लेस्टर – एक प्रशंसनीय पुनरुज्जीवन!

मी १९६७ साली इंग्लंडला आलो. त्यावेळी केनिया, युगांडा, टांझानिया हे पूर्व आफ्रिकेतले देश नुकतेच ब्रिटीशांपासून स्वतंत्र झाले होते. ब्रिटीशांनी त्यांच्या आमदानीत, लाखो गुजराथी लोक भारतातून पूर्व आफ्रिकेत नेले होते. हे देश स्वतंत्र होण्यापूर्वी त्यातल्या बहुसंख्य गुजराथी लोकांनी ब्रिटीश नागरीकत्व (पासपोर्ट)स्विकारले होते. त्या देशात स्वातंत्र्याचे वारे खेळायला लागल्यावर,ब्रिटीश पासपोर्ट घेतलेल्या भारतीयांनी ते देश सोडून ब्रिटनमध्ये यायला सुरूवात केली. १९६६ पर्यंत थोडे थोडेच लोक येत होते. पण १९६७ सालापासून लोंढेच्या लोढें येऊ लागले. त्यावेळी ब्रिटनमध्ये अगदी सर्रासपणे रंगभेद (Recial discrimination) चालत असे. त्यामुळे रंगभेद्यांना, या भारतीयांना आमच्या देशात यायला बंदी करा म्हणून सरकारविरोधी आंदोलने करायला सुरुवात केली.त्योवेळेचं सरकारही पुचाट होतं.त्यांनी या भारतीयांना संपूर्णपणे बंदी करायची किंवा त्यांच्या मार्गात काही ना काही अडथळे आणायचे असे प्रयत्न चालू केले. पण प्रकरण कोर्टांत गेल्यावर सरकारचा सपशेल पराभव झाला. …आणि ब्रिटीश पासपोर्टवाल्या भारतीयांना ब्रिटनमध्ये येण्याचा मार्ग खुला झाला. आता प्रश्न असा होता की या सर्व निर्वासित लोकांना ठेवायचं कुठे? कारण इथल्या कायद्याप्रमाणे एकूण एका ब्रिटीश नागरिकाच्या डोक्यावर छप्पर पुरविण्याची जबाबदारी सर्वप्रथम स्थानिक नगरपालिका आणि नगरपालिकेच्या आवाक्याबाहेर असेल तर सरकारवर आहे.झोपडपट्टी हा प्रकार नाही! बरं लंडन हे शहर कितीही मोठं असलं तरी हजारोंच्या संख्येने येणार्‍या या भारतीयांना ताबडतोब लंडनमध्ये देता येतील इतकी घरे, त्यांच्या मुलांसाठी शाळा, किंवा आजारी पडल्यास लागतील इतके दवाखानेही नव्हते. म्हणून मग अशा निर्वासितांना लंडनपासून दूर असलेल्या पण जिथे या निर्वासितांची सोय होऊ शकेल अशा छोटया-मोठया गावात पाठवायचा निर्णय सरकारला घ्यावा लागला.Leicester (बरोबर उच्चार लेस्टर) हे त्यातलंच एक गाव. लंडनपासून १०० ते १२५ मैलावर दूर, १९७४ साली मला प्रथम लेस्टरमधून जाण्याचा योग आला.लंडनहून आम्ही स्कॉटलंडला मोटारने निघालो होतो. संध्याकाळी जेवणाच्यावेळी रस्त्यात लेस्टर लागलं म्हणून गावात शिरलो. भारतीय पध्दतीचं शाकाहारी जेवण कुठे मिळेल ते शोधत फिरत होतो आणि डोळयासमोर दिसणार्‍या गोष्टी पाहिल्या की आपण इंग्लडमध्ये आहोत यावर विश्वासच बसत नव्हता. सगळी घरे एकाला एक चिकटून उभी होती. तीही लंडनमध्ये पाहिलेल्या घरांच्या तुलनेत अगदी लहान. बरीचशी घरे तर आपल्या खेडयातल्या घरांसारखी जुनाट दिसत होती. रस्तेही तसेच. दुकाने बहुतेक सर्वच बंद होती. पण जी थोडी फार काही उघडी होती तीसुध्दा आमच्या मुबंईच्या जोशी, महाजन यांच्या किराणा-भुजार मालाच्या दुकानाला अभिमान वाटेल अशा थाटाची होती.पण एक गोष्ट तेव्हा पाहिली ती तेव्हाही मनात सलली आणि आज जवळजवळ ४० वर्षांनंतर अजूनही ती सलते. गावातल्या सर्व बस स्टॉपवर दोन वेगवेगळया रांगा होत्या. एक गोर्‍या माणसांची आणि एक आपल्या भारतीयांची! गोरे लोक आपल्या लोकांचा द्वेश करीत होते आणि अगदी साहजिकपणे आपले लोकही त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे रहायला तयार नव्हते.

