गुरु साक्षात पर ब्रह्म

“येषां न विदया न तपो न दानं
ज्ञानं न शीलं गुणो न धर्म:
ते मर्त्यलोके भुवि भारभुता
मनुष्यरु पेण मृगाश्चरन्ति ॥”

हे विचार आहेत मनुष्यत्वासंबधीचे. ज्याच्याजवळ विदया, तप, दान, शील, गुण व धर्म नाहीत असा मनुष्य म्हणजे पृथ्वीला ओझे असणारा, मनुष्यरुपातील पशूच होय, असा या वचनाचा अर्थ. म्हणजेच वर उल्लेखिलेली सात साधने मनुष्यत्व घडवणारी आहेत आणि ही सात साधने एकत्र करुन त्यास योग्य असा जो शब्द म्हणजे ‘शिक्षण’ होय.

‘पाहावे आपणासी आपण’ असे ज्ञानाचे रामदासांनी केलेले वर्णन म्हणजे शिक्षणाचे मांडलेले उद्दीष्टच आहे. स्वत:ची ओळख पटणे म्हणजेच शिक्षण होय. प्राण्याप्रमाणे जन्मलेल्या मनुष्याला देवत्वाच्या वाटेवर पोचवणारी प्रक्रिया म्हणजे शिक्षण, स्वत: सुखी राहून इतरांना सुखी बनविण्याची क्षमता किंवा शक्ती अंगी आणण्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे शिक्षण, आरोग्यापासून आनंदांपर्यत सर्व गोष्टींचा लाभ करुन घेण्यासाठी केलेल्या सर्व प्रयत्नांनाच शिक्षण म्हणता येईल. पण या ख-या शिक्षणापासून आजचे शिक्षण किती दूर आहे? हे अंतर कोणत्याही एककामध्ये मोजता येणार नाही. असे शिक्षण देण्यासाठी जर कुणी प्रयत्न करायला हवेत तर ते म्हणजे पालक, शिक्षक आणि समाज. यापैकी पालक व समाज हे दोन घटक तर नैसर्गिकच आहेत पण शिक्षक म्हणजे अध्यापकत्व हे औपचारीक आहे.

विदयार्थ्यांच्या शिक्षणाचे दायित्व आपणहून म्हणजेच स्वेच्छेने स्वीकारणारा घटक म्हणजेच ‘अध्यापक’ किंवा ‘शिक्षक’, हाच या ख-या शिक्षणात महत्वपूर्ण घटक आहे. अध्यापकत्वाचे प्रशिक्षण महाविदयालयांतून मिळते आणि ते घेणे किंवा न घेणे हे घेण्या-याच्या इच्छेवर अवलंबून असते. पुन्हा तसे प्रशिक्षण घेतल्यावरही अध्यापकाचे काम करावे किंवा नाही हे देखिल स्वच्छेनेच ठरविता येत असते. म्हणूनच शिक्षकांकडून, ज्यांना भारत देशांत ‘गुरु’ चे स्थान दिले जाते, त्यांच्याकडून होणा-या शिक्षणदानांत किती शुध्दता असते किंवा असावी याची चर्चा 5 सप्टेंबर, शिक्षक दिना निमित्ताने होणे अतिशय महत्वाचे आहे.

शिक्षणांमधून मूल्ये घडविण्याचा प्रयत्न अपेक्षित असतो. आणि हा प्रयत्न शिक्षकांनी करणेच योग्य असते. प्रत्येक विदयार्थ्याची मानसिकता व मूल्ये परपस्परावलंबी असतात आणि या दोन परपस्परविरोधी भूमिंकांमध्ये सर्वांची ओढाताण होताना दिसते. आज प्रत्येक विदयार्थ्याला इतरांचा विचार करुन किंवा भावना जपून, समूहाचे सुखदु:ख कशांत आहे, त्या दृष्टीने त्याने काय व कसे वागावे हे ठरविण्यापेक्षा, माझे कसे ठिक होईल एवढेच पाहणे आज सर्वांना पुरेसे वाटते, तर हा दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे. अन्यथा व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र आणि जग अशा सर्व पाय-यांशी संपर्क राखून व्यक्तिंचे शिक्षण होण्याऐवजी मधल्या सर्व पाय-या गाळून व्यक्ति ते जग असा थेट संबंध राखण्याची नवी निती मुलांना आत्मसात करावी लागेल आणि ते आपल्या समाज आणि देशाच्या दृष्टिने घातक असेल आणि या सर्वांला शिक्षक हा घटकच जबाबदार असेल.

