मी एका चार्टर्ड अकाउंटंटच्या फर्ममध्ये काम करीत होतो. त्यावेळी आम्ही साधारण १८ ते २४ च्या दरम्यानची मुले-मुली त्या ऑफीसमध्ये असल्यामुळे आमचा एक मस्त ग्रुप जमला होता. आमच्या कार्यालयाच्या दोन शाखा होत्या, आणि प्रमुख शाखेमध्ये आमचे सर बसायचे. त्यामुळे आम्हाला ब-यापैकी स्वातंत्र्य मिळायचे. कामे असायचीच. पण ‘इन्कम टॅक्स’चा सिझन संपला की फारसे काम नसे. काम नसेल तेंव्हा आम्ही सर्वजण गप्पा मारीत बसायचो. त्या दोन वर्षात आम्ही सर्वजण एकमेकांच्या इतक्या परिचयाचे झालो होतो, की सर्वजण अजूनही त्या ऑफीसच्या आठवणी व एक चांगला परिणाम अजूनही स्वत:च्या मनावर असल्याचे मान्य करतो आणि पुन्हा कधी परत त्याच वातावरणात काम करण्यास मिळाले तर नक्की परत आम्ही सारे तयार होऊ. अधिका-यांचा ओरडासुध्दा सर्वजण खायचो, पण मनात कधी कडवटपणा राहात नसे. नंतर त्याच सिनीयरकडे गणपतीची आरती म्हणायला जातानाही आनंदच व्हायचा. अर्थात समोरची व्यक्तीही त्यासाठी तशीच पाहिजे म्हणा.
पुढे प्रत्येक जण स्वत:च्या उत्कर्षासाठी प्रत्येकाच्या वाटेने गेला. त्यावेळी काम करताना आम्ही किती वात्रटपणा करीत असू, मस्ती करीत असू, ते आज जाणवते. आमचे सिनीयर्स आम्हाला सांभाळून घ्यायचे. आमच्यातील काहीजण फार म्हणजे फारच हुशार होते. पण त्यांनाही आमच्यात मस्ती करताना संकोच वाटत नसे. सिनियर्सच्या वागणुकीमुळे किंवा स्वभावामुळे म्हणा, एक प्रकारचे उत्साहवर्धक आणि प्रोत्साहित करणारे वातावरण त्या ठिकाणी अनुभवायला मिळे.
आम्ही सर्वजण एकमेकांना अगदी जवळून ओळखत होतो. एकमेकांचे दोषही माहित होते आणि त्या बाबतीत दुसरा दुखावला न जाण्याची काळजी आम्ही घेत असू. आमच्या ऑफीसमध्ये सर्वधिक लोकप्रिय होता, सचिन करमरकर. हा माणूस नेहमी दोन-तीन जणांनी घेरलेला असे आणि त्याला सर्वच ठिकाणी एक प्रकारचा भाव होता. आमच्या ऑफीसमधून आर्टिकलशिप करणारी मुले इतर कंपन्यांचे हिशेब तपासायला जायची व त्या ठिकाणी असणा-या त्यांच्या कर्मचा-यांशी आमच्या लोकांचा संबंध यायचा व ब-यापैकी ओळखही व्हायची. काहीजणांशी मैत्रीदेखील जमायची.
अशाच एका कंपनीमध्ये सचिन ऑडिटसाठी जात होता आणि त्या ऑफिसमध्ये असणा-या एका ऑफिस असिस्टंटशी त्याची मैत्री जमली. सचिनला असे वाटू लागले की, आपण तिच्या प्रेमात पडलो आहोत, पण तरीही त्याला खात्री नव्हती. कारण असे नेहमीच व्हायचे. याबाबतीत त्याने आमचा सल्ला घ्यायचे ठरविले की- ‘अशी-अशी परिस्थिती आहे. आता मला सांगा की मी तिच्या प्रेमात पडलो आहे की नाही?’ (म्हणजे सरळसरळ नाही विचारले पण त्याच्या एकूण प्रश्नावलीमधून एकूण सर्व तसेच होते.) सर्वांची हसता हसता पुरेवाट झाली आणि प्रत्येकजण आपापल्या परीने त्याला सल्ला देऊ लागला. आता ही गोष्ट सात-आठ जणांत चर्चा करण्यासारखी होती का? आणि ती सुध्दा प्रेमात पडलेल्या माणसाकडून… पण हीच तर खरी मज्जा होती. ‘सचिन’ हे व्यक्तीमत्त्वच एकूण मजेशीर होते.
