एकविसाव शतक उजाडलं!! मनुष्याने खूप प्रगती केली. संपर्काची माध्यमे बदलली. ह्या सगळ्यामध्ये, वाट पहायची सवय लावणारे असे संपर्क माध्यम काळाच्या पडद्याआड होऊ पहाते आहे, ते म्हणजे ‘पत्र’ किंवा ‘खत’.
मला आठवते आमच्या लहानपणी पोस्टमनाची आतुरतेने वाट पहायचो. पोस्टमनकाकांच्या डाक देण्याच्या वेळा पण ठरलेल्या असायच्या आणि मग पुकारा व्हायचा, “ए आईsss मामाचे पत्र आले”. मावशीचे पत्र, मामाचे पत्र, काका-काकूचे पत्र, आजीचे पत्र, भावाचे पत्र, वहिनीचे पत्र ! ह्या पत्रांद्वारे नाती अधिक चांगली जपली जायची. आलेल्या पत्रांचे सामूहिक वाचन होत असे. आई म्हणे,” ए वाचरे पत्र… माझ्या पोळया सुरू आहेत एकीकडे.. लवकर वाच ना! ”
आता आपण एका मध्यमवर्गीय कुटुंबात येणार्या पत्राचा मायना पाहूयात :
दिनांक १/४/१९८०
चि.सौ. का विजयास आशीवार्द,
पत्र लिहिण्यास कारण की आता मुलांच्या शाळांना सुट्टया लागल्या असतील तर सुट्टीत इकडे येण्याचे ठरवावे. पापड कुरडयाकरून झाल्या असतील ना? यंदा इकडे आंबे चिकार आलेत तेव्हा सारेजण नक्की या.
श्री. अनंतरावांना स. न. बाळगोपाळांना अ.उ.आ. यायचे ठरले की पत्राने जरूर कळविणे म्हणजे स्टेशनवर घ्यायला येऊ.
अहो पत्र किती प्रकारची! व्याकूळ प्रियकराने विरहात होरपळणार्या प्रेयसीला लिहिलेल्या पत्राची किमया आगळी. मातृभूमीसाठी लढलेल्या वीर जवानाने यूध्दभूमीवरून आपल्या परिवारास लिहिलेले पत्र वेगळे! दूर होस्टेलवर राहणा-या अपत्याने आपल्या आई-बाबास लिहिलेले वेगळे! अहो वृध्दाश्रमात राहणार्या काही आई-बापांनी लिहिलेली पत्र पण ऐकीत आहेत बरे का! (पण त्या पत्रांना कधीच उत्तर मिळत नसते म्हणा आणि अपेक्षित पण नसते!) नवीन लग्न झालेल्या कन्येची चौकशी करणारे पत्र, सासर चांगले आहे की वाईट हे गूपचूप लपून छपून लिहिणारी लेक तिचे पत्र वेगळे. नोकरीच्या मुलाखतीसाठी बोलावण्याचे पत्र वेगळे. लग्नाचा होकार अथवा नकार सांगणारे पत्र, कुणाच्या जन्माची, कुणाच्या मृत्यूची, बारशांची कित्येक प्रकारची पत्रे, अहो कागदाचा कपटा तो ! पण त्यात नानाविध प्रकारच्या भावना दडलेल्या!
आनंद, आवेग, प्रेम, विरह, दु:ख, माया, जिव्हाळा, भीती, उत्सुकता, विवेचना, वेदना, प्रत्येक कागदी कपटयाचे रंग वेगळे. पण त्याचा हेतू एकच. आपल्या प्रियजनांपर्यंत पोहोचणे. आपल्या मनाचे भाव रूजू करणे. गन्तव्य स्थळी!
पत्रलेखन ही एक कलाच आहे. सोलापूरी माझी एक आत्या आहे. तिचे पत्र हे, तिने पाठविलेल्या खाऊपेक्षा जास्त आवडे आम्हाला, शब्दांची जादूगर ती. अक्षरही त्या पत्रातील भावनां एवढेच सुंदर. आंतरदेशीय पत्राचे ६५ नवे पैसे पुरते वसूल करायची, शेवटी डिंक लावतो त्या पट्टीवर पण लिहायची!
आता काय आहे ना, अहो माणसांकडे सगळे काही आहे पण भावना लोप पावत चालल्या आहेत. “सी यू सून!”, ” कॅच यू लॅटर!”, ” आय एम इन मिटिंग”, ” गॉट टू गो! मिस यू हनी! ” यात माणूस लुप्त होत चाललाय. असे वाटते की काही दिवसांनी नवरा बायको एकमेकांस फक्त मिस कॉलच तर नाही ना देणार! म्हणूनच आपणास पत्रलिखाण रूपी हा ठेवा जोपासायलाच हवा
आपणच श्रीगणेशा करूयात असे वाटले म्हणून हा पत्र प्रपंच!
– संजय मराठे, नाशिक