महाराष्ट्राचे ज्येष्ठ आणि लाडके कवी, महाराष्ट्र भूषण श्री. मंगेश पाडगांवकर हे मागच्या महिन्यात नुकतेच इंग्लंडचा दौरा करुन गेले. १० मार्च रोजी त्याचा ८० वा वाढदिवस होता. तो त्यांना आपल्या आप्तस्वकियांच्या समवेत साजरा करण्याची जबर इच्छा होती, म्हणून ते इथे पूर्ण आठवडाही राहिले नाहीत. पण इथल्या या थोडक्या वास्तव्यांत त्यांनी दोन असामान्य गोष्टी केल्या. सर्वप्रथम ते सेंटरबरीला (Centerbury) गेले. सेंटरबरी म्हणजे इंग्लंड मधल्या ख्रिश्चन लोकांची काशी. तिथल्या कॅथेड्रल (Cathedral) मध्ये इंग्लंडचे धर्मगुरू, The archbishop of Centerbury यांचे निवासस्थान आहे. तिथे जाऊन श्री. पाडगांवकर, धर्मगुरूंच्या सहाय्यिका Cannon Clarence यांना भेटले. त्या भेटीत त्यांनी आपण मराठीत भाषांतरीत केलेल्या बायबलची एक प्रत त्यांना समर्पित केली. दुसर्या दिवशी ते, शेक्सपीअरच्या जन्मगावी म्हणजे Stratford upon Avony ला गेले. तिथल्या शेक्सपीअर स्मारकगृहांत एक ग्रंथालय आहे. त्या ग्रंथालयात शेकडो जुने ग्रंथ आणि हस्तलिखिते जतन करून ठेवली आहेत. त्या ग्रंथालय चालकाची (Curator) श्री. पाडगांवकरांनी भेट घेतली. त्यांना आपण मराठीत भाषांतरीत केलेल्या ज्युलिअस सीझर, टेम्पेस्ट, रोमिओ आणि ज्युलिअट या नाटकांच्या प्रती सादर केल्या. ह्या चारही भाषांतराचं वैशिष्टय असं की मुळच्या लिखाणांत (बायबल आणि तिन्ही नाटके) एखादा स्वल्पविरामसुध्दा श्री. पाडगांवकरांनी इकडचा तिकडे होऊ दिला नाही.
शनिवार (७ मार्च २००९) संध्याकाळी लंडनच्या महाराष्ट्र भवनात त्यांनी ‘माझे जीवनगाणे’ हा कार्यक्रम सादर केला. पाडगांवकरांचा कार्यक्रम म्हटल्यावर हॉल तूडूंब भरला नसता तरच नवल. हा कार्यक्रम श्री. रामदास फुटाणे यांनी श्री. पाडगांवकरांच्या घेतलेल्या मुलाखतीद्वारे सादर केला गेला. या मुलाखतीतून पाडगांवकरांनी पहिली कविता केव्हा लिहिली, कोणाला उद्देशून लिहिली, त्यांच्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात आलेले बरे वाईट अनुभव, त्यांना कविता,गाणी लिहायची स्फूर्ति केव्हा आणि कशी येत असे इ. अनेक गोष्टी श्रोत्यांच्या समोर आल्या. त्याचं प्रसिध्द गाणं ‘श्रावणात घननीळा’ हे त्यांनी केव्हा आणि कशा परिस्थितीत लिहिले हे ऐकतांना श्रोते गुदगुल्या केल्यासारखे हसले. पाडगांवकर आणि वात्रटिका ही जोडी अतूटच आहे. खरं म्हणजे वात्रटिका हा शब्दच पाडगांवकरांनी मराठी भाषेला बहाल केला आहे. तेव्हा अशा काही खास वात्रटिकांचं वाचन होणं अगदी अटळ होतं. मुलाखतीच्या सुरूवातीलाच पाडगांवकरांनी फुटाण्यांवर केलेली वात्रटिका ऐकवून श्रोत्यांमध्ये खसखस पिकवली होती. पाडगांवकरांच्या इतर काव्यांत आणि साध्या बोलण्यातही मिष्कीलपणा अगदी काठोकाठ भरलेला आहे. त्यामुळे संपूर्ण कार्यक्रमांत कधी खसखस पिकत होती तर कधी हास्याची कारंजी फुटत होती. कार्यक्रम नुसता गद्य नव्हता. पाडगांवकरांची गाणी स्टेजवर सादर करण्यासाठी अत्यंत सुरेल, स्थानिक गायक आणि वादकांचा संच हजर होता. (स्थानिक म्हणजे फक्त लंडनचे नव्हते, तर इंग्लंडच्या अगदी कानाकोपर्यातून आलेले.)
पाडगांवकर मुबंईहून आले, तेव्हा नुकतेच दुखण्यातून उठले होते. दुखणं जरी बरं झाल असले तरी ते अतिशय वेदनाजर्जर होते. ती गोष्ट लक्षात घेऊन कार्यक्रम आयोजकांनी कार्यक्रम लवकर आटोपता घ्यायचं ठरवलं. इतकं असूनही तीन तास आयोजित केलेला हा कार्यक्रम चक्क चार तासांनी संपला!
हा कार्यक्रम महाराष्ट्र मंडळ आणि काळे ट्रस्ट यांनी संयुक्तरित्या आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या शेवटी, मंडळाच्या अध्यक्ष श्रीमती. यामिनी साठे यांनी महाराष्ट्र भूषण श्री. मंगेश पांडगांवकर यांना एक शाल आणि श्रीफळ अर्पण केले. काळे ट्रस्ट तर्फे श्री. मुकूंदराव नवाथे यांनी महाराष्ट्र भूषण श्री. मंगेश पाडगांवकरांना एक पगडी आणि उपरणे अर्पण केले. आणि टाळयांच्या कडकडाटात या अविस्मरणीय कार्यक्रमाची समाप्ती झाली.
मनोहर राखे, लंडन