एकविसाव्या शतकात परिश्रम, कष्ट हे शब्दच अदृश्य झाले आहेत. घराघरांत असण्या-या भौतिक साधनांच्या उपलब्धतेमुळे विदयार्थी असो वा शिक्षक कष्ट करण्याची सवयच दिसेनाशी झाली आहे. ‘स्वच्छता’ हा शब्द प्रत्येक शाळेत पाहायला, ऐकायला मिळतो पण ही स्वच्छता राखण्यासाठी विदयार्थी आणि शिक्षक एकत्र मिळून झाडलोट करतात हे चित्र आज दुर्लभ झाले आहे. उलट विदयार्थ्यांनी शाळेत स्वच्छता केली तर पालकांनाच न आवडण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच आज अनेक खेडयांत बालश्रमिक, बालमजूर तर शहरी भागांत कामाला हातही न लावणारी मुले अशी दोन टोके दिसतात. म्हणूनच परिश्रमाची सवय नसलेले विदयार्थी व शिक्षक हे आजच्या शिक्षण व्यवस्थेचा रोग आहे. आणि हे अनारोग्य दूर करण्यासाठी शिक्षकांनी स्वत:ला तयार करणे अतिशय गरजेचे आहे.

प्रत्येक शाळेत ती शहरी भागांतील असो वा ग्रामिण भागांतील, पसरलेले आणि वाढत जाणारे स्पर्धा युगाचे जाळे प्रथम थांबविणे गरजेचे आहे. कारण ज्या परिक्षांनाच काही अर्थ नसतो त्या परिक्षेतील गुणांना खरे तर काय किंमत असणार? पण ते गुण मिळण्या न मिळण्यावरच जणू आयुष्य अवलंबून आहे असे जे शिक्षक वर्गाकडून विदयार्थ्यांच्या मनावर बिंबवले जाते आणि त्यासाठी मुलांना खाजगी शिकवण्या लावल्या जातात, त्यासाठी पालक वर्गाकडून लाखो रुपये खर्च केले जातात, अशा या शिक्षणदानाची शुदधता कशी पडताळून पाहायची ? आणि ‘गुरु’ मानलेल्या शिक्षकावर विश्वास ठेवायचा कि नाही, ठेवला तर काय अपेक्षित ठेवायचे, कोणती मूल्ये विकसित करण्याची आशा करावी या सर्व गोष्टींचा विचार अंतर्मुख होऊन करणे आवश्यक आहे.

