सेवा निवृत्ती पुढे काय? असा प्रश्न नोकरपेशा वर्गातील पंचावन्न वय ओलांडलेल्या काकांना वाटायला लागतं. परंतू यातून मार्ग निघतो व प्रत्येक जण स्वत:ला कुठेतरी गुंतवून घेण्याचा प्रयत्न करतात. परंतू सेवानिवृत्ती नंतरची अथवा पन्नाशीनंतरची मनस्थीती माझ्या सारखे तरूण जाणू शकणार नाहीत. करण जनरेशन गॅप. आमची विचार करण्याची पध्दती वेगळी आहे. अंगात जोश आहे. नोकरी आहे. परंतू वृध्दापकाळी सुना-मुलांसोबत रहाणे आणि त्यांचे सोबत जुळवून घेणे हे ज्यांना जमतं, त्यांना पुढचा काळ आपल्या मुलाबाळांसोबत नातवंड खेळवतांना घालविता येतो असं म्हटल्यास ते वावगं ठरणार नाही.
अशा वृध्दापकाळाकडे झुकलेल्यांची मनं तेच जाणू शकतात ते समवयस्क आहेत. अशा वृध्दजनांचा एक समूह आमच्या भंडारा शहरात एकत्रीत आला आणि एक नविन संघटना निर्माण झाली ओल्ड गार्ड क्लब. ही अभिनव कल्पना आहे भंडारा येथाल प्रतिथयश व्यक्ती, भंडारा नगरपालिकेचे माजी अध्यक्ष आर्किटेक्ट श्री. शाम नंदूरकर यांची. भंडारा शहरात बांधकाम क्षेत्रात नावाजलेलं व्यक्तीमत्व, सिमेंट काँक्रिटची घर बांधतांना त्यानी वृध्दांची मनं जोडण्याचा केलेला एक प्रयत्न.
हा ओल्ड गार्ड क्लब आता तीन वर्षाचा झाला. प्रसिध्दीपासून दूर असलेला हा क्लब जेष्ठ नागरिकांना एकत्र करून काही काळ हास्य विनोदात डुंबण्याचा, आपल्या कौटुंबिक समस्यांना काही वेळ तरी विसरण्याचा, आपल्या अंगीचे विविध कलागुण व्यक्त करण्याचं एक व्यासपीठ म्हणजेच ओल्ड गार्ड क्लब.
या ओल्ड गार्ड क्लब मध्ये विविध क्षेत्रातून निवृत्त झालेले ऑफिसर, मेजर, इंजिनियर, शिक्षक वकील, डॉक्टर या सारख्या समाजाच्या विविध क्षेत्रातले जेष्ठ नागरिक सभासद आहेत. महिन्यातून दोन वेळा ठरलेल्या ठिकाणी एकत्र येऊन हास्य विनोद करून एखाद्या विषयावर चिंतन करणे हा एक नेम. या वेळी कौटूंबिक तक्रारी किंवा चर्चा या सदस्यांनी पूर्णपणे टाळाव्यात असा अलिखित नेम प्रत्येक सदस्य पाळत असतात.
अडिअडचणींच्या वेळी आपल्या नातेवाईकांव्यतिरिक्त आपली विचारपूस करणारं अस कुणी आहे ही भावना सदोदीत प्रत्येक सदस्याच्या मनात रहावी असे परस्पर सबंध गेली तीन वर्षे प्रत्येक सदस्य सांभाळून आहे. हास्य विनोद, गाणी, नाचणे यातही हे ओल्ड गार्डस मागे नाहीत. यातील कोणत्याही ओल्ड गार्ड कडे एखादा कार्यक्रम असला की सर्व सदस्यांना त्याच निमंत्रण असतचं. कुणाला बरं नसेल अथवा काही वाईट घडलं तरी हे ओल्ड गार्डस त्याची किंवा कुटूंबियांची आत्मीयतेने विचारपूस करतात.
वर्षातून दोन वेळा सामुहिक सहल (सहपरीवार) हे आगळं वैशिष्टय या ओल्ड गार्ड क्लबने जपलं आहे.
दरवर्षी स्थापना दिनानिमित्त एक वेगळा कार्यक्रम आयोजिला जातो. यात शहरातील नामवंत जेष्ठ नागरिकास आमंत्रीत करून त्यांचा सत्कार करण्याची प्रथा आहे. तसेच क्लबच्या सदस्यांनी सत्तरी ओलांडली की त्यांचा सुध्दा सत्कार केला जातो. तसेच एखाद्या सदस्याने कुठल्याही क्षेत्रात गौरव मिळविला तर क्लब तर्फे यांचं योग्य पध्दतीने सत्कार व अभिनंदन केलं जातं.
वेगवेगळया शहरांतून असे अनेक उपक्रम आपआपल्या पध्दतीने चालतात. भपकेबाजपणाला कुठेही थारा न देता जेष्ठांची मनं राखण्याचा, त्यांना आनंदीत ठेवण्याचा आणि वेळोवेळी सदस्यांना प्रोत्साहित करण्याचा हा एक अभिनव उपक्रम भंडारा शहरात राबविला जातो.
एका वार्षिकोत्सवात एका ओल्ड गार्डनं सादर केलेली ही कविता या ओल्ड गार्ड क्लबची महतीच सांगून जाते.
जेष्ठ नागरिक, ओल्ड गार्ड क्लब, जणू कमळांचे तळे ।
आमचे संमेलन आगळे ॥ धृ ॥
आनंदाच्या सुरेख वाटा, इथे उसळती प्रचंड लाटा ।
नर्तन, किर्तन, वर्तन अवघे दुर्मखतेला फाटा ।
विविध प्रवाहांचा संगम हा, अपूर्व नाते जुळे ॥1॥ आमुचे……….
सर्वांनाच मिळाला असतो, सेवेतुन अवकाश ।
चर्चा रंगून सुखदु:खाच्या, होई मोकळे आकाश ।
अंतिम सत्याचा न भरवसा, पराधीन सगळे ॥2॥ आमुचे…..
ऐनकीतुनी नयने आमुची, सृष्टीरम्यता अनुभवती ।
केस रुपेरी कुठे चांदवा, चमचमतो टकलावरती ।
डाय करूनी मिशा पीळती, हे वेडे की खुळे ॥3॥ आमुचे…..
वार्षिक संमेलन हे तिसरे, प्रमुख पाहुणे सभापती ।
सत्काराचा स्वीकार व्हावा, ही सुह्रदांची शुध्दमती ।
आदरांजली अर्पण करण्या, गीत असे साधेभोळे ॥4॥ आमुचे…….
ही कविता ओल्ड गार्ड क्लबचे सदस्य व आंतरराष्ट्रीय प्रौढ
खेळाडू श्री. भ. वा. तिजारे यांनी सादर केली.
– श्रीकांत तिजारे