शब्दांचं Salad

salad कसं solid वाटतं ना? कोशिंबिरीसारखं कांदा, टॉमॅटो,….. भरवल्यासारखं नाही वाटत? पण सलाडचा का? भेळ, मिसळ किंवा खिचडी का नाही? सिंपल! भेळपुरी, मिसळ is down market खिचडी शुध्द तुपातली असली तरी कशी मध्यमवर्गीय करडया ब्राह्मणी शिस्तीची वाटते. salad is rather liberal and upmarket. म्हणून saladच! पुन्हा त्याच्या देशी भावंडांसारखे खाल्ल्यावर ढेकर येत नाही. salad कितीही खा. पोटही भरत नाही. किंवा अजिर्णही होत नाही. no problem!

मला वाटतं, salad हा प्रकार upmarket होण्या आधी वडापाव, पावभाजी इ. इतर ‘धंदेल’ प्रकारांसारखा गरीबाघरचा शोध असावा. म्हणजे, ज्या घरी तऱ्हतऱ्हेच्या पंचपक्वानांची आरास नसेल, त्याने पोटाची कामापुरती सोय म्हणून, (पोटात काटे भरण्याऐवजी किंवा भरण्याआधी) उरला सुरला पाला, कडधान्यं, टरफलं वगैरे किडुकमिडूक गोळा करून इतरांवरच्या रागाबरोबर निमूट गिळून टाकांव- त्याच प्रमाणे ज्याच्याकडे तुटपुंजी भाषासंपत्ती असावी अशा एखाद्याने वेळ मारून नेण्यासाठी, आपल्या विरलेल्या चादरीच्या फाटक्या जागा मिळेल त्या ठिगळांनी झाकून टाकाव्यात त्या प्रमाणे, आजूबाजूचे मिळतील, हाताला लागतील ते शब्द मिसळून शब्दांच्या salad चा प्रघात पाडला असावा. आणि हल्ली कसे, ठिगळ लावलेले कपडे fashionable वाटतात, तसंच शब्दांचं salad ही upmarket झालं आहे. नाहीतरी आजच्या युगात music काय, किंवा ideas काय, एकजात जमेल तिथून डल्ला मारून, गल्ला भरण्याची वृत्ती बोकाळली आहे. मग भाषेचंच salad का नको?

आता salad म्हटलं की त्यात विविधता आलीच.

देशी salad कुठल्याही दोन-तीन भारतीय भाषांची मिसळ करून त्यात चवीपुरता हिंदीचा हिंग घातली की झालं देशी salad. ‘आयला हे पब्लिक लय ईब्लिस आहे.’ किंवा ‘एक कान के नींचे खिंचूंगा ना तो पानी पन नहीं मांगेगा।’ हे असं तुम्हाला कुठेही रस्त्यावरच्या सस्त्या नाक्यावर मिळेल. पण जरा जपून. चटकदार भेळपुरीसारखी चटपटीत चव असली तरी कांद्यासारखा देशी वासही तोंडात रेंगाळत बसेल.

विदेशी salad-English as a base is a must. खरं तर English चा घोडा स्वत:च वारा प्यायल्यासारखा जोरात दौडवावा- अडेपर्यंत. अडला तर मधून मधून हिंदी किंवा मराठीचा चारा घाला की पुन्हा दौड सुरू. “She is so Ghati Yaar’ किंवा ‘She lagaos any Dhaap to anybody” पण हे तुम्हाला सहसा रस्त्यावर नाही मिळणार. class मिटिंग्जमध्ये कॉकटेल सोबत खायचं असतं. सहाजिकच महागही असतं. आपली पत नसेल तर ऐपतही होत नाही, झेपतही नाही.

Low Calory Salad हे बहुत करून तरूण वर्गासाठी असतं. college canteen मध्ये सहज व मुबलक मिळतं. Hi, Babe, Dol, Dabs (म्हणजे, Dabholkar), Rags (म्हणजे, Raghav) असं जमेल तेवढं latest short forms and trendy mix असतं. छोटे छोटे energy saving words असल्याने कितीही व कसेही खा. कसं fresh नि हलकं हलकं वाटेल. Hot, split, pile on, connect, con आदी चार अक्षरी इंग्रजी चारोळया मुबलक पसरा. या वयात कपडे कसे छोटे, छोटे शब्दही सहज पचून जातात.

