प्रत्येकाने घेतली. मच्छीमार कोळी दर्या, तारू आणि दारु यांत अडकून पडला. आजसुध्दा आपली मासळी किती खपली यापलीकडे ते मुंबईत स्वारस्य दाखवीत नाहीत.

ब्रिटीशांनी मुंबईत असंख्य उदयोगधंदे सुरु केले आणि पिढीजात श्रीमंत पारशांनी ते ताब्यात घेतले. मुंबईत प्रचंड प्रमाणात रोजगार निर्माण झाला तो देशभरातल्या कर्तृत्ववान माणसांना खुणवायला लागला. मध्य मुंबईतल्या कापड गिरण्यात आपल्या नशिबाचं कापड विणायला कोकणातून, घाटावरून वारेमाप माणसं उतरली आणि दुर्देवाने सगळीच्या सगळी गिरण्यांतच अडकून पडली. एका जागी काम करून सुध्दा सगळयांनीच आपल्या प्रादेशिक अस्मिता जपल्या. आपण कुठून आलो ते मराठी माणूस कधीच विसरला नाही.

त्याचं सगळं लक्ष गावाकडे असायचंच. मनीऑर्डर गावाला नीट पोचली तरच त्याला झोप लागायची. मराठी माणसाच्या या गाफीलपणाचा फायदा घेऊन गुजराती, मारवाडी, सिंधी, युपी, बिहारी आणि नंतर बांधकाम व्यवसाय वाढला तशी दाक्षिणात्य माणसं झुंडीने यायला लागली. गिरण्या नीट चालल्या होत्या तोवर मराठी माणसाला ही उघडया डोळयांसमोर चाललेली ही आक्रमणं सुध्दा चालून जात होती. मराठी पोलिसांचे हप्ते अनधिकृत गाडीवाले, झोपडीदादा, गुत्ता, मटकावाले आणि अशा कितीकांकडे बांधून असायचे. गिरण्यांच्या काळात मुंबईत झोपडपट्टी तुफान वाढली आणि मराठी पोलिस, भाई, पुढाऱ्यांनी पर्यायाने मराठी माणसानेच तिला संरक्षण दिलं. आंजारुन गोंजारुन वाढवलं.

पण वर्षानुवर्षे गिरण्यातूंन धुमसणारा असंतोष दत्ता सामंत नावाच्या चिमणीतून बाहेर पडला. 1980 साली सामंतांचं ऐकून मराठी कामगारांनी तो ऐतिहासिक संप केला आणि त्यावेळी मुंबई शहर सायनपर्यंत मर्यादित होतं. उपनगरं साष्टीचा भाग होती गिरण्यांनी गिरगाव, परळ, लालबाग भागात वस्ती वाढवली. या भागातून गिरणगावची अशी संस्कृती जन्माला आली. मराठी माणूस मुख्यत: गिरणी कामगार होता. कच्चा माल, वाहतूक, बांधकाम, हॉटेल, दुकानदारी आणि इतर लहान सहान व्यवसायांवर परप्रांतियांनी आपली वर्णी लावली होती. सरकारी नोकर भरतीत गर्दी जास्त आणि कामाचा दर्जा शून्य अशी अवस्था होती. आणखी माणसांना नोकऱ्या देणं सरकारला जमत नव्हतं. सरकारी नोकरीमागे जीव खाऊन पळणं ही त्यावेळची मराठी माणसाची वृत्ती आजही कायम आहे. परप्रांतीय ठेकेदारांना मराठी माणसांचं वावडं असायचं आणि आहे. त्यापेक्षा आपले जातभाई आणून कमी रोजंदारीवर राबवून घ्यायचे आणि त्यांचंच पाप मुंबईच्या माथी मारायचं हा उपक्रम त्यांनी नेटाने राबवला.

60 च्या दशकात गिरण्या सुस्कारे सोडायला लागल्या. आपल्या पोटावर पाय येत असल्याची जाणीव मराठी माणसाला व्हायला लागली. कधी नव्हे ते असुरक्षीत वाटायला लागलं. त्याच्या मनात शांती ढळली. गिरण्यांत वारंवार संप व्हायला लागले. संपांनी असंख्य कामगार नेते जन्माला घातले. सगळयांनी कामगारांना एकच मंत्र दिला ‘भांडा!’ कामगारांच्या समस्या वाढल्या. हाती येणारा पैसा अपूरा पडू लागला. आणि त्याच वेळी मराठी माणसाचा कैवार घेऊन शिवसेना जन्माला आली. तिच्या विरोधकांना आडवं करण्याच्या वृत्तीवर मराठी माणूस फिदा झाला. थोडयाच दिवसांत शिवसेना सगळीकडे पसरली. मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकला. शिवसेनेची निर्मिती कशाही परिस्थितीत झाली असली तरी गलितगात्र झालेल्या मराठी माणसाला तिने प्रचंड हिंमत दिली हे नक्की!

