दुधाच्या देशातून

milk country ‘डोक्यावर सोनेरी मुकुट आणि अंगावर फाटके कपडे अशा अवस्थेत मराठी भाषा मंत्रालयाच्या दाराशी उभी आहे.’ १९८९ साली १२-१३ ऑगस्टला मुंबईला जागतिक मराठी परिषद भरली होती. त्या परिषदेत भाषण करताना कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी काढलेले हे उद्गार खूप गाजले. अधिक दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्यानंतरच्या २७ वर्षांच्या काळात मराठीची अवस्था अधिकाधिक खालावत गेली आहे. १९८९ साली तिच्या अंगावर असलेली फाटकी वस्त्रं सुध्दा आज ओढली जात आहेत. कोण करतं आहे हे वस्त्रहरण? इलेक्ट्रॉनिक माध्यमं, वर्तमानपत्रं, सरकार, जाहिरातदार, डीटीपी करण्यार्‍या व्यक्ती, काही शिक्षक-लेखक-प्राध्यापक आणि इतर सर्वसामान्य जनता सुध्दा! कशामुळं होतं आहे हे वस्त्रहरण? अज्ञान, स्वत:च्या भाषेविषयी असलेली एकूणच अनास्था, अस्मितेचा अभाव, ‘चलता है’ वृत्ती, इलेक्टॉनिक माध्यमांचा गैरवाजवी प्रभाव, प्रत्येक गोष्टीचा पैशाशी संबंध जोडण्याची खोड…. अशी अनेक कारणं. तद्दन इंग्रजी/हिंदी धाटणीची वाक्यरचना, चपखल मराठी वाक्‌प्रचार असतानाही हिंदी/इंग्रजी वाक्प्रचारांचा वापर, शुद्धलेखनाचे सगळे नियम गुंडाळून ठेवून केलेले लेखन आणि त्यामुळं काही वेळेस होणारा अर्थाचा अनर्थ, तथाकथित अलंकारिक परंतु अर्थहीन असे शब्दांचे बुडबुडे आणि दुर्बोध लेखन… अशा अनेक प्रकारांनी आजकाल मराठीचं प्रचंड प्रमाणावर प्रदूषण केलं जात आहे, तिची अक्षम्य मोडतोड केली जात आहे.

ऑकलंड विद्यापिठात काम करीत असताना मारी टॉपलेस नांवाच्या किवी (न्यू झीलंडमधील लोकांना “किवी” म्हणतात) स्त्रीशी ओळख झाली. मारी चांगलीच बडबडी व उत्साही आहे. तिच्या बोलण्यातून समजले की ऑकलंडजवळच सुमारे तासाभराच्या अंतरावर तिचे फार्म हाऊस असून ती व तिचा नवरा गॉर्डन दोघेही जण गोपालन व दुधाचा व्यवसाय करतात.

न्यूझीलंड हा देश दूध व दुग्धजन्य पदार्थ जगभर पुरविण्यासंबंधी चांगलाच प्रसिद्ध असल्याने हा व्यवसाय नक्की कसा केला जातो याविषयी उत्सुकता होती. मारीशी बोलल्यावर तिने चक्क तिच्या फार्म हाउसवर येऊन दोन दिवस रहाण्याचेच निमंत्रण दिले. अगदी आंधळा मागतो एक डोळा अन्——— असेच झाले आणि तिच्या निमंत्रणाचा तातडीने स्वीकार करून मी गेल्याच आठवड्यात तिच्याकडे जाऊन दोन दिवस राहून आले. या भेटीत मिळालेली माहिती व प्रत्यक्ष अनुभव जगातील कोणत्याही भारतीयाला नक्कीच थरारून टाकेल कारण विषय त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा व पोटाशी निगडीत आहे ना!

मारीच्या शेतावर (फक्त) दीडशे गायी आहेत. शेत आहे (फक्त) ३०० एकराचे. हेही काही नवल नाही. कारण हा व्यवसाय करणाऱ्या लोकांच्याकडे एकावेळी जास्तीत जास्त एक हजार गायी असतात आणि शेते असतात पाचशे ते हजार एकराची! आणि जास्तीत जास्त फक्त ५-६ माणसे मिळून एवढा मोठा व्याप सांभाळून, व्यवसाय यशस्वीरित्या करतात. हे कसे शक्य आहे?

