आयुष्यांच्या पेटवा मशाली

धुमसतात अजुनी विझल्या चितांचे निखारे
अजुनी रक्त मागत फिरती वधस्तंभ सारे…
आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली
अरे पुन्हा पेटवा आयुष्यांच्या पेटवा मशाली…

सुरेश भटांनी अनेक वर्षांपूर्वी लिहीलेल्या या कवितेच्या ओळी सध्याच्या सामाजिक परिस्थितीला अनुसरूनच आहेत. अंर्तमुख होऊन विचार केला तर यातलं धगधगतं वास्तव आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. १५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले पण त्या दिवसापासून आजच्या तारखेपर्यंत पहाता असे लक्षात येते की, देशाची प्रगती होण्याबरोबरच इथल्या समस्याही वाढू लागल्या. गरीबी, निरक्षरता, बेकारी, दहशतवादी हल्ले, बाबरी मशिद प्रकरण, मुंबईमध्ये झालेले बाँम्बस्फोट, संसदेवर झालेला हल्ला, काही मंदिरावर झालेले हल्ले अशा अनेक समस्यांना देशाला सामोरं जावं लागलं, या सगळयातनं वाट काढता काढता, प्रगती साधायची म्हणजे खरं तर तारेवरची कसरत! रोज काहीतरी घडतं आहे. अतिवृष्टी, भूकंप, अपघात बाँम्बस्फोट, जातीय दंगली असे रोज काही ना काही घडतंच आहे. आजच आपल आयुष्य खरोखर किती सुरक्षित आहे?

आपणच निवडून दिलेलं शासन वेळेवर संकटात सापडलेल्या लोकांना मदत करण्यासाठी माणसं पाठविण्यात अपयशी ठरलं मग लोक करणार काय? असं असलं तरीही आक्रोशणा-या, विव्हळणा-या प्रत्येक‍ माणसाला मदत करणं म्हणजे फक्त सामाजिकतंचं भान राखणं असा आहे का? याचा विचार समाजात राहणा-या प्रत्येकाने किमान एकदा तरी करावा. अशा घटनांवर सहज मात करणारा सामान्य माणूस हा संपूर्ण समाजरचनेचा कणा आहे ही बाब आपणच लक्षात घेत नाही. आज इथं एक वर्ग असा आहे की ज्या वर्गाला वाटतं, ‘बाहेर काहीही घडो आपल्याला काही झळ बसलेली नाही ना आपल्यापर्यंत काही येत नाही ना मग दुनिया गेली खड्डयात …’ ही मानसिकता कधी बदलणार आहे? नागरीकशास्त्रात असं शिकवलं जातं की माणूस हा समाजशील प्राणी आहे…या ओळीचा उपयोग बरेच फक्त लेखी परीक्षेत मिळणारा एक गुण मिळविण्याकरीता करतात आणि मग सोयीस्करपणे ही ओळ विसरूनही जातात. सामान्य माणूस मात्र गप्प असतो किंबहुना त्याला अशा घटनांची सवय झाली आहे असं मला वाटतं.कुठलाही अन्याय झाल्यावर सरकार किंवा पोलीस यंत्रणेला दोष द्यायचा, चार दिवस त्या मुद्यावर चर्चा करायची, त्या मुद्याविषयीच्या बातम्या वाचायच्या, पाहायच्या, त्यावर एक चर्चा करायची आणि मग काही दिवसांनी नवा मुद्दा मिळाला की हे सारं विसरून जायचं. मनातल्या संवेदना इतक्या गोठून गेल्या आहेत ना की गेल्यावर्षी झालेल्या बॉम्बस्फोटांसारखे किती बॉम्बस्फोट झाल्यावर त्या प्रज्वलित होणार आहेत कुणास ठाऊक? की आपण फक्त धैर्यवान, सहनशील नागरिक अशी बिरूदं लावण्यात धन्यता मानणार आहोत. आत्ताची वेळ अशी आहे की इथं प्रत्येकाचं रोजच जगणं कठीण होऊन बसलं आहे अशा
काळात आपण काहीतरी कृती करणं गरजेचं आहे. आपण निवडून दिलेल्या बहुतांश लोकप्रतिनिधींपैकी अनेकांनी आपल्याला आश्वासनंच दिली आहेत.

