मराठीचे (बे) शुध्दलेखन

marathi shuddhalekhan ‘डोक्यावर सोनेरी मुकुट आणि अंगावर फाटके कपडे अशा अवस्थेत मराठी भाषा मंत्रालयाच्या दाराशी उभी आहे.’ १९८९ साली १२-१३ ऑगस्टला मुंबईला जागतिक मराठी परिषद भरली होती. त्या परिषदेत भाषण करताना कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी काढलेले हे उद्गार खूप गाजले. अधिक दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्यानंतरच्या २७ वर्षांच्या काळात मराठीची अवस्था अधिकाधिक खालावत गेली आहे. १९८९ साली तिच्या अंगावर असलेली फाटकी वस्त्रं सुध्दा आज ओढली जात आहेत. कोण करतं आहे हे वस्त्रहरण? इलेक्ट्रॉनिक माध्यमं, वर्तमानपत्रं, सरकार, जाहिरातदार, डीटीपी करण्यार्‍या व्यक्ती, काही शिक्षक-लेखक-प्राध्यापक आणि इतर सर्वसामान्य जनता सुध्दा! कशामुळं होतं आहे हे वस्त्रहरण? अज्ञान, स्वत:च्या भाषेविषयी असलेली एकूणच अनास्था, अस्मितेचा अभाव, ‘चलता है’ वृत्ती, इलेक्टॉनिक माध्यमांचा गैरवाजवी प्रभाव, प्रत्येक गोष्टीचा पैशाशी संबंध जोडण्याची खोड…. अशी अनेक कारणं. तद्दन इंग्रजी/हिंदी धाटणीची वाक्यरचना, चपखल मराठी वाक्‌प्रचार असतानाही हिंदी/इंग्रजी वाक्प्रचारांचा वापर, शुद्धलेखनाचे सगळे नियम गुंडाळून ठेवून केलेले लेखन आणि त्यामुळं काही वेळेस होणारा अर्थाचा अनर्थ, तथाकथित अलंकारिक परंतु अर्थहीन असे शब्दांचे बुडबुडे आणि दुर्बोध लेखन… अशा अनेक प्रकारांनी आजकाल मराठीचं प्रचंड प्रमाणावर प्रदूषण केलं जात आहे, तिची अक्षम्य मोडतोड केली जात आहे.

काही उदाहरणं पाहू या.

आपल्या मराठीत ‘सर्वेक्षण’ हा (मूळचा संस्कृतमधला) शब्द आहे. त्याचा अर्थ आहे ‘पाहणी’. इंग्रजीत त्यासाठी वापरला जाणारा शब्द आहे- सर्व्हे. कोणीतरी, केव्हातरी ‘सर्वेक्षण’ आणि ‘सर्व्हे’ या शब्दांचा संकर केला आणि मराठी भाषेला एक नवीन शब्द बहाल केला-‘सर्व्हेक्षण!’ आजकाल हा शब्द मोठ्या आत्मविश्वासानं मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. महाराष्ट्रातल्या अगदी आघाडीवर असलेल्या वर्तमानपत्रांमध्ये सुध्दा ! आहे की नाही गंमत? शब्दांच्या मुळाशी न जाता ते बेधडकपणे वापरण्याची आपली खोड फार जुनी आहे. उदाहरण द्यायचं तर ‘सुजलाम्‌ सुफलाम्‌’ हे संस्कृत शब्द पहा. केवळ पुढारीच नव्हे तर ज्यांनी शब्दांचा वापर काळजीपूर्वकच केला पाहिजे असे पत्रकार-शिक्षक-लेखकही आग्रहानं सांगतात- ‘आपली मातृभूमी सुजलाम्‌ सुफलाम्‌ झाली पाहिजे!’ या वाक्यात हे शब्द खरं तर सुजला, सुफला असे हवेत. परोक्ष आणि अपरोक्ष हे शब्द सामान्यांकडूनच नव्हे तर जाणकारांकडूनही (!) नेमक्या उलट्या अर्थानं वापरले जातात. हे दोन्ही शब्द संस्कृत भाषेतले आहेत. संस्कृत भाषेत परोक्ष भूतकाळ नावाचा भूतकाळाचा एक प्रकार आहे. जुन्या ग्रंथात- उदा. रामायण, महाभारत- हा भूतकाळ वापरलेला आहे. भगवद्गीतेची सुरूवात ‘संजय उवाच’ या वाक्यानं होते. या वाक्यातला ‘उवाच’ हा शब्द ‘म्हणणे’ या क्रियापदाचं परोक्ष भूतकाळाचं रूप आहे. परोक्षचा मूळ अर्थ म्हणजे अप्रत्यक्ष किंवा (एखाद्याच्या) अनुपस्थितीत आणि अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष किंवा (एखाद्याच्या) उपस्थितीत. संस्कृतच्या अज्ञानामुळं मग या शब्दांची बिनदिक्कतपणे उलटापालट केली जाते. वर हीच अज्ञानी मंडळी संस्कृतवर मृतभाषा असल्याचा शिक्का मारण्यात आघाडीवर असतात.

