चाचा नेहरूंनी मुलांसाठी खास राखून ठेवलेला हा दिवस म्हणजे खरं तर पालकांनाच विचार करायला लावणारा. बालदिन साजरा होतांना सहज मनात विचार डोकावला खरच का आजच्या पीढीचे ‘बालपण’ जपले जाते ? आताच्या पिढीचे ‘बालपण (खरे तर ‘बाळंपण’) फक्त दोन-तीन वर्षां पर्यंतच असते. आई-बाबांच्या महत्त्वकांक्षेचे ओझे घेऊनच आजच्या बालकांची शालेय जीवनाची सुरूवात होते. ‘माझ्या मुलाने’ शाळेत नाचत, गाण्यात, क्रिकेटमधे, संगणकात अगदी सगळयात अव्वल दर्जा मिळवला पाहिजे हा अट्टहास हल्ली बहुतेक प्रत्येक पालकात बघायला मिळतो. क्षणभर पालकांनी आपल्या भूतकाळात डोकावून स्वत:ला विचारावं की आपण तरी एकाचवेळी सा-या गोष्टीमधे एकाचवेळी प्रगती केली होती की ? चिमुकली मुलं खांद्यावर दप्तर घेऊन जातात तेव्हा कित्येक पटीने मनाचे ओझे अधिक पेलत असतात. शाळेत जायला लागल्यापासून आपण आपल्या मुलांना कितीसे क्षण त्यांच्या मर्जीने जगू देत असतो ? खास मुलांसाठी म्हणून कितीसा वेळ आपण त्यांना देतो ? मुलांच्या आवडीचा खेळ, खाऊ, गाणी, गोष्टी व्यक्ती कितीदा फक्त त्यांच्याच म्हणून उपलब्ध करून देतो ? ह्याचं उत्तर कदाचित नकारार्थीच अधिक असेल. बालदिनाच्या निमित्ताने आपण अधिक सजग पालक होण्याचा प्रयत्न करू या. आज पालकांना विशेषता आईला सुध्दा जाणीपूर्वक आपल्या पाल्यांचे बालपण जपू या. मुलांबरोबर छोटया छोटया गोष्टीत आनंद शोधू या. थोडक्यात आपल्या मुलांसोबत नव्याने बालपण जगू या. मला खात्री आहे ह्या सा-या प्रक्रियेत मुलांबरोबर आपल्यालाही अधिक शिकायला मिळेल.
– सौ. भाग्यश्री केंगे