विरार येथील ‘विज्ञाननिष्ठ’ नॅशनल इंग्लिश स्कूल

‘वेलू गेला गगनावरी’ या गाण्याचा अर्थ सार्थ करणारी विरारसारख्या एकेकाळी मागास असलेल्या गावातील शाळा म्हणजेच नॅशनल इंग्लिश स्कूल. अवघ्या तीन-चार खोल्यांमध्ये शिक्षणासारखे पवित्र काम सुरू करून तसेच येथील समाजाला दिशा देण्याचे उद्दिष्ट डोळयासमोर ठेवून या शाळेची स्थापना 1970 साली या शाळेचे संस्थापक व स्वत: हाडाचे शिक्षक असलेले परशुराम कुलकर्णी यांनी या शाळेची मुहूर्तमेढ रोवली. आर्थिक पाठबळ नसतानाही आणि या पाठबळाची अपेक्षाही न करता अथक परिश्रम करून या शाळेचा हळूहळू विस्तार ते करत राहिले. परशुराम कुलकर्णी यांनी या कामी मोलाची साथ लाभली ती आपल्या बहिणीची. दिवसाचे चौवीस तास फक्त शाळेच्या विस्ताराचा आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणांचा विचार या पलिकडे त्यांनी दुसरा विचार केला असेल असे वाटत नाही. सुरूवातीला 27 मुलांपासून सुरू झालेल्या या शाळेत आजमितीस किमान 5 हजाराच्यावर शाळेत विद्यार्थी शिकत आहेत. या शाळेची 1985 ला पहिली दहावीची बॅच बाहेर पडली. तीन-चार खोल्यांमध्ये सुरू झालेला हा प्रवास आता प्रशस्त असे खेळण्यासाठी मैदान आहे. या मैदानातच बाजूला बाग आहे त्या बागेतील फुला-फळांची झाडं आहेत तेही विज्ञानाची भाषा बोलतात. प्रत्येक झाडं हे वैज्ञानिकदृष्टया लावले गेले आहे. त्या झाडांमध्ये अनेक प्रकारची केळी, चिकू तसेच अनेक जातीची झाडं आहेत. त्या सर्वांची माहिती वेळोवेळी मुलांना करून दिली जाते. जेणेकरून त्यांना त्याचा फायदा शैक्षणिकदृष्टया मिळू शकतो. लहान मुलांसाठीही खेळण्यासाठी अनेकप्रकारची मॉडेल इथे तयार करून ठेवली आहेत. यात रेल्वेच्या इंजिनाची प्रतिकृती, इग्लूंच्या घराची प्रतिकृती अशा विविध प्रतिकृती तयार केल्या आहेत जेणेकरून त्यांना त्याची माहिती व्हावी हाच त्यामागील उद्देश आहे. सुरूवातीला शाळेत इतर छंदांबरोबर नाटय शिबिरं, मैदानी खेळ, बौध्दिक क्षमतेच्या स्पर्धा परीक्षा अशा क्षेत्रात मुलांना भरपूर वाव देण्यात येत होता. याच काळात परशुराम कुलकर्णी यांचे पुत्र दीपक कुलकर्णी हे मुंबईत डीएड करत होते त्याचबरोबर ते मुंबईतील नाटयसंस्थांशी संबंधित संस्थांतील नाटकांमध्ये काम करत. एकेदिवशी परशुराम कुलकर्णी यांना आपल्या घरातच एका अनमोल रत्नाचा शोध लागला. त्या रत्नाला त्यांनी एकेदिवशी शाळेत पाठ शिकवायला लावला. मुलांनी तो अत्यंत एकाग्रतेने ऐकला. झाले त्या दिवसापासून शाळेची जबाबदारी त्या रत्नाकडे हळूहळू वाढवण्याचा निर्णय परशुरामांनी मनात आणला आणि त्याची अंमलबजावणीही केली. आणि याच रत्नाने आज शाळेचे नाव शिखरावर कसे पोहोचवता येईल आणि वडिलांनी टाकलेला विश्वास कसा सार्थ करून दाखवता येईल याचा ध्यास घेतला आहे. आणि त्याच रत्नाचे नाव आहे दीपक कुलकर्णी. हे दीपकसर आज शाळेचे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत.