त्या मुलीच्या वाढदिवसाचे निमित्त झाले. सचिनची ईच्छा होती की तिला एक चांगले वाढदिवसाचे शुभेच्छापत्र द्यायचे. पण त्या भेटकार्डामध्ये मजकूर काय लिहायचा याबाबत त्याने मैत्रिणींचा सल्ला घ्यायचे ठरविले. त्या वात्रट व विक्षिप्त पोरी मोठया उत्साहाने त्याला सल्ला द्यायला पुढे आल्या. आणि काळजीपूर्वक त्या पत्राचा कच्चा आराखडा तयार करू लागल्या. प्रेम तर तिच्यापर्यंत पोहोचले पाहिजे, पण काही आक्षेपार्ह मजकूर नको. हे जमविण्यासाठी सर्वांची खटपट चालू झाली. त्या तिघी मुलींनी आम्हाला सर्वांना बाजूला केले, आणि त्या पत्र लिहू लागल्या. मधूनच एखादा उत्सुकतेने पत्र पाहायला डोकावून जाई. मात्र सर्वांची डोकी त्या पत्रावर आलेली असल्यामुळे त्याला काही ते दिसत नसे. महाप्रयासाने ते पत्र पूर्ण झाले आणि मग आम्ही सर्वजण डबा खायला बसलो.
दुपारी सचिनला त्या कंपनीमध्ये ऑडिटच्या कामासाठी जायचे होते. 1998 सालातील गोष्ट आहे. त्या दिवशी बस कर्मचा-यांचा संप होता, म्हणून सचिन जरा लवकरच निघाला. आमची सर्वांची पक्की खात्री होती की, आता या दोन-तीन दिंवसांत काहीतरी ‘न्यूज’ ऐकायला मिळणार. नंतर सचिन निघून गेला. थोडया वेळाने आम्ही पाहतो तर एवढया मेहेनतीने केलेले ते भेटकार्ड टेबलावरच पडलेले होते….
– मंदार करमरकर
सचिनच्या गोष्टीचा शेवट
सचिन कार्ड विसरून गेला. आमची उत्सुकता शिगेला पोहोचली. सचिनला जेंव्हा लक्षात येईल आपण कार्ड विसरून आलो आहोत तेंव्हा काय होईल ह्यावर सर्वांची चर्चा सुरू झाली. नाना प्रकारचे तर्क वितर्क काढत आम्ही सर्वजण बसलो होतो. एक excitement होती. आमच्या ऑफीसमधला एक लोकप्रिय मुलगा प्रेमात पडला होता, आणि त्याहीपेक्षा थ्रिलींग म्हणजे, तो आज आपल्या मनातलं बोलणार होता.
सचिन ऑफीस मधून निघून गेल्यावर आता जवळ जवळ तीन तास होत आले होते त्याच्याकडून काहीही खबर आलेली नव्हती. प्रत्येकाच्या समोर म्हणायला कामं होती पण सर्वांचं लक्ष मात्र कधी घडयाळाकडे लागलं होतं.
शेवटी एकदाची फोनची रींग वाजलीच, लगेच एक रींग संपायच्या आधीच फोन उचलायला गेला. हो सचिनचाच होता तो फोन. आम्ही फोन उचलणा-या मुलीच्या चेहे-याकडे बघून काय झालं असावं ह्याचा अंदाज काढत होतो. शेवटी बोलणा-या मुलीने फोन ठेवला. फोन ठेवल्या ठेवल्या तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. जरा आढेवेढे घेत ती एकदम अतीव आनंदाने ओरडून म्हणाली ‘गड फत्ते झाला’ आम्ही आनंदाने जल्लोश केला.
बऱ्याच वेळानं सचिन खुशितच ऑफीस मध्ये शिरला, आणि जसं काही तो कोणी हिरो असावा असे आम्ही त्याच्याभोवती जमलो. तू काय बोललास? कसा बोललास? तिची रिऍक्शन काय होती? हजार प्रश्न आम्ही त्याला विचारले, आणि त्याचे उत्तर ऐकून चाट पडलो.
सचिन म्हणाला, मी खूपच nervous होऊन तिच्या ऑफीसमध्ये शिरलो. कार्ड बघितल्यावर ती काय बोलेले? हो, की नाही?… ह्या विचारांनी एकदम डोकं जड झालं आणि वाटलं, नकोच विचारूया…म्हणजे, नकार मिळण्याची भितीच राहणार नाही. आणि फक्त वाढदिवसाच्या तिला शुभेच्छा द्यायच्या असे ठरवून भेटलो. तिला शुभेच्छा दिल्या. मग कामाला लागणार इतक्यात ती म्हणाली, ‘सचिन, तू मला माझे हे वर्ष आनंदात जावो, असे म्हणालास. वाढदिवसही आनंदात जाऊदे, असं ‘विश्’ केलंस… पण तुला हे माहित आहे का, की माझं हे वर्षंच काय, पण हे पूर्ण आयुष्य सुखात आणि आनंदात जाणं आता फक्त तुझ्या हातात आहे. निदान आज तरी तू तुझ्या मनातलं बोल. आणि मला पण माझ्या मनातलं बोलण्याची संधी दे…’
बास् मग काय! सचिनला आता boost मिळाला होता आणि आता तो अजिबात थांबणार, घाबरणार नव्हता…मनातलं सगळं बोलून झालं आणि तिने देखील तिच्या मनातलं गुपित सांगितलं.
हया घटनेला खूप वर्ष झाली, पण अजूनही त्या आठवणी येतात… आठवते आमची ती excitement ते थ्रिल आठवतं, आणि परत ते दिवस यावे, असं राहून राहून वाटतं…
– भक्ती कवळी