मराठी रसिकांनी पाठवलेल्या ‘कविता’

रातराणी……

नि:शब्द रात्र सारी शुभ्र पिठूर चांदणे
धुंद मस्त गंधात रातराणी हासते…..
दूर कळकीच्या बनातून शांत शीतल येई पवन
त्यावरती झोके घेत रातराणी डोलते……१

दाट धुके हे शांत सरोवर संथ वाहती निर्मळ निर्झर
दवबिंदूचे माणिकमोती पानापानावरूनी चमकती
त्या मोत्यांचा हार लेवूनी रातराणी नटते…..२

नभांगणात नक्षत्रांची तेजोमय रजत रंगावली
चंद्र भासतो त्यात जणू की आकाशदीप गगनी
त्या चंद्रास पाहुनी मनी रातराणी लाजते…..३

बहरली रातराणी अन् बहरून येई चंद्र
गारव्यात प्रीतिच्या उभय जाहली मुग्ध बेधुंद
त्या धुंदीतच रातराणी लाल गुलाबी स्वप्नी रंगते…..४

विवेक पुराणिक

सांजवेळ

सांजवेळ सरली सजणा कधी येशील माघारी.
नभी उगवला चंद्रमा रात्र मोहरुनी आली ॥धृ॥

नीरवता भोवताली मंद वाहती हे वारे.
शुभ्र शीतल चांदणे उरी आग पेटविते.
रातराणीच्या गंधाने मोहरली काया सारी ॥१॥

मुग्ध भाव प्रणयिनीचे बेभान मनी दाटले.
रेशमी मिठीत तुझिया बंध सारे तुटूनी जावे.
सुखद तुझ्या स्पर्शाने मी होईन लाजरी बावरी ॥२॥

दाही दिशा धुंद झाल्या त्यात बोचरा गारवा.
अशा रमणीय एकांती साहवेना हा दुरावा.
मधुर मीलनाचे अपुल्या स्वप्न पाहते लोचनी ॥३॥

विवेक पुराणिक

आनंदयात्री

मराठी साहित्याच्या नभांगणातील शुक्रतारा निखळला
पु. ल. देशपांडे नामक अवलिया आपल्यातून निघून गेला ………..
आनंदरश्मींची पखरण करूनी त्यांनी जीवनपुष्प फुलविले.
नर्मविनोदी लेखनाचे त्याला खतपाणी घातले.

त्या पुष्पातील मकरंद घेणारा भ्रमर दूरवर गला…….
मध्यमवर्गीय चाकरमान्यावरती जीवापाड प्रेम केले.
केंद्रबिंदू त्यालाच मानूनी अद्भूत साहित्यविश्व निर्मिले.
त्या विश्वातलाच एक अंतू बर्वा आज निराधार झाला ………
नारायण असो वा सखाराम गटणे: नामू पटील किंवा बापू काणे.
हरेक मराठी माणसाने तयांना आपल्यातीलच मानिले
त्या हरेक चेह-यावरची आज लोपली एक स्मितरेषा……
‘नाच-या मोराच्या’ तालावर त्यांनी महाराष्ट्राला डोलविले.
‘जीवनगाण्याच्या’ संगीतातूनी शब्दांपलीकडले विश्व दाविले.
सप्तसूरांच्या सरगममधला षडज बेसूरा झाला ………
‘गूळाच्या गणपतीद्वारे’ चंदेरी दुनियेत क्रांती घडविली.
‘अमंलदा’ आणि ‘फुलराणीने’ नाटयसृष्टीही समृध्द केली.
‘बटाटयाच्या चाळीवर’ मात्र पसरली आज शोककळा …….
उत्तुंग प्रतिभेच्या ह्या परीसाने अवघ्या जीवनाचेच केले सोने.
जीवनातल्या आनंदाचे मुक्तहस्ते वाटप केले.
साहित्य शारदेच्या दरबारातील हा आनंदयात्री:
आज अनंताच्या प्रवासाला गेला.
एका डोळयात हासू तर दुस-यात अश्रु सोडूनी गेला ……

विवेक पुराणिक

वंदन मायभू त्रिवार……

आसेतु हिमालय कच्छ कामरूप
गंगा सिंधु सागर वेष्टित, विस्तार तव अपार
वंदन मायभू त्रिवार तुजला वंदन मायभू त्रिवार
आचंद्र सूर्य तळपू दे तव कीर्तितेज अटकेपार……..
वेदमंत्राभिमंत्रित तव ह्या सुजलाम् सुफलाम् भूमीवरती,
विकसित झाली जगन्मान्य ही प्राचीन हिंदू संस्कृती
त्या संस्कृतीचे वारस आम्ही करीतो सदा तिचेच गुणगान…….१
देवभूमी ही अजिंक्य जन्मली इथेच भगवद्गीता
कणकण झाला पुलकित इथला श्रवुनी अमृतगाथा
त्या कणाकणातुनी प्रगटतो विश्वव्यापी ओंकार……..२
गंगा, यमुना, सिंधू, नर्मदा, नव्हेत सरिता ह्या तर माता
युगानयुगे पाजीत आहे वत्सल अमृतमयी पान्हा
त्या पान्ह्यावर पुष्ट जाहली तुझी लेकरे बलवान……….३
वेदोपनिषदांनी दाविली जगा स्वातंत्र्य, समता, विश्वबंधुता,
शांती सुबत्तेसह नांदते इथेच एकात्मता
मनामनावर इथल्या घडतो हाच तेजोमय संस्कार…….४
व्यक्तीगत सुखदु:खांना देऊन तिलांजली,
अगणित क्रांतिवीरांनी अर्पिली स्वातंत्र्यज्ञी आहुती
तुझ्या मुक्तीचेच होते तयांना वेड परी अनिवार…….५
तुझ्या पोटी जन्मा येऊनी धन्य जाहले जीवन अमुचे
तव उन्नतीसाठीच अमुचे ज्ञान बल हे झिजू दे
पुनर्जन्मही इथे लाभू दे हीच ओढ अनिवार…….६

विवेक पुराणिक