अनेक मराठी भाषकांना (भाषिकांना नव्हे!) तर अनुस्वार कोणत्या अक्षरावर द्यायचा हेच उमगत नाही. त्यामुळे ते ‘आनंद’ हा शब्द ‘आंनद’ असा लिहितात यासारखी दुसरी दु:खाची गोष्ट कोणती असेल? हे लोक ‘गंमत जंमत’ हा शब्द ‘गमंतजमंत’, असा लिहून फारच मोठी गंमत करतात. ‘अचूक’ हा शब्द ‘अचुक’ असा लिहिणं बरोबर आहे असं अनेकांना वाटतं. ‘नेहमी’ हा शब्द ‘नेहेमी’ असा लिहिला जातो हे मी नेहमी पाहिलं आहे. सप्तशृंगी देवीचे भक्त तिचं नाव ‘सप्तश्रृंगी’ असं लिहून साक्षात देवतेलाही अशुध्दलेखनातून वगळत नाहीत. मी एकदा सहकुटुंब फिरायला गेलो होतो तेव्हा एका पाणपोईजवळ फलक दिसला – ‘पिण्याचे पाणि!’ मला हसू आवरेना. माझा छोटा मुलगा (सुध्दा!) हसत-हसत मला म्हणाला, ‘बाबा, हे पाणि अशुध्द आहे. मी नाही पिणार हे अशुध्द पाणि!’ तो फलक पाहून मी मात्र माझा पाणि कपाळावर मारून घेतला. शब्दांच्या अचूक वापराबाबत नेहमी दुसर्‍यांना डोस पाजणार्‍या एका शहरातल्या बस-स्थानकावर ‘उपहार-गृह’ ही पाटी मी कित्येक वर्ष पाहत आलो आहे. आजपावेतो हजारो प्रवासी या उपहार-गृहात जाऊन (भेट म्हणून नव्हे तर पैसे मोजून) उपाहार करून आले आहेत तरी ते गृह मात्र ‘उपहार-गृह’च राहिलं आहे!