त्याचे कारण म्हणजे न्यूझीलंड देश हा दोन बेटांचा बनलेला आहे. येथे वर्षभर अधून मधून पाऊस पडतच असतो. त्यामुळे जमिनी, डोंगर कायम हिरवेगार असतात. येथील गायींना हिरव्या चाऱ्याचा सहसा कधी तुटवडाच नसतो. आणि त्या चाऱ्यासाठी काही शेती करावी लागत नाही. सगळी निसर्गाची कृपा. नाही म्हणायला कधी तरी (आणि हल्ली ग्लोबल वॉर्मिंग मुळे) दक्षिण बेटावरील काही भागात पाऊस कमी पडतो. पण त्यासाठी राने हिरवी असतानांच मशीनच्या सहाय्याने चारा कापून व मशिनच्या सहाय्यानेच त्याच्या मोठ्या प्लॅस्टिकच्या गुंडाळ्या म्हणजे चांगले मोठाले भारे तयार करून शेतात साठविले जातात. मुख्य म्हणजे त्या गुंडाळ्यातील चारा आंबवला जातो त्यामुळे तो ताजाच राहतो. त्या गुंडाळ्यांना सायलेज (silage) म्हणतात. कधी कधी सुकलेल्या गवताच्या ज्याला “हे” (hay) म्हणतात, त्याच्याही गुंडाळ्या करून साठविल्या जातात. त्यांना बेलस् (bales) म्हणतात. थंडीच्या दिवसात जेव्हां चारा कमी पडण्याची शक्यता असते त्यावेळी त्यांचा वापर केला जातो. काहीजण “टर्निप” (turnips) म्हणजे एक प्रकारच्या मुळ्याचे पीकही लावतात व गायींना ते खायला घालतात.

इतकी मोठाली शेते सपाट नसतातच. त्यात डोंगर, उतार असतात व शेतांना कुंपणे घातलेली असतात. गायींनी कुंपणे तोडून बाहेर जाऊ नये म्हणून कुंपणांतून विजेचा प्रवाह नेलेला असतो. गायींचे कळप मनाला येईल तिथे व जिथे अधिकाधिक चांगले गवत असेल तिथे स्वच्छंदपणे चरत राहतात.

इतक्या मोठ्या गायींच्या कळपात त्यांची संख्या नक्की किती आहे हे कसे समजायचे. यासाठी वासरू जन्माला आले की लगेचच त्याच्या कानांत एक प्रकारचे चिन्ह अडकविले जाते. त्याला इयरमार्किंग (ear-marking) म्हणतात. हा प्रकार म्हणजे आपल्याकडे जन्माला आलेल्या बाळाचे कान टोचण्यासारखाच आहे. त्यावर एक क्रमांक लिहिलेला असतो. प्रत्येक नवीन जन्मलेल्या वासराच्या क्रमांकाची नोंदणी होते ती सरकारकडेही पाठविली जाते. वासरे मोठी झाली की पुन्हा दुसऱ्या कानातही इयरमार्किंग केले जाते. त्यावरून असे समजले जाते की या शेतात जन्मलेले वासरू नंतर मोठी गाय म्हणून त्यात शेतात राहिलेली आहे. कालांतराने पहिले इयरमार्किंग गळून पडते.

गायींची दिवसांतून दोन वेळा धार काढली जाते. एकदा सकाळी लवकर व एकदा दुपारी ३ ते ४ च्या सुमारास. त्यासाठी गायींना ठराविक ठिकाणी पोचवावे लागते. हे काम फार्म हाउस पहाणारा मॅनेजर किंवा मालक करतात. त्याची गंमत म्हणजे गायींचे सड दुधाने गच्च भरून गेले की त्याही दूध काढून घेतले जाण्याला उत्सुक असतात. मग फार्म मॅनेजर किंवा मालक ट्रॅक्टर वरून गायींभोवती फेरी मारतात व बार्नकडे जाणारा दरवाजा उघडतात. गायींना तो दरवाजा उघडला की बार्नकडे जायचे हे चांगले पाठ झालेले असते. काही गायी, ज्या एकूण गायींच्या कळपाच्या “लीडर्स” असतात त्या तर दरवाज्यापाशी जाऊन तो उघडण्याची वाटच पहात असतात.

