फिलाडेल्फिया आणि वॉशिंग्टन डी. सी. या दोन East Coast च्या प्रमुख शहरांचया मध्ये छोटच पण आपलेच अस्तित्व दाखवणारे ‘डेलावेअर’ हे राज्य. यातील प्रमुख शहर म्हणजे विल्ंमिग्टन (Wilmington) डेलावेअरला अमेरिकेचे प्रथम राज्य असेही म्हणतात. (कारण अमेरिकेच्या स्वातंत्र्यतेच्या घोषणेवेळी डेलावेअर हे सर्वप्रथम अमेरिकेत सामिल झाले.) तर अशा या छोटेखानी राज्यात जेमतेम ४०-५० मराठी कुटुंब असतील नसतील. पण त्यांचा उत्साह मात्र एकदम दांडगा. संक्रांत, हळदीकुंकू, पाडवा, दिवाळी असे मराठमोळे सण तर येथे साजरे केले जातातच पण सणाचा राजा गणेशोत्सवही येथे उत्साहाने साजरा केला जातो.
गेल्या वर्षी गणपतीला तर इथल्या मराठी मंडळींनी पेणहून मूर्ती मागावून त्याची प्रतिस्थापना केली होती. पण मग यंदा १/॥ चे सावट, विसर्जनासाठी घ्यावी लागणारी परवानगी, अशा बाबींचा विचार करून येथील हिंदू टेंपल मधली पंचधातूची मूर्तीच उत्सवासाठी स्थापन करण्याचे ठरले. १० सप्टेंबरला संध्याकाळी ६ वाजता पालखीतून मूर्तीचे आगमन झाले. षोडोपचारे मूर्तीची पूजाही पार पडली. पूजेचे प्रमुख वैशिष्टय म्हणजे येथील पूजारी हे आंध्र प्रदेशातील असल्यामुळे पूजेत केलेला साऊथ इंडियन चालीरितींचा समावेश. उदाहरणच द्यायचे झाले तर पूजाऱ्यांनी पूजा करताना सर्व भाविकांना एकत्रीत रित्या मंत्र म्हणण्यासाठी तसेच गणपतीची १०८ नावे घेण्यासाठी सामील करून घेतले होते. पूजेनंतर येथील एक कलाकार ‘राधिका जोशी’ यांचे इशस्तवनावर कथ्थक नृत्य झाले. गणपतीचे मखर व भोवतालची आरास ही एकदम दणक्यात केली होती. डेलावेअर मधली बहुतांशी मराठी कुटुंबे ही नोकरीवत्सल असल्यामुळे रोज संध्याकाळी ७.४५ला सर्वजण मंदीरात जमत. ज्याकुठल्या ५-६ आरत्या म्हणायच्या असलीत त्याच्या झेरॉक्स कॉपीज ही सर्वांना वाटल्या जात. आरती म्हणताना प्रत्येक जोडप्याने थोडा थोडा वेळ आरतीचे तबक हातात घेऊन देवाला ओवाळायचे तीही जबाबदारी विभागून घेतली होती.
शुक्रवारी १३ सप्टेंबरला रात्री आरती झाल्यावर देवळाच्या देवळाच्या Auditorium
मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले गेले. सात बायकांनी (हवे तर मुली म्हणू) सादर केलेले कोळी नृत्य हे तर खास आकर्षण होते. आपल्या नोकऱ्या व घराचे व्याप सांभाळून १-२ महिने आधीपासून खूप मेहनत घेऊन ६ लोकप्रिय कोळीगाण्यांवर बसवलेला नाच तर शिट्टया व आरोळयांच्या तालात अगदी Once more घेऊन गेला. शुक्रवारचे दुसरे आकर्षण होते ते म्हणजे १॥-२ तासांचे विनादी नाटक ‘हास्यटूर’ या नाटकाची मूळ संकल्पना होती. मुंबईचे एक आघाडीचे कलाकार व संयोजक आदेश बांदेकर यांनी नाटकाचे स्क्रिप्ट मुंबईहून लिहून पाठवले. समर्थ जोशी यांनी नाटकाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली. ‘हास्यटूर’ म्हणजे पु. ल. देशपांडे, वसंत सबनीस यांच्यासारख्या मात्तबर लेखकांच्या लेखणीतून उतरलेल्या नाटकांमधल्या प्रवेशांचा एक प्रवास. सर्व नाटयप्रवेशांना एकत्रीत गुंफण्याचे काम आपल्या लेखणीतून आदेश बांदेकरांनी उत्तमरित्या साधले होते. या हास्यटूरमधील एक नाटयप्रवेश मात्र येथील स्थानिक कलाकारांनी लिहीला होता. शनिवार १४ सप्टेंबर म्हणजे गणेश विसर्जनाचा दिवस या दिवशी सकाळी प्रथम अथर्वशीर्ष पठन झाले. त्यानंतर मोठी आरती. मराठी लोकांव्यतिरिक्त इतरही अन्यभाषिक लोक उपस्थित होते.
आरतीनंतर सर्वांना जेवण होते. Caterer ला खास मराठी पध्दतीचे पदार्थ कसे करायचे याचे ट्रेनिंगही काही उत्साही बायकांनी दिले होते. खास मराठी पध्दतीचा बेत होता. श्रीखंडपूरी, मसालेभात, पालकाची अळूसदृश भाजी, मोदक, काकडीची कोशिंबीर, वगैरे वगैरे जेवण उरकल्यावर प्रथम मुलांचे कार्यक्रम झाले. त्यात ८-१० वर्षाच्या मुलांनी ‘गणपती-कार्तिकेयाची पृथ्वीप्रदक्षिणा’ ही गोष्ट नाटकातून करून दाखवली. त्याच्याशिवाय इतर नाच, गाणी असे talent show होतेच. त्यानंतर मोठयांचे कार्यक्रम होते. यात बासरीवादन, भावगीते, भजने, भक्तीगीते यांना चांगलाच रंग भरला. कार्यक्रमाची सांगता सावरकरांच्या ‘जयोस्तूते’ या गीताने झाली. त्यानंतर गणपतीची निरोप आरती झाली व पूजाऱ्यांनी विसर्जनासाठी symbolic अशी पूजेच्या गणपतीची सुपारी दिली.
तर असा झाला डेलावेअरचा गणेशोत्सव. ज्या टिळकांनी महाराष्ट्राशी नाते सांगणाऱ्या डेलावेअरच्या प्रत्येक मराठी माणसाचे कौतुक करावे तेवढे थोडेच.
॥ गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या ॥