सर्वसामान्य व्यक्तींकडून शुध्दलेखनाच्या अशा चिंध्या केल्या जातातच पण काही साहित्यिक संस्थाही याबाबतीत पुढे ़असतात. अशाच एका संस्थेनं ‘तुका झालासे कळस’ या विषयावर मराठीतल्या एका नामवंत संत-वाड;मय अभ्यासकाचं भाषण आयोजित केलं होतं. या कार्यक्रमाच्या वेळी व्यासपीठावर लावलेल्या कापडी फलकावरच्या या गंमती पहा- तालूका (दोन ठिकाणी), साहीत्यीक, साहीत्य, इंद्रजीत. आणि भाषणाचा विषय लिहिलेला होता- ‘तूका झालासे कळस!’ संयोजकांच्या या करामतींमुळं अशुध्दलेखनावरच कळस चढवला गेला हे नक्की. असाच किस्सा महाराष्ट्रातल्या एका नामवंत विद्यापीठाचा. त्या विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवाचा जंगी कार्यक्रम होता. व्यासपीठावरच्या सजावटीत ‘विद्यापिठ’ हा शब्द आकर्षक पध्दतीनं लिहिण्यात आला होता आणि विद्येचं वेगळ्या अर्थानं पीठ करण्यात आलं होतं. शैक्षणिक दृष्ट्या प्रगत समजल्या जाणार्‍या महाराष्ट्रात इ.स. २००७ मध्ये प्रसिध्द झालेल्या एका क्रमिक पुस्तकात शुध्दलेखनाच्या इतक्या चुका झाल्या होत्या की त्या पुस्तकाबरोबर शुध्दिपत्रक देण्याचीही कल्पना सोडून द्यावी लागली; कारण ते शुध्दि‘पत्रक’ न राहता शुध्दि‘पुस्तक’ बनलं असतं. त्यामुळं ती लाखो पुस्तकं रद्दबातल ठरवावी लागली आणि लक्षावधी रुपये पाण्यात गेले असं म्हणतात.

हिंदी आणि इंग्रजी भाषांच्या मराठीवर होणार्‍या आक्रमणामुळं मराठीचं ‘मराठीपण’ हरवत चाललेलं आहे. १९८० च्या दशकात दूरचित्रवाणीच्या हिंदी आणि इंग्रजी भाषेतल्या वाहिन्या मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्या आणि या आक्रमणाला सुरूवात झाली. या वाहिन्यांमुळं आठवड्याचे सातही दिवस आणि दिवसाचे २४ तास आमच्या कानावर प्रामुख्यानं हिंदी आणि इंग्रजीच आदळत असतं. त्यामुळं आमचं मराठी झपाट्यानं बिघडत गेलं आहे. विशेष म्हणजे दूरचित्रवाणीच्या मराठी वाहिन्यांनीही या बिघडण्याला विशेष हातभार लावला आहे. त्यामुळं आम्ही आमची मूळची मराठी, तिची वैशिष्ट्यं, तिचं सौंदर्य गमावून बसलो आहोत. तिचं मोठ्या प्रमाणावर विद्रुपीकरण झालं आहे. ज्या हिंदी/ इंग्रजी शब्दांसाठी मूळ मराठीत अतिशय चांगले, सोपे शब्द आहेत तेथेही अज्ञानानं किंवा हलगर्जीपणानं हिंदी/इंग्रजी शब्द अथवा वाक्‌प्रचार वापरले जातात. उदा. संकटाचा सामना (मराठी-संकटाशी सामना), छाप सोडली (ठसा उमटवला), कॉंटेकी टक्कर (अटीतटीचा सामना/लढाई/स्पर्धा), प्रधानमंत्री (पंतप्रधान), केंद्रीय सुरक्षा बल (केंद्रीय सुरक्षा दल), चांगले करणे (चांगली प्रगती/कामगिरी करणे), अर्धसैनिक दल (निमलष्करी दल), व्यस्त (व्यग्र), प्रश्नचिन्ह लावणे (प्रश्नचिन्ह उभं करणे), पाणी फेरणे (बोळा फिरवणे), आम्हांला संपर्क करा (आमच्याशी संपर्क करा), नेतृत्वात (नेतृत्वाखाली), सुधारित कामाच्या वेळा (Revised business hours चे शब्दशः भाषांतर! या ठिकाणी कामाच्या सुधारित वेळा असं म्हणायला हवं !), गतिरोधक पुढे आहे (Speed breaker Ahead चे मठ्ठ भाषांतर ! हे भाषांतर ‘पुढे गतिरोधक आहे’ असं हवं!)….. अशी अनेक उदाहरणं दूरचित्रवाणी, वर्तमानपत्रं, रस्त्यावरचे फलक अशा अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दिसतात.

