आज मला जवळजवळ पंधरा दिवस झाले सिंगापूरला येऊन वर्षातून मी किमान दोन ते तीन वेळा तरी येथे येते. कधीही आले तरी कायम उत्सवाचे वातावरण असते. कधी हिंदुंच मुस्लिमांचे कधी चिन्यांचे तर कधी क्रिसमस वगैरेसारखे सण नेहमी साजरे होत असतात. ख-या अर्थाने येथे पहायला मिळतो.
सध्या येथे ‘चिनी नव वर्षाचे’ वारे वाहत आहेत. एक फेब्रुवारीला नव वर्षाचा पहिला दिवस आहे. पण तयारी मात्र चालली आहे गेला महिनाभर. सिंगापूर नुसते लालम लाल झाले आहे. लाल तोरणे, कंदील, लाल पताका, लाल रंगाची शुभचिन्हे सगळीकडे लाल रंगाचे राज्य आहे. झाडांवर, इमारतींवर दिव्यांच्या माळा आणि खचाखच भरलेले मॉल्स (बाजार). मोठमोठया पिशव्या घेऊन चिनी बायका बसमधे चढताउतरताना दिसताहेत. जागोजागी बोन्साय केलेली संत्र्याची व अननसाची झाडे असलेल्या कुंडया विकायला ठेवल्या आहेत. ही झाडे म्हणे एकमेकांना आनंदाचे व भरभराटीचे प्रतीक म्हणून देतात.
प्रत्येक चिनी वर्ष कोणत्याना कोणत्या प्राण्याचे असते, यंदाचा प्राणी बोकङ सोनेरी मुलामा दिलेले बोकडांचे पुतळे अनेक ठिकाणी उभारले आहेत. या सजावटीमधे प्लॅस्टिकची परंतु अति सुबक गुलाबी पांढरी फुले असलेली चेरीची झाडे दिसतात. कदाचित चीनमधे हा चेरी फुलण्याचा मौसम असेल. आपल्याकडे नाही का, दसरा दिवाळीला झेंडूचे महत्त्व असते.
कोणत्याही सणानिमित्य येथे भरपूर रोषणाई करतात, पण आवाजाच्या फटाक्यांना मात्र बंदी आहे. ती हौस लोकं फटक्यांसारख्या दिसणाया दिव्याच्या माळा लाऊन भागवतात.
जानेवारीच्या मध्यावर थायपूसम् नावाचा सण झाला. त्याला सण म्हणायचे की नाही खरे म्हणजे मलाच ठाऊक नाही. फारच विचित्र प्रकार. सहज आम्ही सरंगूनला (भारतीय वस्तीचा भाग) गेलो होतो, पहातो तर रस्त्याला जत्रेचे स्वरूप आलेले, पिवळय साडया नेसून, डोक्यावर हंडे घेऊन चाललेल्या तामिळ भगिनी व डोक्यावर सजवलेली कावड घेऊन शरीरभर आकडे सळया टोचून चाललेले पुरूष दिसले, आणि कुठेतरी वाचलेले लक्षात आले, की हाच इथला ‘थायपूसम्’.
आपली काही इच्छा असल्यास नवस बोलतात. चाळीस दिवस घरातली सर्व मंडळी एकभूक्त रहातात, रात्री जमिनीवर झोपतात व या दिवशी घरातला पुरूष शरीरभर आकडे टोचून घेतो, देवळात हे आकडे टोचणारे असतात. जीभेच्या आरपार, गालांतून सळया टोचतात, त्यावर लिंबे लटकावतात व उघडेबंब, अनवाणी, ‘मूरूगा’, म्हणजे कार्तिकस्वामीच्या मंदिरापर्यंत चालत जातात तिथे काही काळ नाचतात व त्यानंतर ते आकडे शरीरातून काढतात. काही माणसे तर पाठित अडकवलेल्या आकडयांना दोर बांधून रथ ओढतात. ही परंपरा म्हणे कैक वर्षांपासून येथे चालत आली आहे.
भौतिक सुखांच्या पल्याड असे काय आहे जे माणसाला शरण आणते असा विचार मनाला चाटून गेला.
भारतीय प्रजासत्ताक दिन, यंदा मी अभुतपूर्व रीतीनं, सिंगापूरमधे साजरा केला. सकाळपासूनच मित्रांचे ण्ज्ण् येत होते, ख्अठठप् ढएठथ्इछग्उ ऊअप्असे.
संध्याकाळी ‘टेंपल ऑफ फाईन आर्टस’ सिंगापूर, येथे स्वर-रंग-रेखा हा आगळा वेगळा कार्यक्रम सादर केला गेला. टि. एफ. ए. बद्दल संधी मिळाल्यास पुन्हा लिहीन. संतुर-तबला यांच्या स्वर-तालावर चित्र चितारले गेले. तिन्ही कलाकार आपल्या कलेचे प्रदर्शन सर्वांसमक्ष करीत होते.
मध्यंतरानंतर, संतुरवर, काश्मिरी संगीत वाजवण्यात आले संतुरचे व काश्मिरचे नाते अतूट आहे. क्षणांत मन घरी गेले, एक साल पुन्हा जागी झाली, आणि इथल्या सर्वसमावेशक वातावरणाच्या पार्श्वभूमिवर तर ती अधिकच बोचरी झाली, असो. टाळयांचा कडकडाट झाला नी कार्यक्रम संपला. त्यानंतरचा भोजनाचा कार्यक्रम अति महत्त्वाचा आपापल्या प्लेट्स घेऊन गोलाकार बसले आमचे महाराष्ट्र मंडळ, आणि गप्पांना सुरवात झाली. ही मंडळी म्हणे सकाळीच भारतीय वकिलातीत जाऊन झेंडा वंदन करून, राष्ट्रपतींचे अभिभाषण ऐकून आली होती. भगिनी म्हणे नेहमीच जातात, पण पुरूष मंडळीही ऑफिसला जायच्या अधी झेंडा वंदन करून जातात, यंदा तर रविवार असल्यामुळे सगळेच आवर्जून गेले होते. आता बोला, काळीज सूपाएवढे झाले हे ऐकून, पण त्याचबरोबर स्वदेशीचा हा दिवस आठवला. कसा साजरा होतो आपल्या इथे हल्ली ? जोडून सुट्टी आली की सर्व सरंजामानिशी मंडळी हिल-स्टेशन गाठतात, मजा करण्यासाठी ! जशा काही कमीच सुटया असतात आपल्याला.
चालायचेच, देशाबाहेर गेल्याशिवाय देशाचे महत्व कळत नाही, हेच खरे !
असे आहे सिंगापूर ! उत्सवप्रिय. आपल्या परंपरांमध्ये पाय घट्ट रोवून, नजर समोर रोखून, पंखात निष्ठेचे व बंधुभावाचे बळ एकवटून एवढे मार्गक्रमण करू आले आहे, पण प्रगतीचे अथांग आकाश अजूनही खूणावते आहे आणि हे पाखरू उत्तुंग भरारीची आकांक्षा बाळगून आहे.