शोधता शोधता एक गुजराथी खाणावळ सापडली आणि सरळ आंत शिरलो. खाणावळ अगदी आपल्या मुंबईच्या एखाद्या ‘हिंदू विश्रांती गृहाला’ शोभेले अशीच होती. एकाला एक लागून खुर्च्या-टेबलें होती. टेबल क्लॉथ वगैरे भानगड नव्हती. पण खाणावळ गच्च भरलेली होती. मालक गल्ल्याकडे लक्ष ठेवून होते. मालकीणबाई आतल्या बाजूला खास गुजराथी पध्दतीचे तलम असे फुलके भाजत होत्या. मालकांनी आम्हाला बसवलं आणि पाच मिनिटांच्या आतच आमच्यासमोर जेवणाच्या थाळया आल्या, पिण्याचं पाणी अर्थातच उंच स्टीलच्या पेल्यातून आलं. जेवण अगदी खास गुजराथी पध्दतीचं आणि चविष्ट होतं यात शंकाच नाही. पानांतले पहिले फुलके संपले आणि आणखी आणू का म्हणून विचारायला आलेला ‘वेटर’ बघून मी थक्कच झालो एक दहा – बारा वर्षांचा मुलगा समोर उभा होता आणि अगत्याने आणखी आणू का म्हणून विचारीत होता. त्याच्याशी विचारणा केल्यावर समजलं की तो मालकाचा धाकटा मुलगा होता आणि शाळेतून घरी न जाता वडिलांना मदत करायला खाणावळीत आला होता. तितक्यात खांद्यावर दप्तर लटकवलेली एक मुलगी आली आणि सरळ गल्ल्यामागे जाऊन बसली. ही त्या मुलाची मोठी बहिण असावी. मालक मग गल्ल्यामागून बाहेर आले आणि खाणावळीच्या आतल्या भागात निघून गेले. आज बर्‍याच दिवसांनी अस्सल गुजराथी पध्दतीचं जेवण समोर आलं होतं. त्यावर आडवा हात मारला. बील भरलं आणि जायला निघालो आणि दरवाज्यापाशी आलो तर त्या १० – १२ वर्षाच्या’वेटर’ने ”Please come again” म्हणून माझी दांडी उडवली. वेटरने ‘पुन्हा या’ असं म्हणण्याचा माझ्या आयुष्यातला हा पहिलाच प्रसंग.