“बार्न” (Barn) म्हणजे जिथे गायींच्या धारा काढल्या जातात व तत्संबंधीची यंत्रणा बसविलेली असते ती जागा. धारा काढण्याचे काम यंत्राच्या सहाय्यानेच होते. प्रत्येक यंत्राला गायीच्या चार सडांना लावला जाईल असा पंप असतो. त्याने खेचलेले दूध एका नलिकेद्वारे मोठ्या पिंपात साठविले जाते व तिथून ते एका भल्या मोठ्या टॅंकमधे टाकले जाते. हा टॅंक दूध गोठविण्याचे काम करतो. गायींच्या धारा काढल्या जात असताना त्यांच्या तोंडासमोर असलेल्या एका मोठ्या नळीला भोके पाडलेली असतात त्यातून मोलॅसिस चाटायला दिले जाते. गायी ते चवीने चघळत रहातात. धारा काढण्याच्या जागी एका वेळी किती गायी उभ्या राहू शकतील व किती यंत्रे आहेत त्यानुसार गायींना ओळीतून तिथे पाठविले जाते. धारा काढून झाल्या की पुढचा दरवाजा उघडला की गायी बाहेर पडतात व दुसरा गायींचा संच आत येतो. गायी अशा ओळीत उभ्या राहिलेल्या पाहिल्या की जाम मजा वाटते. सगळ्या गायींच्या धारा काढल्या की शेताकडील मुख्य दरवाजा उघडला जातो व गायी पुन्हा हवे तिथे जाऊन चरायला मोकळ्या.

गायी चिखल किंवा शेणाने बरबटल्या असतील तर पाण्याच्या जोरदार फवाऱ्याने त्यांना आंघोळी घातल्या जातात. त्याला अर्थातच फार थोडा वेळ लागतो कारण पाण्याचे फवारे मोठे व चांगले शक्तीमान असतात.

प्रत्येक गाय दिवसाला साधारणत: २० ते २१ लिटर दूध देते. हे दूध नेण्यासाठी दुधाच्या कंपन्यांशी शेतकऱ्यांचे करार असतात. दिवसातून एकदा अथवा दोनदा कंपनीकडून दूध नेण्याचे टँकर येतात. गंमत म्हणजे या सर्व गोष्टी यंत्राच्या सहाय्याने होत असल्याने दुधाला कोणाचाही स्पर्ष होत नाही त्यामुळे दूध खराब होण्याचे प्रमाण शून्य असते.

न्यूझीलंड या पिटुकल्या देशातील गायींची संख्या २०१७ साली ४.८ मिलियन म्हणजे ४८,००,००० एवढी आहे तर देशातील माणसांची लोकसंख्या ४७,०५,८१८ एवढी आहे. यातील सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे न्यूझीलंड या देशात मुळात कधी गायी नव्हत्याच. १८१४ साली सॅम्युएल मार्सडेन (Samuel Marsden) या मिशनरीने न्यू साउथ वेल्स येथून “शॉर्टहॉर्न” गायी न्यूझीलंडमधे आणल्या. १८४० सालापासून ऑस्ट्रेलिया व इंग्लंडमधून अधिकाधिक गायी न्यूझीलंडमधे आणल्या जाऊ लागल्या. सध्या न्यूझीलंडमधे असलेल्या गायी मुख्यत: जर्सी (Jersey) व फ्रेसियन (Freisian) या जातीच्या असतात. त्या इंग्लंड व यूरोपमधून आलेल्या आहेत. आता गायींची पैदास न्यूझीलंडमध्येच होते.

येथील गायी भारतातील गायींपेक्षा वेगळ्या दिसतात. एक म्हणजे गायींची शिंगे दिसतच नाहीत. याचे कारण वासरू जन्मल्यानंतर २-३ महिन्यातच त्यांची शिंगे कापून त्यावर एक प्रकिया केली जाते. त्याला “डी-हॉर्निंग” (dehorning) म्हणतात. त्यामुळे गायींचे एकमेकींवर, शेतकऱ्यावर किंवा कुंपणावर हल्ले होणे पूर्णत: टाळले जाते. पूर्वी गायींच्या शेपट्याही (काही कुत्र्यांच्या कापतात त्याप्रमाणे) कापल्या जात. त्याला “टेल डॉकिंग” (tail docking) म्हणत. आता मात्र गायींच्या शेपट्या राखल्या जातात. दुसरा फरक म्हणजे भारतीय गायींना जसे वशिंड असते तसे या गायींना नसल्याचे त्यांची पाठ सरळसोट दिसते. शिवाय भारतात गायीच्या गळ्यात घंटा असण्याची आपल्याला सवय असते. इकडे गायींच्या गळ्यात घंटा बांधण्याची पद्धत नाही.

