चिखलातलं एक कमळ – सखी संघटन

sakhi कोल्हापूर इचलकरंजीच्या रस्त्यांवर कोप-यात त्या उभ्या होत्या, असतात. मेकअप, हावभाव, पोटात भूक. मुक्या, कोणीही ओरबडावं. झाडासारख्या या. यांना फक्त दिसत असतात घरी वाट पहाणारी, यांच्या फांद्यांवर विसावणारी यांची लेकरं, म्हातारे आई बाप.

हळूहळू हुसेन जमादारांच्या ‘एम एस पी एस ए’ नं व ’मुक्ता प्रकल्पान’ चमत्कार घडवला. एक एक जण अविश्वासानं पुढे येत गेली. जोडत गेली एक दुसरीला. मुमताज, साधना आणि मंदा ही त्यांची प्रतिनिधिक रुप. तिघींची कहाणी, समस्या वरवर दिसायला वेगळ्या तरी सारख्याच. त्यांच्याच ह्या वास्तविक कहाण्या –

मुमताज

सेक्स वर्कर आणि पोलिस म्हटले की छत्तीसचाच आकडा पण कोल्हापूरात जसा सेक्स वर्करस बरोबर प्रकल्प सुरू झाला आणि त्यांच्या समस्या, अडचणी, प्रश्न, मुद्दे यांचा अभ्यास व त्यावरील चर्चा सुरू झाल्या आणि तसतशी या समीकरणांसंदर्भातील संवेदनशीलता अजूनच समजू लागली आणि ३६ च्या आकडयाचा ६३ चा आकडा होण्याची गरज पण समजू लागली.

हे समीकरण बदलण्यासाठी दोन्ही बाजूंनी काम होण्याची गरज होती. पोलीसांबरोबर सेक्स वर्कर महिलांची परिस्थिती आणि त्यांची होत असलेली पिळवणूक थांबविण्यासाठी महिलांबरोबर पोलीसांच्या त्रासाला आपली वागणूक कारणीभूत आहे का ते तपासून बघण्यासाठी व कायद्याची माहिती होण्यासाठी.

हळूहळू दोन्ही पातळयांवर काम सूरु झाले. बायका, त्यांच्या संबंधाचा कायदा व त्याचे हक्क समजावून घेऊ लागल्या. पोलीस प्रशिक्षणातील बायकांचा सहभाग त्यांना माणूस म्हणून समजून घेण्यास पोलीसांना मदतीचा ठरू लागला. पोलीस व धंद्यातल्या बायकांच्या एकमेकांवर चर्चा सुरू झाल्या व दोन्ही बाजूंना असलेल्या समस्या दोघांनी मिळून सोडविण्याचे प्रयत्न सुरू झाले.

sakhi परिस्थिती हळूहळू बदलू लागली. बायकांना पोलीस चौकीत आदराची वागणूक मिळू लागली अनेक पोलीस अधिकारी महिलांच्या मित्र-मैत्रीणी व विश्वासाच्या सहकारी होवू लागल्या. त्याचप्रमाणे सेक्स वर्कर महिंलापैकी काही जणी बायकांवर होणार्‍या अन्याय, अत्याचार, व पोलीसांसदर्भातील अडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घेऊ लागल्या.

एरवी शांतपणे आपली कामं करणारी, कोणाच्या फारशी नजरेत न येणारी मुमताज पोलीसांबरोबरच्या कामामुळे एकदम वेगळेपणाने पुढे आली. शांतपणे व फार बडबड न करता मुद्याचं बोलण्याचा तिचा गुण इथे कामी आला आणि बघता बघता मुमताज पोलीसांबरोबर करावयाच्या कामात पारंगत झाली. पोलीस व बायका दोघांचाही हिच्यावर पूर्ण विश्वास. पोलीसाकडून छळवणूक झाली की त्यांना अगदी ठामपणे सांगणार…”पण सर-मॅडम, तुम्ही असं नाही करू शकत. आम्हाला पण काही अधिकार आहेत”.

आणि बायकांची चूक असेल तर, त्यानांही सांगणार की भोगा आता स्वत:च्या चूकीची फळं. ”एवढं बोलून गप्प बसणार तर पोलीसांनाही सांगणार की ”मॅडम, चूक तिचीच आहे होवू द्या नियमानुसार शिक्षा-दंड”. ही मुमताज तिच्या अजून एक वैशिष्टयपूर्ण कामामुळे मनात भरते ते म्हणजे लहान वयाच्या मुलीला धंद्यात येण्यापासून वाचविण्यासाठी केलल्या यशस्वी प्रयत्नांमुळे.