८० साली दत्ता सामंतांच्या नेतृत्वाखाली गिरणी कामगारांनी बेमुदत संप पुकारला. गिरणी मालकांनी काही त्याला भीक घातली नाही. हा संप अपेक्षेपेक्षा खूपच लांबला. असंख्य गिरण्या धडाधड बंद झाल्या. लाखो कामगार बेकार झाले. त्यात सरकारी नोकरभरती सुध्दा काही वर्षानी बंद झाली. गिरणगावातील घरं माणसं वाटेल त्या किंमतीला विकायला लागली आणि पार कल्याण, डोंबिवलीला नाहीतर सरळ गावाला निघून गेली. आज ना उद्या गिरण्या सुरु होतील या आशेवर बरेच जण राहीले. गिरण्यांच्या चाळीत गुत्ते आणि गुत्त्यांवरील गर्दी वाढली. गिरणी कामगारांची पोरं चाकू-सूरे खेळवायला लागली. दिवसाढवळया लालबागच्या चाळीत खून पडायला लागले. पोलीस खात्याचं काम आणि दरारा वाढला. गुंडगिरी करणारी पोरं शिवसेनेचा आसरा घ्यायला लागली. चांगल्या उद्देशाने निर्माण झालेली संघटना त्यांच्यामुळे बरीच बदनाम झाली. पण सेनेने मराठी माणसाच्या हिताचा मुद्दा सोडला नाही. चाळीचाळीतून गँग उभ्या राहिल्या. चोऱ्या, वाटमाऱ्या करणारे मवाली सरळ शेटजींच्या केबीनमध्ये घुसून खंडणी मागायला लागले. पोलिसात जाणारे रस्त्यावरती तडफडत मेले. मुकाट खंडणी देणारे दुसऱ्या गँगकडून मारले जाऊ लागले. एक गँग दुसऱ्या गँगला पाण्यात पाहू लागली. मराठी माणसंच मराठी माणसांचे मुडदे पाडायला लागली.

वाढत जाणाऱ्या कुठल्याही शहरात एक भाग आपोआप निर्माण होत जातो. रेड लाईट एरिया! हा भाग आधी उपनगरात भांडूपला आणि तिथून मध्य मुंबईत पसरला. या भागाच्या आसपास मुसलमानांची वस्ती वाढली, ती वाढतच गेली. मुसलमान इथे आले तेच मुळी पिढीजात खुन्नस घेऊन! मराठी पोरं आणि मुस्लीम मुहल्ल्यांत खटके उडायला लागले. मुसलमान पोरं मराठी गँगमधून बाहेर पडली. त्यांनी स्वत:च्या नवीन गँग बनवल्या आणि इथून मुंबईच्या गुन्हेगारीने भयंकर वळण घेतले.

त्याच वेळी मुंबईच्या सांस्कृतिक, सामाजिक जीवनात एक स्ंथित्यंतर घडत होतं. साहित्य, कला, क्रिडेच्या प्रांतात मराठी माणसं मुशाफिरी करीत होती. मराठी चित्रपट सृष्टीचा सुवर्णकाळ चालू होता. बेकारी, गुन्हेगारी वाढली तरी विचारांच्या सुसंस्कृतपणाचा दुष्काळ नव्हता. असंख्य वृत्तपत्रे मराठी माणसाला शहाणे करत होती. सणवार उत्साहाने साजरे व्हायचे. गल्लीगल्लीतून गोविंदा निघायचे, गणपती बसवले जायचे. आजसुध्दा त्यात खंड पडलेला नाही. देशातलं सर्वोत्तम शिक्षण देणाऱ्या संस्था मुंबईत उभ्या राहात होत्या. मुंबईसहीत संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न साकार झालं होतं.

गिरणी कामगारांशिवाय रेल्वे, पोस्ट, पोर्ट-ट्रस्ट, बँका आणि इतर उपक्रमांत नोकरीला असलेली, कारकून, उच्चपदस्थ, पैशाची, भविष्याची शाश्वती असलेली मराठी माणसं मुंबईच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक जीवनात आपला ठसा उमटवीत होती. मंबईच्या जीवनात आधुनिकपण येत होतं. नाटयगृह, सिनेमागृह उभी रहात होती. बाजारातून सुध्दा ट्रेंड दिसायला लागला होता. बाजारपेठेला गिऱ्हाईकाचं महत्त्वं कळलं होतं. त्यासाठी अक्षरश: पायघडया घातल्या जात होत्या. सोयीसवलतींचा पाऊस पडला जात होता. बॉलीवूड जोशात होतं. भांडवलदार राजकारण्यांना पोसत होते. इम्पोर्टेड मालावरची बंधन सैल होत होती. मुक्त जीवनशैलीचा चलती होती. पब्लिक आपल्या हक्कांबाबत जागृत होत होतं. आमदार, नगरसेवकांच्या मागे लागून आपल्या भागाचा विकास करवून घेतला जात होता. पराकोटीचं दारिद्रय आणि नवकोट श्रीमंती एकाच वेळेस नांदत होती. स्टॉक एक्सेंज तेजीतचं असायचा. मुंबईत पैशांची गंगा वहात होती. पण यात हात धुवून घ्यायला मराठी माणूस कमी पडत होता.