गुरुकृपेवीण अधोगती असे म्हणून रामदासानी शिक्षण व संस्कार प्रक्रियेतील गुरुचे स्थान अपरिहार्य ठरविले आहे. परंतु तेवढयाच पोटतिडकीने समर्थांनी गुरुंच्या कर्त्यव्याविषयीचे कठोर व परखड प्रतिपादन केले आहे. अनेक शिक्षणवेत्यांनी वर्णिलेल्या शिक्षण पदधतीतील शिक्षक या घटकाची उध्दीष्टे म्हणजे धर्माचरणाच्या भूमिकेने अध्यापन कार्य करणारा म्हणजे शिक्षक, शिष्याची कठोर परिक्षा घेणारा, तरीही त्यांच्यावर पुत्रवत प्रेम करणारा म्हणजे शिक्षक, शिष्याच्या इंद्रियसुखापेक्षा ज्ञान लालसा वाढविण्याची काळजी वाहणारा म्हणजे शिक्षक, अहोरात्र अध्यापकाचीच भूमिका बजावणारा, व्यक्तिगत जीवनाचा स्वतंत्र कप्पा नसणारा म्हणजे शिक्षक पण ही उद्दिष्टे आजच्या शिक्षण पदधतीतील शिक्षकांच्या बाबतीत लागू पडताना दिसत नाहीत. आज अध्यापन म्हणजे शिक्षकांसाठी एक पोटापाण्याचा विचार बनला आहे. आपले पोटपाणी भागवत असताना राष्ट्रहितासाठी मनुष्य घडणीचे सर्व शिक्षण देणारा शिक्षक निर्माण होणे आवश्यक आहे. आज शिक्षकांना कधी कधी तर आपल्याच शिष्यांच्या परिक्षेला न उतरण्याची लाजही वाटेनाशी झाली आहे. स्वत:चे कौशल्य आणि अभ्यास अद्दयावत ठेवणारा, वर्धिष्णू ठेवणारा शिक्षक निर्माण होणे आवश्यक आहे. भौतिक साधनांची रेलचेल झाल्यामुळे स्वत:ला व विदयार्थ्यांना शारीरीक श्रम होऊ नयेत म्हणून जपणा-या शिक्षकांनी विदयार्थ्यांना व स्वत:ला देखील भरपूर परिश्रम करु देवून, अभ्यासासाठी कष्ट घेण्यास, प्रोत्साहन दिले पाहिजे. आज शिक्षक हे फारतर शाळा महाविदयालयांच्या परिसरांतच आढळून येतात, पण खरे तर विदयार्थ्यांच्या सन्मानाची, बुध्दिमत्त्तेची यथायोग्य काळजी घेण्यासाठी, विदयार्थ्यांच्या गुणवत्ता संपादनाची महत्वकांक्षा जपण्यासाठी, समाजाच्या प्रत्येक स्तरावर, परिसरांत, गल्लीबोळांत शिक्षकांची गरज आहे. संयम, धर्माचरण इत्यादींचा विदयार्थ्यांशी थोडाही संपर्क येऊ नये याची कसून काळजी आज शिक्षकवर्गाकडून घेतली जाते. कारण, धर्म या शब्दाच्या विचित्र संकल्पनेचा मनांवर बसलेला पगडा. पण जन्म आणि मृत्यू या दोन व्यक्तिविकासाच्या निती लक्षांत घेतल्या तर प्रत्येक व्यक्तिचा आपल्या कुटुंबियांशी किंवा समाजाशी जो संपर्क असतो तो संपर्क ज्या कृतीमधून व्यक्त होत असतो, ती कृती म्हणजे धर्म आणि म्हणूनच धर्माने वागणारी व्यक्ती ही समाज घडवत असते, समाजाचे स्वास्थ्य वाढवित असते, म्हणून धर्माचरण शिकवणारे शिक्षण हेच खरे शिक्षण, हे ध्यानांत घेवून शिक्षकांनी स्वत: उपासना, चिंतन, वाचन, स्वाध्याय, प्रवचन यांचे व्रत घेतले पाहिजे. मुलामुलींतील प्रवृत्तीप्रमाणे शिक्षणातील भेद ओळखून त्याप्रमाणे मार्गदर्शन केले पाहिजे, स्वत:च्या ज्ञानोपासनेचे उदाहरण घालून दिले पाहिजे. आणि हे सर्वच आजच्या शिक्षकांकडून प्रत्येक विदयार्थ्याने अपेक्षित ठेवले पाहिजे तरच शिक्षक दिनांच्या दिवशी म्हटलेले

“गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु देवो महेश्वरा ,
गुरु साक्षांत परब्रह्मा:, तस्मै श्री गुरुवे नम:”

हे वचन खरे ठरलेले दिसेल.

– कु. वैशाली सु. कोरगांवकर