दिवसे दिवस या आफ्रिकेतून येणार्‍या गुजराथ्यांची संख्या वाढत होती आणि हळुहळू इथले गोरे लोक त्यांचा द्वेष का करतात हे लक्षात येऊ लागलं. साहेब लोक घडयाळाकडे नजर ठेवून काम करतात. नऊला म्हणजे नऊला दुकान उघडणार आणि साडेपाचनंतर पाच मिनिटेसुध्दा जास्ती वेळ उघडं ठेवणार नाहीत.साहेबीणबाई दुकानात येऊन साहेबांना मदत करायला उभ्या राहतील ही शक्यता फारच कमी. मुलं तर दुकानात मदत वगैरे करायला यायची बातच सोडा. शाळेतून घरी येऊन काहीतरी खाऊन झालं की पुन्हा घराबाहेर मित्रांबरोबर फुटबॉल खेळायला नाहीतर नुसतंच हुदडायला तयार. याउलट आपले गुजराथी बंधू म्हणजे धंदा काढला की त्यात सहकुटूंब सहपरिवार मेहतन करणार. परिणामी ते आपलं दुकान सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत उघडं ठेवू शकतात. याचकाळात इथे आणखी एक फरक घडून येत होता. तो म्हणजे ठिकठिकाणी मोठमोठी सुपरमार्केट्स उघडत होती. तिथे वस्तू एकटया साहेबाने चालवलेल्या दुकानापेक्षा स्वस्त मिळत. त्यामुळे त्या दुकानांचा धंदा बसत चालला होता. आता सुपरमार्केटपेक्षा आपल्या भारतीय (यांत गुजराथी,पंजाबी,आणि दक्षिण भारतीय याचांही समावेश आहे) लोकांच्या दुकानात वस्तू थोडया महाग पडत असतीलही पण त्यांच्या सोयिस्कर उघडण्याच्या वेळांमुळे त्याचां धंदा जोमात चालत असे आणि त्या एका कारणास्तव साहेब लोक आपल्या भारतीयांना पाण्यात पहात असत. पण या द्वेषामागे आणखीही एक कारण आहे. १९४७ पर्यंत ब्रिटनने अर्ध्या अधिक जगावर राज्य केलं आणि ज्या ज्या देशांवर राज्य केलं त्या देशांना राजरोस लुटलं. परिणामी सर्व ब्रिटीश लोक जरी श्रीमंत झाले नाहीत तरी पूर्वीपेक्षा बहुतेक सर्वांच्याच हातात पैसा जास्त खेळू लागला. त्यामूळे जीवन जास्ती सुखवस्तू झालं. पण दुसर्‍या महायुध्दात जरी विजय झाला तर प्रचंड नुकसानही प्रचंड प्रमाणांत झालं. त्यात भरीला भर म्हणून भारतासारखे देश स्वतंत्र झाले आणि तिकडून येणारी आवक संपली.सुखवस्तू जीवन फक्त वरिष्ठ वर्गाच्या हातात राहिलं आणि कंबर कसून काम करण्याची वेळ आली. भारतीय द्वेषाचं हे एक सूप्त कारण असू शकेल. असो….

लेस्टरच्या त्या पहिल्या भेटीनंतर पुन्हा तिथे जायचा योग अनेक वर्षांनंतर आला. दिवस ऐन दिवाळीचे होते. मित्राच्या मोटारमधून खाली उतरलो तर डोकं अक्षरश: चक्रावून गेलं. पूर्वी ज्या लेस्टरला आलो होतो ते हेच का याची खात्री पटेना. पूर्वीचं मळकट लेस्टर नावाला देखील कुठे दिसत नव्हतं. शहराच्या मुख्य रस्त्यावर आपल्याकडे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी असते तशी झगमगीत आरास होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूची दुकाने नव्या नवरीसारखी सजली होती. दिवाळीच्या दिवसात बडोद्याच्या मांडवी किंवा न्यायमंदिर, किंवा मुंबईच्या रानडे रोड/शिवाजी पार्क भागात जशी झिम्मड गर्दी होते तशीच गर्दी लेस्टरच्या त्या भागात झाली होती. खाणावळी असल्या तरी दिसल्या नाहीत. पण अलिशान रेस्टॉरंट्स काठोकाठ भरून वहात होती. भरजरीचे शालू घालून उभी होती. लोकांचा उत्साह ओसंडून वहात होता. विशेष म्हणजे त्या गर्दीत गोरे, काळे आणि आपले तपकिरी वर्णीय लोक खांद्याला खांदा लावून मिरवत होते.

एक काळ असा होता की लेस्टरला जायचं म्हटलं की लोकांच्या कपाळावर आठया पडयच्या. आता दिवाळीच्या दिवसांत तर सोडाच, पण एरवीसुध्दा नुसतं गुजराथी जेवण किंवा ‘शुध्द घीमा बनवलेली मिठाई’ किंवा ‘मावाना पेन्डा’ खाण्यासाठी म्हणून आजुबाजूच्या मोठमोठया शहरांतून लोक लेस्टरला येतात.पूर्वी कंगाल असलेल्या शहरांत अनेक करोडोपतींची वस्ती आहे. आणि माझ्या दृष्टीने अत्यंत समाधानाची गोष्ट म्हणजे कुठल्याही बस स्टॉपवर आता दोन वेगवेगळया रांगा दिसत नाहीत.

– मनोहर राखे, लंडन