मुंबई हातची जायला मराठी माणूसच कारण होता असंच काही नाही. मराठी माणसाचा पर-प्रांतीयांवरचा राग हा बऱ्याच प्रमाणात न्यायच आहे. बाहेरची माणसं पोट भरायला मुंबईत आली हे तर खरचं, पण ज्याच्या जीवावर मोठी झाली त्या मराठी माणसा विरोधात कांगावा करण्याची त्यांची सवय गेलेली नाहे. मराठी माणूस सुस्त, आळशी म्हणून परप्रांतीयांनी नेहमीच हेटाळणी केली. हे लोक आपल्या प्रांतात तरी काय एवढे दिवे लावतात. मुंबई हे मराठी माणसाचं घर आहे. आणि आपल्या घरात तो हातपाय पसरून सुखानेच रहाणार. पिकतं तिथं विकत नाही म्हणून तर सगळे इथं येऊन रहातात ना! इथं येणारे कोणाच्या तरी ओळखीचे येतात. त्यांच ‘लॉबिंग’ पक्कं असतं. आपल्याला आपले भाईबंद संभाळून घेतील हे त्यांना माहीत असतं. एकजण मोठा झाला तर त्याच्या बरोबर दहाजण तो मोठे करतो आणि हे जाळं पसरत जातं.

लॉबी बाहेरच्यांना ते भेदणं मुश्कील असतं. अगदी सुमार कुवतीची माणसंसुध्दा लॉबीतून मोठी होतात. मुंबईतला गुजराती समाज हे अशा ‘लॉबिंग’च सर्वोत्तम उदाहरण आहे. इतक्या विश्वासाने मराठी माणूस दुसऱ्या राज्यांत जाऊ शकत नाही. मराठी माणूस सातासमुद्रापार जाऊ शकतो पण आपल्याच देशात कुठल्याही राज्यात निर्धास्त, मोकळेपणाने राहू शकत नाही? आपल्या राज्यात सगळयांचा पाहुणचार करणाऱ्या मराठी माणसांबद्दल इतर राज्यांत हात एवढा आखडता का? देशातील इतर शहरं मुंबईसारखी कॉस्मोपोलिटन का होऊ शकत नाहीत?

आज बदलत्या जगाचे सगळे रंगढंग घेऊन मुंबई एकविसाव्या शतकात पोहोचली आहे. मुक्त अर्थव्यवस्था, खाजगीकरणाचे वारे जोरात वाहात आहेत. बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. त्यात दिवसागणिक बंद होणाऱ्या कंपन्या भर घालताहेत. मोठमोठया कंपन्यांच्या जागेवर भव्यदिव्य कॉम्प्लेक्सेस, मॉल्स, मल्टीप्लेक्स उभी राहिली आहेत. इंटरनेट, मोबाईलने जग जवळच आणलं नाही, तर ग्रासलंय. फोन, फॅक्स जुनाट झालेत. मेडिकल, मॅनेजमेंट, आर्किटेक्चर, शिक्षण सगळयाच क्षेत्रात क्रांती झालीय…

दुर्दैवाची बाब ही आहे की, या सगळयातून माणूसकी गायब झालीय. पैसे खाणं, मुडदे पाडणं ही कामं माणसं यंत्रासारखीच करायला लागली आहेत. हिंसाचार वाढलायं. नागरवस्तीत दिवसाढवळया बा बस्फोट होत आहेत. कोणावर विश्वास ठेवणं मुश्कील झालयं. मनोरंजन महाविकृत झालयं. टिव्हीचा रिमोट कंट्रोल लपवून ठेवण्याची वेळ आली आहे. आयुष्यभर राबून मिळत नाही इतका मोबदला एक सेक्सी रिमिक्स बनवल्यावर मिळतोय. आजकालची पोरं ‘मी कुठून आलो’ विचारत नाहीत. त्याची उत्तर इंटरनेटवर शोधली जातात. विवाहबाह्य संबंध हा स्टेटस् सिंबॉल बनलाय आणि टीव्हीवरच्या डेली सोप्सनी सारा समाजच डोक्यावर घेतलाय. दारु, सिगारेट, चरस, बायका सगळं होलसेलमध्ये खपवलं जातयं ते मुंबईतच! विचारवंतांची डोकी चालेनाशी झालीत. आणखी कायकाय चाललयं मुंबईत! तरीपण मुंबईचं महत्त्वं कमी झालेलं नाही. उलट वाढतयं. सगळयात जास्त परकीय गुंतवणूक होतेय. बोलिंग ऍलीज, काररेसची मैदानं मुंबईतच निघताहेत. क्षीण का होईना, परप्रांतीयांच्या विरोधात आवाज उमटले आहेत. अखेर मुंबई हे या देशाचं ह्रदयच तर आहे, हे हृदय धडधडत राहिलं तरच देश चालणार ना!

– अमोल भांगरे