त्यांनी शाळेत विज्ञानावर प्रचंड भर देण्याचे उद्दिष्ट आखले आहे आणि त्या दृष्टीने ते सदैव कार्यरत असतात. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे निव्वळ पुस्तकी ज्ञान मुलांच्या दृष्टीने उपयोगी नाही तर प्रॅक्टीकल ज्ञान अत्यंत उपयोगी पडत. नुसत्या भिंती रंगवून चालत नाही तर त्या भिंती बोलल्या पाहिजेत असेही त्यांना वाटते. त्यांनी शाळेतील प्रत्येक भिंतीवर मुलांना उपयोगी पडेल व त्यांच्या पुस्तकात असणाऱ्या धडयांवर आधारित चित्रे त्यांनी प्रत्येक भिंतीवर स्वत: शाळेतील मुलांच्या सहाय्याने बनवली आहेत. मुलं गॅलरीत फिरताना नुसतीच फिरू नयेत तर त्या चित्रांकडे बघून त्यांनी काहीतरी शिकाव हाही त्यामागील उद्देश आहे. ज्युरासिक पार्क हा सिनेमा आल्यावर डायनासोरची प्रचंड लाट आपल्या देशात आली होती. नुसता डायनासोर बघून त्याबद्दलची माहिती मिळत नाही म्हणून दीपक सरांनी अनेक डायनासोरांची माहिती मिळवली व ती माहिती मुलांना कळावी यासाठी त्यांनी विविध जातीचे डयनासोर स्वत: मुलांच्या सहाय्याने तयार करून व त्यांची माहिती सांगण्यासाठी मुलांनाच तयार करून त्याची प्रदश्रने खेडयापाडयातील शाळांमध्ये लावली. त्याचा फायदा अनेक खेडयापाडयातील मुलांना नक्कीच झाला कारण माहिती सांगणारी मुलं ही त्या मुलांच्या वयाचीच असल्याने त्यांच्यामध्ये सुसंवाद चांगल्या प्रकारे झाला आणि त्यांना डायनासोर म्हणजे काय, तो काय खायचा, कसा झोपायचा, तो मांसाहारी होता की शाकाहारी अशी अनेक प्रकारची माहिती मिळाली. त्यानंतर दीपक सरांनी अंधश्रध्देवर नाटक बसवून गावातील लोकांचा असलेला अंधश्रध्देवरचा विश्वास मोडून काढण्यास हातभार लावला. यासाठीही मुलांचीच मदत घेण्यात आली. मुलं बाबा लोकांप्रमाणे अंगारे धुपारे, हातावरून पेटती मशाल फिरवून दाखवणे, कापूर खावून दाखवणे, उदी काढणे असे प्रकार करवून दाखवत त्यामुळे अंधश्रध्देवर मात करण्यात ही मुलं यशस्वी झाली.

पक्षी प्रदर्शनही भरवण्यात आले होते त्यासाठी अभयारण्याची प्रतिकृती तयार करण्यात आली होती ज्याद्वारे मुलांना आपण जंगलातच फिरतो आहे असे वाटावे त्यासाठी 20 फुट उंचीचे भव्य पक्षी, झाडं तयार करण्यात आली यासाठी गोणपाट, झाडांची मुळं, पानं बनवण्यासाठी प्लॅस्टिकचा उपयोग करून भव्य असं प्रदर्शन तयार करण्यात आलं होतं तेही इतर शाळांतील मुलांसाठी खुले ठेवून त्यांनाही याचा आनंद लुटण्याची संधी शाळेने दिली होती. 1994 साली अमेरिकास्थित असोसिएशन सायन्स ऍण्ड टेक्नॉलॉजीने उत्कृष्ट विज्ञान शिक्षक म्हणून दीपक सरांची निवड केली होती. तसेच २००१ मध्ये नेहरू सेंटरतर्फेही त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.