गायींचा पैदास करण्याचा ठराविक काळ असतो. साधारणत: ऑक्टोबर – नोव्हेंबर महिन्यात बहुतेक गायींचे कृत्रिम गर्भादान केले जाते. कधी कधी खास पैदाशीच्या बैलांचा वापर करूनही त्यांचे मीलन केले जाते. जुलै महिन्याचा मध्य ते पुढच्या मे महिन्यापर्यंत गायी दूध देतात. गायी व्यायला नंतरचे पहिल्या दहा दिवसाचे दूध म्हणजे चीक, जो आपल्याकडे खास खरवस करण्यासाठी वापरला जातो त्याला कोलोस्ट्रम (colostrum) म्हणतात. इकडे खरवस कोणाला ठाऊक नाही. वासरांनाच तो भरविला जातो व खूप झाला तर दूध व दुग्धजन्य पदार्थ निर्माण करणाऱ्या कंपन्या तोही विकत घेतात।

गायींचे “दुभते” आयुष्य साधारणत: १२ वर्षे एवढे असते. त्यानंतर त्या भाकड झाल्या की त्यांना खाटकांना विकून त्याचा खतासाठी किंवा इतर पाळीव प्राण्यांचे अन्न बनविण्यासाठी उपयोग केला जातो.

दुधाप्रमाणेच मांसासाठीही येथे गायी पाळल्या जातात . जर्सी व फ्रेझियन गायी खास दुधासाठी तर गोमांसासाठी अँगस (Angus) व हेरेफोर्ड (Hereford) या गायींची पैदास केली जाते.

गायींचे आजार फार नसतात. पण असले तर ते म्हणजे मिल्क फीवर (Milk Fever) हा वासरू जन्माला घातल्यावर येतो, पण औषधाने लगेच बरा होतो. ब्लोटिंग (Bloating) म्हणजे गायींचे पोट फुगते व सोअर फीट (Sour Feet) म्हणजे ओल्या रानात सतत फिरल्यामुळे त्यांचे पाय सुजतात. गरजेनुसार पशुवैद्य येऊन आजारी गायींना तपासून जातात पण त्यांनी ठराविक वेळा गायींना तपासलेच पाहिजेत असे सरकारी बंधन नाही.

ही सगळी माहिती मारी व गॉर्डन यांच्याकडून मिळाली पण हा सगळा नुसता व्यावसायिक भागच झाला. मी मारीला सांगितले की गायी म्हंटल्यावर भारतीय माणसाच्या डोळ्यासमोर चित्र उभे राहते ते गायीच्या पुढे उभे राहून बासरी वाजविणाऱ्या श्रीकृष्णाचे. वसुबारस, गायीची पूजा, श्रीकृष्णाच्या दुधाची चोरी इत्यादींची. शिवाय आपल्याकडे गायींना कपिला, नंदिनी असली नांवे ठेवून त्यांना त्यांच्या नांवाने हाक मारण्याचीही पद्धत. तिला विचारले तुम्ही गायींना नांवे ठेवता कां? ती म्हणाली “नाही.” म्हंटले “गायी मालक/मालकिणीला ओळखतात कां?” ती म्हणाली “ हो त्या आम्हाला ओळखतात, ट्रॅक्टरचा आवाजही ओळखतात आणि त्यांच्या हंबरण्यातून गप्पाही मारतात.” मारी तिच्या गायींचा उल्लेख “My girls” म्हणून करीत होती ते ऐकून छान वाटले. पण “आम्ही त्यांना फक्त एक प्राणी एवढेच समजतो.” हे ऐकून जरा निराशाच झाली.

एवढा मोठा दुधाचा धंदा म्हंटले त्या प्राण्यांचे एखादे सुंदर शिल्प, सुंदर व प्रसिद्ध चित्र या देशात आहे कां? किंवा आपल्याकडे गायींवर असतात तशा कविता विशेषत: लहान मुलांसाठी? किंवा खास गायींवर काही कादंबरी किंवा साहित्य? गायींच्या स्पर्धा असतात कां? त्या सर्वांना नकारात्मक उत्तर होते. (यासंबंधी एका खास पशुवैद्याचे नांव लिहिल्याशिवाय राहवत नाही. तो म्हणजे “जेम्स हेरियट” (James Herriot) या ब्रिटिश पशुवैद्याचे. तो त्याच्या कामात जितका प्रवीण होता तितकाच लेखनातही. त्याचे कोणतेही पुस्तक हाती घ्या. पूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेववणार नाही व हजारो प्राण्यांच्या हजारो गोष्टी व अनुभव वाचकाचे फारच मनोरंजन करतील.) नाही म्हणायला एक मजेशीर गोष्ट मात्र पहायला मिळाली . ती म्हणजे सोबतच्या चित्रात दाखविलेली दुधाच्या कॅनच्या आकाराची पोस्टाची पेटी. शिवाय न्यू झीलंडमधील लहान लहान खेड्यांमध्ये “काफ क्लब” (Calf Club) असतात. त्यात शाळेतील मुले एखादे वासरू, कुत्रे, शेळी, मेंढी आपला लाडका पाळीव प्राणी म्हणून पाळतात व दरवर्षी या क्लबतर्फे मुलांनी आपापल्या प्राण्यांना प्रदर्शनात आणायचे अशी सोय असते. उत्तम पाळीव प्राण्यांच्या स्पर्धा असतात. त्याबद्दल त्यांना बक्षिसेही दिली जातात व मुलांना त्याचे फार अप्रूप असते.