असे शब्द वापरल्यानं मराठी कुरूप तर होतेच पण काही वेळा अर्थाचा अनर्थही होतो. मराठी आणि हिंदी भाषांमध्ये अनेक शब्द समान असले तरी त्यांचे अर्थ किंवा अर्थछटा वेगवेगळ्या आहेत याची थोडीही जाणीव ठेवली जात नाही. उदा. ‘सर्व शिक्षा अभियान’ हा शब्द-समूह आपण नेहमी वाचतो. हिंदीत ‘शिक्षा’ म्हणजे शिक्षण तर मराठीत शिक्षा म्हणजे (विशेष प्रचलित अर्थानं) सजा. त्यामुळे मराठीत ‘सर्व शिक्षा अभियान’ राबवायचं तर सर्वांना शिक्षा म्हणजे सजा देण्याची मोहीम राबवावी लागेल! मराठीतल्या ‘प्रयत्नां’ची हिंदीत ‘चेष्टा’ करतात. मराठीतला ‘बुवा’ हिंदीत गेल्यावर बाई बनतो-‘आत्या’ होतो. (हिंदीत ‘आत्याबाईला मिशा असत्या तर..’ अशी म्हण नसावी). मराठी मनुष्य एखाद्या गोष्टीचा ‘सराव’ करतो तर हिंदी भाषक ‘अभ्यास’ करतो. हिंदीतली ‘सभ्यता’ मराठीत ‘संस्कृती’ बनून येते. मराठीतल्या ‘आपत्ती’ला हिंदी लोक ‘हरकत’ घेतात. मराठीतली ‘सही’ हिंदीत ‘हस्ताक्षर’ बनते तर मराठीतल्या ‘जगा’चे हिंदीत ‘संसारा’त रूपांतर होते. मराठीत ‘व्यक्ती’ हो शब्द स्त्रीलिंगी आहे तर हिंदीत तो पुल्लिंगी वापरला जातो. हिंदीच्या प्रभावाखाली असलेल्या व्यक्ती मराठीत ‘तो व्यक्ती’ अशी रचना बिनदिक्कतपणे करताना आढळतात. काही वर्षांपूर्वी आपल्या महाराष्ट्रातले एक प्रसिध्द पुढारी लोकसभेत पहिल्यांदाच निवडून गेले. ते पहिल्याच भाषणासाठी उभे राहिले आणि मराठीतल्या सवयीप्रमाणे म्हणाले, ‘अध्यक्ष महाराज!’ लोकसभेत खसखस पिकली. कारण हिंदीत (विशेषत: बोली भाषेत) ‘महाराज’ म्हणजे आचारी! त्यांनी म्हणायला हवं होतं ‘अध्यक्ष महोदय!’ थोडक्यात, हिंदी आणि मराठी बहिणी असल्या तरी सख्ख्या बहिणी नव्हेत याचं भान आपण सतत राखलं पाहिजे.

याशिवाय, मराठीत अनेक शब्दांचा चुकीच्या पध्दतीनं वापर केला जातो. उदा. वैविध्यता (बरोबर शब्द- वैविध्य किंवा विविधता), अव्याहतपणे (अव्याहत), नावीन्यता (नावीन्य), मतितार्थ (मथितार्थ), कृपया करून (कृपया किंवा कृपा करून)… अशी अनेक उदाहणं देता येतील. सर्वात गंमतीचा भाग म्हणजे मराठी मातृभाषा असलेल्या अनेकांना खुद्द स्वत:चं नाव सुद्धा शुध्द स्वरूपात कसं लिहायचं हे माहीत नसतं! रविंद्र (बरोबर शब्द- रवींद्र), शिला (शीला), लिना (लीना), निलिमा (नीलिमा)…. अशी अनेक नावं या संदर्भात सांगता येतील.

