झंकार
धुंद शराबी नयनी तुझ्या मी स्वप्न पाहिले होते.
गौर गुलाबी गालांवरती फूल प्रीतिचे फुलले होते ॥धृ॥
शुभ्र पिठोरी शारद रात्री,
चांदण्यात त्या प्रीत नाहली.
चंद्र नभीचा फिका भासला,
लोभस तव मुखचंद्र पाहुनी.
युगायुगांच्या प्रीतिस अपुल्या साक्षी चांदणे होते ॥१॥
मंद, धुंद परी शीतल वारा,
उडवित होता तुझ्या बटांना.
रेशमी मुलायम कुतलांत सखे,
जीव माझा गुंतून होता.
करकमलांचे पाश हळूच तव गळयात माझ्या नकळत पडले ॥२॥
आसमंती विहरत होता,
मादक गंध रातराणीचा.
एक अनामिक प्रीतगंध तव,
रोमारोमातून बरसत होता.
लालचुटूक तव अधर मला हे काहितरी सुचवित होते ॥३॥
अमृतरस तव अधरामधला,
चाखून मन बेहोष जाहले.
मोहरली प्रणयातुर काया,
क्षणात सारे अंतर मिटले.
दोन मनांच्या जुळताच तारा अद्वैताचे झंकार उमटले ॥४॥
विवेक पुराणिक
|
श्रावण
आला श्रावण श्रावण चोहिकडे हिरवळ.
क्षणोक्षणी रंगू लागे ऊन पावसाचा खेळ.॥१॥
केतकीच्या बनातून वाहतो गंधित वारा.
दूर आमराईत मोर नाचे फुलवूनी पिसारा.॥२॥
आसमंतात पसरे ओल्या मातीचा हा गंध.
जाई, जुई, मोग-याचा त्यात मादक सुगंध.॥३॥
नभी उगवे सुंदर सप्तरंगी इंद्रधनु.
आकाशाने धरणीशी जणू बांधलेला सेतु.॥४॥
दरीखोऱ्यातून शुभ्र जलप्रपात वाहती.
रविकिरणांच्या स्पर्शांने माणिक मोती चमकती.॥५॥
कृष्णमेघ दाटून येती नभांगणी अवचित.
रिमझिम सरी बरसती मेघमल्हार छेडित.॥६॥
हिरवागार शालू नेसून अवघी नटली वसुधा.
सावळया श्रीरंगाची जणू वाट पाहे राधा.॥७॥
रासक्रिडा रंगू लागे वसुमती श्रावणाची.
प्रेमरंगात रंगली जोडी दोन प्रेमिकांची.॥८॥
विवेक पुराणिक
|
पावसाळा
मज आवडतो हा पावसाळा
घेऊनी जातो सगळा कंटाळा
फुलवितो स्वप्नांचा हिंदोळा
पाडुनी आपुल्या सरी, खुलवितो सर्वांना
म्हणुनी हवाहवासा वाटे हा पावसाळा
करूनी जल वर्षाव, नटवितो या धरणीला,
जणू काही हिरवा शालू नेसविला नवरीला
नवनिर्मिती करूनी वाढवितो सृष्टीला,
जुने सगळे घेऊनी जातो संगतीला,
म्हणुनी आवडतो हा पावसाळा
नीता सोहनी
|
|