आयुष्य

आपल्या रोजच्याच आयुष्यात कितीतरी चढउतार येतात आणि जातात. पण निसर्गाच्या, प्रकृतीच्या रोजची दिनचर्या – सूर्योदय, सूर्यास्त, पौर्णिमा, अमावस्या, भरती, ओहोटी, हे अगदी नियमानं एकामागे एक चालेलं असतं. त्यांच्या ह्या दिनचर्येत – रोजच्या घडण्यात काही स्वार्थ – मोह नाही. त्यांच्या दिनचर्येत कुठलाच बदल नाही. त्यांना उन्हाच्या तळपण्याने ताप नाही, पावसाच्या बरसण्याने भिजणं नाही की अती थंडीने कुडकुडने नाही. ते त्यांचे रंग आहे आणि ते आपले रंग जपून ठेवतात.

पण मनुष्याचं काय? आपल्याला रोजचंच जगण कधी कधी नकोसं वाटतं. आपल्याला सुख-दु:खाच्या माठया जाळयात पाडणारे आपणच आहोत. आपल्याला एखाद-दुसरा सुखाचा क्षण मिळाला की आपल्या अंत:करणाचा गाभारा सुखाने अगदी उतू जातो. ते सुख आपल्याला मिळाल्याने असे वाटते की जगातलं आपलं सूख हे सर्वात मोठं सुख की तेव्हढा आनंद कुणालाच झालेला नसावा – तर दुसरं आपल्याला दु:ख झालं की असं वाटतं जणू तोच मनाचा गाभारा दु:खाच्या अश्रुंनी तुडूंब भरलेला आहे. आणि जगातलं सर्वात मोठं दु:ख हे माझ्याच पदरात का पडलं. आणि त्या दु:खात आपण आपल्या छोटया छोटया सुखांना गमावतो. आपण आपल्याच विश्वाभोवती फिरतो- का? आपल्याला हा विचार का येत नाही की आपल्या सारखंपण कुणीतरी आहे. त्यांनाही सुखं आणि दु:ख आहे. आपण आपल्या वलयाबरोबर इतरांच्या वलयाला का पाहू शकत नाही? फक्त आपण त्या नव्या दिशेच्या मागेच का धाव घेतो ? की ज्या दिशेची आपल्याला कल्पना, भास परिणाम काहीच समजत नाही. अश्वा सारखं त्याला लगाम लावणारा जसा त्याचा मालक असतो तसंच आपल्या ह्या अश्व वेगावर नियंत्रणासाठी एक शक्ती असते जी आपल्याला अपरिहार्य कार्य करण्यापासून दूर लोटते- वाचवते.

आपला हा अश्व वेग असाच चालत राहणार, त्याला आळा घालणारी शक्ती म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक, पावसाळयातला आलेला पूर, आणि हलक्या वाऱ्याबरोबर आलेलं वादळ. मग हे काय ह्याला काय म्हणनार तुम्ही? एक शक्ती जी आपली उत्तपत्ती करून आपल्यालाच नाश करते. मग हे सुख, दु:ख, मोह-माया ह्या गोष्टी कशासाठी? मातीत जन्म घेतला तो मातीतच विरला. कारण तो तिथलाच मग कशासाठी? आपले आयुष्य हे अश्वमेघासारखं ज्याला कधी वेग खूप असतो, त्याला कसलाही ताबा नाही फक्त एक वेग कमी जास्तीचा

…… आयुष्य कधी आहे, कधी नाही….
अश्वासारखं कधी वेग थांबवणारं नाही
मना सारखं मुक्त…
आणि म्हणूनच हा वेग असाच निरंतर….

– वैशाली गिते