मराठी वाक्यरचना करतानाही अनेकदा घोटाळे केले जातात. मराठीत शब्दांचा जागा बदलल्या की अर्थ बदलतो. याच लेखात आधी एक उदाहरण दिलेलं आहेच- Revised business hour चं भाषांतर करताना ‘सुधारित कामाच्या वेळा’ अशी गफलत एका प्रसिध्द आणि महाराष्ट्रातच जन्माला आलेल्या आणि फोफावलेल्या बँकेमध्ये मी बघितली आहे. (या उदाहरणावरून वेळा सुधारण्याइतकेच काम ही सुधारणे आवश्यक आहे हेच दिसून येते!) महाराष्ट्रातल्या दोन प्रमुख वर्तमानपत्रात आलेली ही वाक्ये पहा- ‘गोदावरी नदीत पाणीसाठा नसल्याने खळाळून वाहणारा सोमेश्वर धबधबा कोरडा पडला आहे.’ ‘बंदुकीऐवजी नक्षलवाद्यांच्या हातात नांगर.’ ‘या नेत्र-रूग्णालयाच्या उपचार पध्दतीमुळे मुलांवर आलेले अंधत्वाचे संकट दूर झाले.’ ‘ऑपरेशन स्माइलमुळे हजारो वाट चुकलेल्या मुलांची घरवापसी होणार.’ वगैरे.

दुसर्‍या भाषांमधले शब्द मराठीत वापरायला हरकत घेतली की नेहमी असा युक्तिवाद केला जातो की अशा शब्दांमुळं भाषा समृध्द (?) होते. या संदर्भात स्वा. सावरकरांनी काय म्हंटलं होतं ते पाहणं योग्य ठरेल कारण त्यांनी भाषाशुध्दीच्या बाबतीत फार मोलाचं काम केलं आहे. सावरकर म्हणतात- ‘बाहेरचे शब्द तरच स्वभाषेत येऊ द्यावेत वा आले असता टिकू द्यावेत की जर त्या शब्दांनी व्यक्त होणारी कल्पना काही केल्या आपल्या शब्दांनी व्यक्त होऊ शकत नसेल.’ एखाद्या कल्पनेसाठी सुटसुटीत शब्द असताना दुसर्‍या भाषेतून शब्द स्वीकारणं म्हणजे ‘स्वत:च्या औरस मुलांची कत्तल करून दुसर्‍याची मुले दत्तक घेण्यासारखे आहे’ असंही त्यांनी मोठ्या मार्मिकपणं म्हटलं आहे. दुसर्‍या एका ठिकाणी ते म्हणतात- ‘पुन्हा एकवेळ इतकीच विनंति करावयाची आहे कीं, रूढ विदेशी शब्द काढणें वा नवीन स्वकीय रूढ करणें कठीण आहे अशी आधीच समजूत करून घेऊन स्वस्थ बसूं नका…. प्रयोग करीत गेलें म्हणजे आपोआप लेखांतून शिक्षितांत आणि शिक्षितांतून अशिक्षितांत हे शब्द पाझरत जातील.’ स्वत: सावरकरांनी असे अनेक शब्द तयार केले आणि आज ते सर्वसामान्य माणसाकडून ही मोठ्या प्रमाणावर वापरले जातात.