High Calory Salad आपल्या नेहमीच्या आहारात शब्द जरा थोडे अरबट-चरबट, अचकट-विचकट, (डांबिस, हलकट, निगरगट्ट असे तेलकट) असे शब्द liberally mix करा. तप्त रागाला उकळत्या तेलाची फोडणी द्या. डोळयांच्या अंगारावर शेका नि मग गट्ट करा. यात खास चार अक्षरी ‘तळागाळात’ (म्हणजे प्रत्येक भाषेच्या तळाला जो गाळ उरतो, व ज्याला गुजरातीत योग्य अर्थाने ‘गाळ’ म्हणतात, ते) शब्द जरूर वापरा हे तुम्हाला कदाचित इतकं आवडेल की आपसूक तुमचे हात तुमच्या कानावर जातील. (एका कानातून शिरलेले, रूंजी घालणारे शब्द, दुसऱ्या कानातून निसटून जाऊ नयेत म्हणून) फक्त as an after effect, दोन दिवस पोट, (मन) हुप्प होऊन बसेल- नि कदाचित करपट ढेकरही बरेच येतील- पाहा. मर्जी तुमची!

Veg Salad म्हणजे, शुध्द पुणेरी मिसळ. फार तर थोडया लाडक्या घडीच्या शहरी शिव्या कोथिंबिरीसारख्या पसरल्या नि वाटल्यास अस्सल पुणेरी उपरोधाचं लिंबू पिळा. कसं फक्कड लागतं बघा. पण जर रेसिप चुकली व पुणेरी जोडे खायची वेळ आली ती पण अर्वाच्य शिवीगाळासकट, अगदी family pack तर ते मात्र non-veg salad होतं, असं आपल्या लक्षात येईल.

या सलाडस् मध्ये घातलेली व्यंजनेही वेगवेगळी असतात. काही शब्द असतात क्रिस्प, कुरकुरीत. तर काही खडयांची भेसळ असल्यासारखे कचकचीत. खाताना दातात येऊन खाण्याचा मजा ‘किरकिरा’ करणारे. काही स्निग्ध, गुलगुलीत फ्रुट सलाडसारखे तर तर काही नर्मदेतल्या गोटयासारखे गुळमुळीत, निसटून जाणारे. काही चावट तर काही आंबट. काही सुरणासारखे घशाला टोचण खाज आणणारे तर काही घशातच अडकणारे आवंढयासारखे पुन्हा केवळ घटक शब्द एकत्र येऊन सॅलड होतं, असंही नाही. उत्तम सॅलड बनायला लागतं. बनणाऱ्याचं त्यातील व्यंजनांविषयीचं सखोल ज्ञान व त्याचं स्वत:चं पाककौशल्य, नि कल्पनाशक्ति व सृजनशील शक्ति यांनी त्यात तो जसा पाहिजे तसा रंग मिसळू शकतो. प्रेमाचे, आनंदाचे, लोभाचे रागाचे रंग. त्यात भावनेचा ओलावा, अक्कलहुशारीचा ताजेपणा, आल्या प्रसंगाच्या औचित्त्याचं मीठ नि कळकळीचे कढ आणून तो एक उत्तम पक्वान्न करू शकतो. अर्थात चुकूनमाकून द्वेषाचा विखारही मिसळला जातो. मग त्यामुळे खाणा-याचं मन जरी मेलं नसलं तरी ‘काळंनिळं’, कुजकट व्हायला वेळ लागत नाही. म्हणजेच सॅलड हा प्रकार सर्वस्वी करणाऱ्याच्या हातात असतो. शब्दांचं वैयक्तिक किंवा एकत्रित सामर्थ्य एवढं अमर्याद आहे, – द्रौपदीच्या थाळीप्रमाणे त्यातून अगणित कॉम्बिनेशन्स अविरत सर्व्ह करता येतात.

– यतीन सामंत