लेझिम नृत्याचा छणछणाटात बाप्पाची मिरवणूक आणि नवचैतन्य वटिकेची जादू अमेरिकेतल्या इलिनॉय राज्यातील ब्लुमिंग्टन् मराठी मंडळाने यंदा आपला ६ वा गणेशोत्सव मोठया उत्साहाने साजरा केला.
गणेशोत्सवात मंडळाच्या वतीने काही करमणुकीचे कार्यक्रमही आयोजित केले होते. मुख्य आकर्षण होते लेझिम नृत्याच्या छणछणाटात निघालेली बाप्पाची मिरवणूक… आणि पद्माकर डावरे लिखित आणि चंद्रशेखर वझे दिग्दर्शित ‘कायापालट’ ही तुफान विनोदी एकांकिका… आहे त्या वयापेक्षा खूपच तरुण करण्यासाठी या नाटकातील मुख्य पात्र डॉ. संजीवन यांच्या ‘नवचैतन्य वटिका’ या गोळयांच्या सेवनाने घडणारे गमतीदार प्रसंग…. आणि रसिक प्रेक्षकांनी हास्याच्या विस्फोटाने भरभरून देलेली दाद… यानंतर सुनिल मुंडले आणि त्यांचे सहकारी यांचे बुजगावणे नृत्य तर लाजवाबच होते !
अंजना भातखंडे यांनी बसवलेल्या ‘या वाऱ्याच्या बसुनि विमानी, सहल करूया गगनाची…’ तसेच अश्विनी देशपांडे यांनी बसवलेल्या ‘शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा.. ‘ या गाण्यावर बच्चे कंपनीने नाटक करून अगदी धमाल उडवून दिली. संत तुकाराम, शिवाजी महाराज व श्यामची आई यांच्या गोष्टी छोटया दोस्तांकडून सादर करून घेतलेल्या दीपा जोशी यांनी.
पाच वर्षापूर्वी ब्लुमिंग्टन या गावात मराठी कुटूंबे कामानिमित्त आली आणि काही उत्साही मराठी प्रेमी मंडळींच्या पुढाकाराने दि. १२ फेब्रुवारी, २००० रोजी रथसप्तमीच्या दिवशी श्री. डॉ. देऊसकर यांच्या घरी ‘परिचय’ अर्थात ओळखी करून देण्याचा कार्यक्रम झाला आणि या ‘ब्लुमिंग्टन् मराठी मंडळा’ ची स्थापना झाली. ब्लुमिंग्टन व नॉर्मल आणि आसपासच्या परिसरातील मराठी भाषिक मंडळींची निखळ करमणूक व्हावी हा हेतू या मंडळाच्या स्थापनेमागे होता.
‘बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा’, महाराष्ट्रापासून, किंबहूना भारतापासून शेकडो मैल अमेरिकेत आल्यानंतर प्रत्येक मराठी माणसाच्या मनात या काव्यपंक्ती नक्की रूंजी घालतात. भारतापासून, आपल्या प्रियजनांपासून शेकडो मैल अमेरिकेत आल्यानंतर प्रत्येक मराठी माणसाच्या मनात या काव्यपंक्ती नक्की रूंजी घालतात. भारतापासून, आपल्या प्रियजनांपासून शेकडो मैल दूर आल्यानंतरही मराठी संस्कृती, आपले सण साजरे करण्याची उर्मी आणखीनच वाढते असंच म्हणायला हवं.
मुंबई आणि महाराष्ट्रभर अलिकडेच जी पूरपरिस्थिती उद्भवली होती, त्या बांधवांना खारीची मदत म्हणून यावेळी मंडळातर्फे निधीही जमा करण्यात आला. हा निधी महाराष्ट्र राजाच्या मुख्यमंत्री निधीकडे सुपुर्द करण्यात येणार आहे. अविनाश टकले आणि प्रिया केसकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.
आपण आपल्या येथे गणेश उत्सव कसा साजरा केलात हे जरूर कळवा.