मराठी भाषेच्या (बे)शुध्दलेखनाबाबत अनेकदा ‘चलता है’ वृत्ती दिसून येते ती अतिशय घातक आहे. शुध्द मराठीचं जतन आणि संवर्धन करणं हे काम आपलं म्हणजे मराठी मातृभाषा असलेल्या सर्वांचं आहे. हे काम आपण केलं नाही तर कोण करणार? ‘मला काय म्हणायचं आहे ते समोरच्याला कळलं ना- झालं तर मग!’ अशीही एक प्रतिक्रिया या संदर्भात नेहमी ऐकू येते. हा दृष्टिकोन खूपच संकुचित आणि भाषेच्या संवर्धनासाठी धोकादायक आहे. ‘एकवेळ साम्राज्याचा त्याग करू पण शेक्सपिअर गमावणार नाही’ असं एखादा ब्रिटीश माणूस म्हणतो या पासून आपण काहीतरी शिकलं पाहिजे आणि प्रत्यक्ष कृती केली पाहिजे. आपण मराठीचा वारसा ज्ञानेश्वरांपासून गडकरी-केशवसुत-पु.ल.-गदिमा-शांता शेळके-कुसुमाग्रज-पाडगावकर अशा अनेक साहित्यिकांपर्यंत आला आहे असं म्हणतो. या वारशाचं जतन आपण मनापासून केलं पाहिजे. केवळ भौतिक प्रगती म्हणजे जीवन नव्हे. विज्ञान माणसाला जगवतं आणि भाषा/साहित्य त्याला जगण्याचं प्रयोजन सांगतं. मानवाच्या जीवनातून भाषा/साहित्य वजा केलं तर त्याचा यंत्रमानव होण्यास वेळ लागणार नाही. आपल्या मातृभाषच्या एकूण व्यवहाराकडे अशा व्यापक दृष्टीनं बघितलं पाहिजे. आपल्या आईबद्दल आपल्याला जसं अपार ममत्व वाटतं तसंच तिच्याकडून आलेल्या भाषेबद्दलही वाटलं पाहिजे.

हे झालं नाही तर काय होईल याचं मार्मिक विवेचन कुसुमाग्रजांनी केलेलं आहे. या लेखाच्या सुरवातीला ज्या भाषणाचा उल्लेख केलेला आहे त्या भाषणात ते (१९८९ मध्ये) म्हणाले होते- ‘राज्यस्थापनेच्या २५ वर्षानंतरही मराठीला आपलं हक्काचं सिंहासन अद्याप मिळालेलं नाही आणि ते मिळत नाही याचं कारण ते रिकामं नाही. या मातीशी कोणतंही नातं नसलेल्या एका परकीय भाषेनं-इंग्रजीनं- ते बळकावलेलं आहे. इंग्रज गेले पण इंग्रजी राहिली आहे — सर्व वरिष्ठ व्यवहारात आणि समाजाचं नेतृत्व करणार्‍या वरिष्ठांच्या मनातही. देहाला बांधणार्‍या दृश्य साखळदंडांपेक्षा मनाला बांधणारे अदृश्य साखळदंड अधिक भक्कम असतात…. पन्नास-साठ वर्षांनतर मराठीपण संपूर्ण हरवलेला आणि सकस इंग्रजीकरणापर्यंत न पोचलेला असा एक अस्मिताहीन, बाजारातील समाज आपल्याला येथे निर्माण करावयाचा आहे का याचा विचार नेत्यांनी, विचारवंतांनी आणि मुख्यत: शासनानं करायला हवा…..’

आपण आजची सामाजिक स्थिती पाहिली तर कुसुमाग्रजांनी व्यक्त केलेली भीती खरी ठरताना दिसत आहे. त्यामुळं, मराठीची अवस्था अधिक खालावू नये यासाठी प्रत्येक मराठीप्रेमी व्यक्तीनं कृतिशील होणं अत्यंत आवश्यक आहे. काय काय करता येईल आपल्याला?

१) मराठी बद्दलची अनास्था ताबडतोब झटकून टाकून मी शुध्द मराठीचा वापर करीन असा निश्चय प्रत्येकानं करावा. ‘एवढा वेळ कुणाला आहे’, ‘याचा मला काय आर्थिक फायदा’ अशासारखी वाक्यं उच्चारू तर नयेतच पण मनातही आणू नयेत. शुध्द लेखनाचे नियम समजावून घेऊन त्याप्रमाणे त्यांचा वापर करावा. Whatsapp वर मराठी लिहिताना विशेष काळजी घ्यावी कारण या अफाट लोकप्रिय ‘चावडी’वर मराठीच्या अक्षरशः चिंध्या केलेल्या असतात.

