तुम्हाला नाही वाटत आज महाराष्ट्रातून ‘मराठी बाणा’ दिवसागणिक क्षीण होत चाललाय. हरवत चाललाय. जागतिक स्तरावर इंग्रजी भाषा तर महत्त्वाची आहेच मात्र मातृभाषेतून शिक्षण घेणार्यांचं प्रमाण कमी होत चाललंय! आजकाल प्रत्येक पालकांना असे वाटते की आपल्या पाल्याने इंग्रजी शाळेत जावे व फाडफाड इंग्रजी बोलावे. पण याचा परिणाम साहित्य वाचनावरही होत नसेल का? इंग्रजी माध्यमातून शिकणार्या विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षक वि.वा. शिरवाडकर, पु. ल. देशपांडे, वि.स. खांडेकर यासारख्या साहित्यिकांची पुस्तक वाचायला देत असतील का? मराठी भाषेसाठी ज्ञानेश्वरांनी तत्कालीन समाजाचा जाच, रोष सहन करूनही “जो जो वांछील तो ते लाहो” असं पसायदान मागितलं. पण आज किती विद्यार्थी व पालकांना मराठी भाषेविषयी आस्था आहे?
इतर भाषांचा प्रभाव वाढतोय. संवादाची साधनं बदलतायत. आपली भाषा नसेल तर मग आपलाच उज्ज्वल वारसा, भाषेतील गोडवा, जमिनीशी नातं आपण हरवून बसू असा धोका नाही वाटत का? तो आळायचा असेल तर जीवन व्यवहारात मराठीला स्थान द्यायला काय हरकत आहे? इतर भाषांचा त्यासाठी दुस्वास करायला नको. सर्व भाषांचा स्वीकार व मातृभाषेचा सन्मान हाच त्यावर उपाय ठरू शकतो.
ज्ञानभाषा, संपर्कभाषा, व्यवहारभाषा यादृष्टीनं मराठी भाषेला शालेय स्तरापासून महत्त्व दिले गेले. पण मध्यमवर्गीय तरूणांचं जगणं दिवसेंदिवस बिकट होतंय. त्याला जगायचं कसं हा प्रश्न तिथं चळवळी तो काय करणार?
मध्यंतरी साहित्य संमेलन सॅन फ्रान्सिस्कोला व्हावं की नाही यावरून बरेच वाद झाले. राजकीय पक्षही मराठी मुद्दयाला नेहमी उचलून धरतात. पण वाद घालून मातृभाषेचे संवर्धन खरंच होतय की नाही हा महत्त्वाचा प्रश्न. आता आपणच विचार करायला हवा की मराठीचं साचलेपण आपल्याला हवंय की तिचं प्रभावी प्रवाहीपण? मराठीच्या प्रेमाचे उमाळे काढून काय साध्य होणार? आपण कृती काय करतो हे महत्त्वाचे नाही का?
आपण ज्या भाषेतून बोलतो, लिहितो, वाचतो तिच्यातच विचार, चितंन करण्याची आपल्याला सवय लागते. ती ज्या संस्कृतीतील शब्दधन होऊन आलेली असते. ती संस्कृती नकळत आपल्यावर सत्ता गाजवू लागते. ‘आजची प्रगत शास्त्रे त्यांची परिभाषा आपण मराठीत आणू शकत नाही’ पण हे अशक्य कृत्य फ्रेंच – जपान सारखे देश करू शकतात तर आपण का नाही? मित्रहो, इतरही भाषा आंतरराष्ट्रीय देवाण घेवाणीच्या दृष्टीनं महत्वाच्या आहेत. त्याही जरूर शिका. त्यांचा मान राखा, परंतू त्या भाषांच्या आधीन होऊन त्यांचे गुलाम होऊ नका.
मातृभाषेनेच आपल्याला संस्कारांचे बाळकडू पाजलंय हे न विसरता मराठमोळंपण आपण जपूया आणि मराठीचं नवं बीज पेरुया!
– संपदा देशपांडे, नाशिक