शाळेतील प्रत्येक शिक्षक हा मुलांकडून प्रत्येक विषयाची तयारी करून घेत असतो. स्पर्धा परीक्षांवर तर अथक परिश्रम शिक्षक करतात. मग ही प्रज्ञाशोध विज्ञान परीक्षा असो व शिष्यवृत्ती परीक्षा किंवा दहावीची परीक्षा. सदैव शिक्षक मुलांचाच विचार करत असतात. आज शाळेतील मुलं तालुक्यातील प्रत्येक स्पर्धेत तसेच तालुक्याबाहेरील इतर स्पर्धांमध्ये भाग घेऊन शाळेची शान वाढवत असतात. २००२ मध्ये मॅकडोनाल्ड नेहरू सायन्स क्किज स्पर्धेत 64 शाळा सहभागी झाल्या होत्या त्यामधून या शाळेला बक्षिस मिळाले. हे बक्षिस भाभा अणुशक्ती केंद्राचे वैज्ञानिक चिदंबरम यांच्या हस्ते देण्यात आले होते.

सायन्स क्लब
शाळेत सायन्स क्लब नावाने एक क्लब स्थापन करण्यात आला आहे. या क्लबमध्ये 200 मुलांना सहभागी करून घेण्यात येते. या क्लबसाठी नाममात्र 20 रूपये फी आकारण्यात येते, या क्लबमध्ये सहभागी झालेल्या मुलांकडून सायन्सचे अनेक प्रोजेक्ट तयार करून त्याबद्दलची संपूर्ण माहिती तयाच मुलांकडून तयार करून घेतली जाते जेणेकरून एखाद्याला ती समजावून सांगायची असेल तर तो विद्यार्थीच ती माहिती सांगू शकला पाहिजे. शाळेमध्ये सायन्स क्लबद्वारे बोर्नविटा सायन्स क्किज स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्यात क्लबमधील विद्यार्थ्यांनी सहभागी करून घेण्यात येते. सायन्स क्लबमध्ये मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी अनेक मान्यवर वैज्ञानिकांची व्याख्याने आयोजित केली जातात त्याद्वारे मुलांना जगात काय घडते आहे याची महिती मिळण्यास मदत होते. सायन्स क्लबमध्ये लिहिण्याची तसेच ओरल क्किज घेतली जाते, संदर्भ लायब्ररीही मुलांसाठी बनवण्यात आली आहे त्यात कोणी कधी शोध लावला, त्याची जन्मतारीख काय, त्याने कोणता शोध लावला, त्या शोधाबद्दलची संपूर्ण असे अनेक पुस्तके आज लायब्ररीत मुलांसाठी आणून ठेवण्यात आले आहेत त्यामुळे मुलांना प्रोजेक्ट बनवण्यासाठी खूप मदत होते. सुट्टीच्या दिवसातही मुलांची कार्यशाळा आयोजित करण्यात येते जेणेकरून त्यांना विज्ञानाची माहिती व्हावी. विज्ञान क्लबमध्ये स्लाईड शोद्वारेही मुलांना माहिती करून दिली जाते. विज्ञान शिक्षक आणि आमंत्रित विज्ञाननिष्ठ यांचे मार्गदर्शन व दृश्यमाध्यमाद्वारे दाखवण्यात येणारे स्लाईड याद्वारे या मुलांना त्याची माहिती समजावून सांगितली जाते. विज्ञान दिनाचे औचित्य साधून दरवर्षी 28 फेब्रुवारीला विज्ञानावर आधारित नाटिका सादर करण्यात येते. शाळेने एक मोबाईल व्हॅन तयार केली आहे त्यात फिरते विज्ञान प्रदर्शन दाखवले जाते. खेडोपाडी ही मोबाईल व्हॅन नेली जाते. खेडोपाडी ही मोबाईल व्हॅन नेली जाते. त्यात अनेक प्रकारची उपकरणे आहेत. जिल्हा परिषदा, नगरपालिकांमधील प्रत्येक शाळेत प्रयोगशाळा आहेच असे नाही. त्यामुळे मुलांना प्रयोग करून बघता येत नाहीत. नॅशनल स्कूलने मोबाईल व्हॅनमुळे ही सोय तेथील मुलांसाठी उपलब्ध करून दिली आहे.

