मन या घराचा पाया सुसंस्कार, शिस्त, शिकवण यांनी पक्का बांधलेला नसेल तर हे घर डळमळीत व्हायला वेळ लागत नाही. मानसिक बल, शक्ति, सामर्थ्य यांनी हे घर चिरेबंदी झाले असेल तरच वादळ वारा, संकटे आपत्ती यांना तोंड देऊ शकते. या मनाच्या घराला स्नेह, माया, ममता, वात्सल्याच्या भिंती नसतील तर त्या नुसत्याच उभ्या असतात बाहेरून रंगरंगोटी केलेल्या आणि आतून चिंतेच्या एकाकीपणाच्या वाळवीनं पोखरलेल्या. या घराला माता-पिता, बहिण-भाऊ यांच्या आधाराचे छप्पर जर लाभले नाही तर आयुष्यभर चंद्रमौळी घर बनून जाते. या घराला सुविचार, निश्चय, संयम, संस्कारांचे पक्के खांब नसतील तर घर कोसळायला वेळ लागत नाही.म्हणून या घराचे बांधकाम जेवढे मजबूत हवे. तेवढेच हे नितळ पाण्यासारखे सदैव स्वच्छ, अमलीन ठेवण्याचा आपण प्रयत्न करायला हवा. शुध्द, सत् शील भाव-भावनांनी त्याची वारंवार मरम्मत करायला हवी. देवघराचा गाभारा तर पावित्र्याच्या सुगंधाने दरवळायला हवा. वाचन, मनन, चिंतन या त्रिमूर्तींना आपल्या घरात वास्तव्याला बोलवायला हवे. उपकार परोपकाराचे वारे या घराच्या कोप-याकोप-यांतून खेळले पाहिजे. ज्ञान-विज्ञान या अतिथींची सदैव ये-जा व्हायला हवी. इथे कला, साहित्य, गीत, संगीत यांच्याही पंक्ति उठायला हव्यात. तरच या घरात सदानंदाचा वास राहील.
या मनाच्या घराला असणारे देहाचे अंगण सुध्दा सदैव स्वच्छ निरोगी ठेवायला हवे. रोजच अंगणात सडा रांगोळी करून शुचिर्भूतता राखली पाहिजे. देहाची देणगी लाभली म्हणूनच मनाचे घर उभे आहे. हे अंगणच जीवनाचा आधार असताना त्याच्या तन्दुरूस्तीकडे आपण कितीसे लक्ष देतो? जेव्हा या अंगणात आजारपणाची वावटळ उठते, तेव्हा आपण जागे होतो. या अंगणात आरोग्यदायी वाटिका असायला हवी. तिला नित्य ठराविक वेळेत व्यायाम आहाराचे खतपाणी घालायला हवे. वृक्ष बनण्याच्या आत व्यसन, वाईट सवयींचे तृणांकुर उपटून टाकायला हवेत. या अंगणातील कच-याचे, टाकाऊ पदार्थांचे व अशुध्द पाण्याचे वेळच्या वेळी उत्सर्जन व विसर्जन व्हायला हवे. याला मर्यादा, संयम, नीतीचे कुंपण घालायला हवे. खरं तर घराची आणि अंगणाची स्वच्छता करून त्यांचे पावित्र्य राखणे केवळ आपल्याच हाती असते. ही चांगली सवय अंगवळणी पडू द्यायला हवी.
केवळ बाहेरील अंगण स्वच्छ करून चालत नाही तर मनाच्या घराची स्वच्छता सुध्दा आवश्यक आहे आणि त्यातील देवघराची सुध्दा. मग हाच संकल्प आपण सर्वानी करू या. यासाठी मुहूर्त बघायला नको की आलेला क्षण वाया घालवायला नको. तर करा सुरवात आपले मनाचे घर आणि देहाचे अंगण शुध्द, स्वच्छ, शूचिर्भूत करायला हाच असू द्या संकल्प जीवनभराचा…
– हेमलता चंद्रकांत भुरके