न्यूझीलंडमधील दुधाच्या सर्वात प्रसिद्ध कंपनीचे नांव आहे फॉंटेरा (Fontera). याशिवाय टाटुआ (The Tatua Co-op Dairy Co. Ltd.), वेस्टलँड मिल्क प्रॉडक्ट्स (Westland Milk Products) या व आइस्क्रीम साठी प्रसिद्ध असलेली टिप टॉप आइस क्रीम (Tip Top Ice Cream) याही जगप्रसिद्ध कंपन्या आहेत. त्या दूध, दुग्धजन्य पदार्थ, विविध प्रकारचे चीज, लोणी, दही, अर्भकांसाठी तसेच मोठ्या माणसांसाठी दुधाची पावडर असे शेकडो पदार्थ विविध कारखान्यांकडून बनवून घेऊन जगभर पुरवितात. दुधाच्या पावडरचा उपयोग आजारी माणसाला जेव्हां नाकात नळी घालून अन्न पुरवावे लागते त्यावेळी लागणारी विशिष्ट पावडर बनविण्यासाठी केला जातो. अस्थमा असलेल्या लोकांना चोंदलेले नाक मोकळे होण्यासाठी जे इनहेसर वापरावे लागतात त्यातही दुधाच्या पावडरचा वापर केला जातो. कॉम्प्यूटरच्या सर्किट बोर्डमधेही दूध पावडरचा वापर केला जाई यावर विश्वास बसणे कठीण आहे. पण ते सत्य आहे.

शेतकरी ज्या कंपनीला दूध पुरवितात त्यांचे शेअर शेतकऱ्यांना मिळून कंपनीच्या फायद्यात त्यांनाही वाटा मिळतो. त्यामुळे मारीने जेव्हां तिच्या फार्म हाउसवर जाण्यासाठी दाराशी गाडी थांबविली तेव्हां मी आश्चर्याने तिच्या नव्या कोऱ्या गाडीकडे पहात राहिले. “मी दोन आठवड्यांपूर्वीच ही नवी गाडी चाळीस हजार डॉलर्सला घेतली” असे तिने सांगितल्यावर “सधन” शेतकरी म्हणजे काय याची कल्पना आली।

दुधाच्या धंद्याचे हस्तांतर एका पिढीतून दुसरीकडे सर्वसाधारणत: होत असतेच. पण नव्याने हा उद्योग सुरू करायचा असेल तर त्यासाठी प्रशिक्षणाची सोय मॅसी विद्यापिठात (Massey University) आहे. त्यासाठी Horticulture and Agriculture Science या अभ्यासक्रमात नांव नोंदवून Dairy Farming या विषयाचे शिक्षण घेता येते. मॅसी विद्यापिठाकडे स्वत:ची शेते व गायी असून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभवही तिथे मिळतो व स्वत:चा स्वतंत्र व्यवसाय सुरू करणे सोयीचे होते.

मारी व गॉर्डन यांनी मी विचारलेल्या हजारो प्रश्नांची मनापासून उत्तरे दिली. शिवाय या सर्व गोष्टी प्रत्यक्षात पाहून, त्यांचे फोटो काढता आले व दुधाच्या देशातील खराखुरा अनुभव घेता आला. चांगला योगायोग यापेक्षा याला वेगळे काय म्हणणार? आणि ही सगळी माहिती लेखाद्वारे तुमच्यापर्यंत पोचविण्याचा आनंदही आगळाच आहे!

कल्याणी गाडगीळ, न्यूझीलंड

सदर लेख लोकमत वृत्तपत्रात पूर्व प्रसिध्द झाला आहे