सध्या सगळया राज्यावर संकट आहे भारनियमनाचं. भारनियमनाचा भार आता सोसेनासा झाला आहे. लोक रस्त्यावर उतरले आहेत. आदोलनं होत आहेत तर कुठे दगडफेक, जाळपोळही होत आहे. पण आज जी परिस्थिती राज्यावर आली आहे त्याला फक्त आणि फक्त सरकार जबाबदार आहे असं म्हणून कसं चालेल? आपण नागरिक म्हणून जबाबदार नाही का? हा प्रश्न आज प्रत्येकानं स्वत:ला विचारायला हवा. आपण वीज वाचविण्यासाठी आजवर काय केलं? कितीवेळा वीजेचं बील वेळेवर भरलं असे साधे प्रश्न विचारले तरी आपल्याला प्रत्येकालाच भारनियमनाच्या संकंटाचा सामना करणं आणखी सोपं जाणार आहे. सरकार दोषी आहे पण तितकेच दोषी आपणही आहोत हे वास्तव स्वीकारायला हवं.

आपली अवस्था एक किंवा दोन बक-यांमागे चालणा-या मेंढयांच्या कळपासारखी झाली आहे. आपण या मेंढयांप्रमाणे कळप म्हणून न जगता समाजाचा एक कृतीशील आणि त्या समाजाविषयी मनात अभिमान असणारा घटक म्हणून राहणं जास्त गरजेचं आहे. आपल्या देशात २५ ते ४० या वयोगटात मोडणारा सर्वाधिक वर्ग आहे. या वर्गाने आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी स्वत: पावलं नाही उचलली तर पुढे आपल्या देशाला, राज्याला, शहराला खूप मोठे आघात सहन करावे लागतील. आजची परिस्थिती लक्षात घेतली तर इथे पुतळयाच्या विटबंनेपासून ते बॉम्बस्फोटांपर्यंत आणि कसलंही राजकारण खेळलं जातं. अशा परिस्थितीत नुसती टीका न करता असं का घडतं यावर विचार करून हे कसं होणार नाही याच भान राखणं गरजेचं आहे.

समाजातल्या प्रत्येकानेच स्वत: पुढाकार घेऊन ही परिस्थिती बदलण्यासाठी ठोस प्रयत्न केले पाहिजेत. अन्याया विरोधात आवाज उठवला जात नाही असं नाही पण अनेक प्रकरणं दडपली जातात. आजची सामाजिक परिस्थिती बदलण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणं आणि गरजेचं आहे. एखादा प्रश्न अनुत्तरीत राहतो तर तो का? गंभीर प्रकरणांचे खटले वर्षांनुवर्षे का चालतात? गुन्हेगार अनेकदा पुराव्या अभावी निर्दोष का सुटतात?, कुठलेही संकट आले की अतिरेकी संघटनांकडे बोट दाखवले जाते यामागे राजकारण आहे का? कारण अतेरिकी जर इतक्या कारवाया करू शकत असतील तर आपली सुरक्षा यंत्रणा कमकुवत आहे का? या आणि अशा अनेक अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरं शोधायला हवीत. हे खरं आहे की क्रांती किंवा कुठलाही बदल हा एका दिवसात होत नाही पण सुरूवात होणं खूप गरजेचं आहे. ही सुरूवात अशी असायला हवी ज्यामुळे आपल्या पुढच्या पिढीकडे कोणतेच प्रश्न अनुत्तरीत नसतील भविष्याची उज्ज्वल पहाट पाहण्यासाठी आजच्या रात्रीशी लढणं गरजेचं आहे म्हणजेच त्यानंतर उगवणारा प्रत्येक सोनेरी दिवस आपण अभिमानाने आणि स्वाभिमानाने
जगण्यात खरा आनंद आपल्याला मिळेल.

– समीर जावळे