२) आपल्या मित्रांबरोबर अथवा नातेवाईकांबरोबर ‘वाचन मंडळं’ सुरू करावीत. महिन्यातून किमान एकदा एकत्र येऊन मराठीतल्या दर्जेदार साहित्याचं वाचन करावं. पुस्तक-भिशी सुरू करावी. सर्व सदस्यांना शुध्दलेखनाच्या नियमांची माहिती द्यावी. मराठीवर होणार्‍या हिंदी, इंग्रजीच्या आक्रमणाबद्दल जाणीव करून द्यावी.

३) वृत्तपत्रं, इलेक्ट्रॉनिक माध्यमं यांच्याकडून मराठी संदर्भात काही गफलती होत असतील तर त्या ताबडतोब त्यांच्या निदर्शनाला आणून द्याव्यात आणि त्या सुधारण्याचा आग्रह धरावा.

४) वृत्तपत्रात लेखन करणार्‍या व्यक्ती, डी.टी.पी. करणार्‍या व्यक्ती, सर्व प्रकारच्या माध्यमातले पत्रकार, शिक्षक, प्राध्यापक यांच्यासाठी विविध साहित्यिक संस्थांनी/तज्ञ व्यक्तींनी कार्यशाळा आयोजित कराव्यात.

एकंदरीतच, मराठीच्या ढासळत्या परिस्थिती संदर्भात एक सर्वव्यापी साहित्यिक चळवळ उभी राहणं अत्यंत आवश्यक आहे.

सरकारच्या पातळीवरची अनेक पावले उचलता येतील.

१) कोणत्याही सरकारी नोकरीत प्रवेश करण्यासाठी आणि बढतीसाठी मराठी भाषेचं ज्ञान अनिवार्य करणे. त्यासाठी परीक्षा घेऊन प्रमाणपत्र देणे. या परीक्षा ३ किंवा अधिक पातळ्यांवर घेऊन त्या परीक्षांची काठिण्य-पातळी वाढवत नेता येईल. यासाठी सरकारी नियमांमध्ये आवश्यक ते बदल करणे.

२) शालेय स्तरावर व्याकरण अनिवार्य करणे. त्याला योग्य ते महत्व देऊन त्या साठी विशेष गुण देणे.

३) ‘सरकारी मराठी’ हा अनेकदा उपहासाचा विषय ठरतो. सरकारी कारभारामधले बोजड शब्द काढून टाकून सोपे शब्द आणण्यासाठी एका तज्ञ समितीची नेमणूक करणे. (अलीकडेच अशी समिती नेमली गेली आहे असं वाचनात आलं. ही बातमी खरी असेल तर ते अतिशय योग्य पाऊल ठरेल).

४) गेल्या काही वर्षात तंत्रज्ञानानं प्रचंड भरारी घेतलेली आहे. त्यामुळं अनेक नवीन इंग्रजी शब्द निर्माण झाले आहेत. ते शब्द मराठीत जसेच्या तसेच वापरणं योग्य ठरेल. उदा. हार्ड-डिस्क, सीडी. वगैरे. यासंबंधीचं धोरणही वरील समितीनं ठरवणे. समितीनं स्वत:चं संकेत-स्थळ निर्माण करून सर्व निर्णय तेथे उपलब्ध करून देणे.

आपली मायबोली असलेली मराठी भाषा टिकली पाहिजे- आणि तीही शुद्ध स्वरूपात. ती केवळ बोली भाषा न राहता लेखनाचीही भाषा राहिली पाहिजे. तिची मूळची वैशिष्ट्यंसुध्दा तशीच राहिली पाहिजेत. ज्या ज्या सुशिक्षित व्यक्तीची मराठी ही मातृभाषा आहे त्या त्या व्यक्तीची ही नैतिक जबाबदारी आहे.

शब्दांकन – डॉ. गिरीश पिंपळे

९४२३९६५६८६, gpimpale@gmail.com