एक दिवस मुमताज रोजच्याप्रमाणे कामासाठी फिल्डमध्ये गेली. एक दोन दिवस तिला एक नवीन मुलगी फिल्डमध्ये दिसत होती बायकांच्या आसपास घुटमळणारी कधी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणारी. उत्सुकतेपोटी मुमताजने इतरांजवळ व तिच्याजवळ तिची विचारपूस केली आणि कळले की ओळखीच्या एका व्यक्तीने दाखविलेल्या नोकरीच्या आमिषामुळे ही मुलगी त्याच्याबरोबर घर सोडून निघाली आणि चूकीने कोल्हापूरच्या स्टेशनवर उतरली. नवीन शहर, कोणाची ना ओळख ना पाळख अशीच भटकणार्‍या या मुलीला कोणीतरी वापरायचा पण प्रयत्न केलेला पण त्याच्या तावडीतून सुटलेली.

वयानं लहान असलेल्या ह्या मुलीला कुठल्याही परिस्थितीत धंद्यात येऊ द्यायचे नाही हे मुमताजच्या मनात पक्के झाले. तिने सखी संघटनेच्या इतर कार्यकारिणी सदस्यांना मिटींगसाठी सकाळी बोलावून घेतले. मुलीला खायला घालून संघटना सदस्यांसमोर घेऊन आली. मुलीशी सगळी चर्चा करून तिला तिच्या घरी, पालकांकडे पोहचविण्याचा निर्णय संघटना सदस्यांनी घेतला व या कामात सहकार्यासाठी थेट पोलीस चौकी गाठली. पोलीसांनीही केस ऐकून घेऊन मुलीच्या पालकांना शोधण्यासाठी यंत्रणा कार्यरत केली. पालकांचा शोध लागला. त्यांना मुलीला घेण्यासाठी कोल्हापूरला यायला दोन दिवस लागणार होते. त्या काळात मुमताजच्या घरात ती मुलगी सुरक्षित राहीली. दोन दिवसांनी पालक आले, ओळखी पटल्या आणि पोलीसांच्या साक्षीने मुलीला आई-वडिलांकडे सुपूर्द करताना एका तरी मुलीला धंद्यात येण्यापासून वाचवून आयुष्याचे चीज झाल्याच्या भावना मुमताजच्या चेहर्‍यावर होत्या.

साधना कांबळे

साधना कांबळे सेक्स वर्कर्सच्या मुक्ता प्रकल्पातील पॅरामेडीक. जेव्हा जेव्हा संस्थेच्या ऑफिसमध्ये तीला वावरताना पाहिली, तेव्हा जाणवलं की आपलं काम समजून घेवून नेटकेपणाने करण्याच प्रयत्न करणारी, विश्वासाने, आपलेपणाने झोकून देवून काम करणारी. आता पॅरामेडिक झाल्यापासून बायकांच्या आरोग्याबद्दलची तिची जागरूकताही वाढली आहे. साधना आपलं पॅरामेडीक म्हणून संस्थेतलं काम संपलं की रस्त्यावर धंद्याला उभी राहते. २-३ तास तिथे असते आणि मग आपल्या घरी जाते. घरी तसं विशेष कोणी नाही, त्यामुळे स्वत:साठी गरजेपुरतं कमवायचं एवढंच.

एक दिवस अचानक तिच्याबद्दल एक भयानक बातमी कळली, अंगावर शहाराच आला. साधना धंद्याला उभी राहिलेली असतांना एक गुंड, जो तिला बरेचदा त्रास द्यायचा, पण साधना काही त्याला दाद द्यायची नाही, त्याच्या मित्राच्या साह्यायाने तिला गाडीत घालून दूर घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार केला. साधनाने प्रतिकार करण्याचा खूप प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही. झालेल्या अत्याचाराने खचलेली पण प्रचंड चिडलेली साधना सखी संघटनेच्या सदस्या व एम एस पी एस एस च्या कार्यकर्त्यांना भेटली. एका बाजूला खूप अपमानीत वाटत होतं. पण गप्प का म्हणून बसायचं असा प्रश्न होता. कार्यकर्त्यांच्या आणि सहकार्यांच्या मदतीने केस करायची असे ठरले. पोलीस चौकीत रितसर केस नोंदविली. पोलीसांचेही सहकार्य मिळाले. पटापट योग्य त्या बाबींची पूर्तता केली गेली जसे साधनाची वैद्यकिय तपासणी, पंचनामा वगैरे. आणि साधनाने एका कुप्रसिध्द गुंडाविरुध्द बलात्काराची केस नोंदवली. संघटना व संस्थेच्या लोकांचा खंबीर पाठींबा होता हे महत्वाचे.