इतर उपक्रम
आज शाळेत सुसज्ज अशी संगणक खोली तयार आहे. यात मुलांना दररोज 1 तास तरी शिकवले जाते. त्याचबरोबर संदर्भ ग्रंथांसाठी वाचनालयही तयार करण्यात आले आहे. त्यात धोंडो केशव कर्वेंपासून आजकालच्या अशोक नायगावकरांपर्यंत अनेक साहित्यिक व कवींची पुस्तके आहेत तसेच अभ्यासाचीही पुस्तके आहेत. मुलांना एखाद्या विषयावर माहिती हवी असेल तर तो वाचनालयात जाह्वूउन त्याची संपूर्ण माहिती मिळवू शकेल अशी सोय केली आहे. तसेच म्युझिक रूमही तयार करण्यात आली आहे. ज्याद्वारे एखादा धडा त्याला कळला नसेल तर तो त्याला कॅसेट देऊन ध्वनीमाध्यमाद्वारे ऐकून समजावून घेता येऊ शकतो. नुकतेच सर्प गॅलरी आणि गणित गॅलरीचे उद्धाटन करण्यात आले आहे. याद्वारे विविध जातीच्या सर्पांची माहिती मुलांना मिळावी तसेच गणित गॅलरीद्वारे मुलांना एकेक आणि इतर गणिताबद्दलची माहिती मिळावी म्हणून या दोन गॅलरीची निर्मिती करण्यात आली. सर्प हे खरोखरचे नसून ते झाडांच्या मुळापासून तसेच वाया गेलेल्या सायकलच्या टायरपासून तयार करण्यात आले आहेत. त्यांना योग्य आकार देऊन त्याची मांडणी करण्यात आली आहे. हे सर्व मांडणीही विद्यार्थ्यांकडूनच करून घेण्यात आली आहे तसेच विद्यार्थ्यांना त्या सर्पांबद्दलची संपूर्ण माहिती करून देण्यात आली आहे. आज तच विद्यार्थी ती माहिती इंग्रजीत न अडखळता फाडफाड येणाऱ्यांना करून देतात.

शाळेत नर्सरीपासून ते केजीपर्यंतचेही वर्ग चालवले जातात याही मुलांकडून मातीची खेळणी कशी तयार करायची, सुईमध्ये दोरा कसा ओवायचा, आवाजाच्या तालावर कसं नाचायचं असे अनेक प्रकार त्यांच्याकडून करून घेतले जातात. तसेच भिंतीवर रंगवलेल्या अनेक कथांमधून त्यांना माहिती दिली जाते. या मुलांमधूनही विशेषत्वाने भावी काळातील वैज्ञानिक शोधला जातो. त्यांच्या अंगात धिटपणा यावा, त्यांना विविध खेळ खेळता यावे यासाठीही शाळेने काळजी घेऊन त्यांच्यासाठी अनेक खेळाचे साहित्य सज्ज ठेवलेले आहे.

वसई तालुक्यात फक्त विरारमध्येच सायन्स गार्डन आहे आणि त्या गार्डनची संकल्पना ही दीपक सरांनीच तयार केली होती. आज नंबर एकची सायन्स गार्डन म्हणून त्याचा उल्लेख सर्वत्र होताना दिसतो. शाळेत नुसता सायन्सवरच भर दिला जातो असे नाही तर इतर मुलांच्या सुप्त गुणांकडेही लक्ष देऊन त्यांना वाव दिला जातो. तालुक्यात भरणाऱ्या कला-क्रिडा स्पर्धांमध्येही शाळेतील मुलांना सहभागी केले जाते. अशा प्रकारे भावी पिढीतील वैज्ञानिक शोधण्याचे कार्य ही शाळा अत्यंत काळजीपूर्वक करत आहे. उत्तरोत्तर शाळेची प्रगती पाहता तालुक्यातील इतर शाळांना आदर्शव्रत अशी ही शाळा आहे असेच म्हणावे लागेल.

– लक्ष्मीकांत पटवर्धन