मराठी रसिकांनी पाठवलेल्या ‘कविता’

पावसा

आलेय बघ मी अंगणात
आता तरी शांत हो ,
भिजलेय बघ नखशिखान्त
आता तरी शांत हो

आलेच नाही तुझ्या मिठीत
म्हणून असा चिडलास ना ?
बिलगलेच नाही यंदा तुला
म्हणून रागे भरलास ना ?

होय, आकाशाकडे नजर लावून
यंदा मी बसलेच नाही
आणि तुझ्या ओढीसाठी
मुळीसुद्धा आसुसलेच नाही

वर म्हंटलं ये नि जा
सांगूच नकोस काही मला
ओलावा माझा सरला सारा
आता दुष्काळच आहे खरा

कोरडच रे यंदा राहावसं वाटलं
डोळ्यातल्याच पाण्यात भिजावसं वाटलं
आलेच नाही यंदा म्हणून मी बाहेर आतूनच पहात राहिले सारा तुझा खेळ

म्हणूनच ना तू इतूका आहेस रुसलास
वाट अडवून असा आहेस दारातच बसलास ?
कळतंय मला , कळतंय रे
पण माझही मन जळतय रे ..

तरी बघ मी आलेय
घालीत मनाला मुरड
आता तरी जरासशी
घेशील का सवड

बघ आता जरा
झालीय तुझी परतीची वेळ
राखायला हवा ना आपल्यालाही
सारा समतोल , सारा मेळ ?

तांडव करीत राह्यच असं
इतका राग बरा नव्हे
खरं सांगते इतका कुणात
जीव गुंतला बरा नव्हे

बरं .. यंदा नाही पुरती भिजले
तरी पुढल्या खेपेस भिजेन मी
श्वास श्वास तुझा सारा
माझ्या श्वासात वेचेन मी

वचनावर माझ्या विश्वास ठेऊन
आता माघारी जाशील ना
इतका इतका माझा आहेस
मग माझं जरा ऐकशील ना

थोडा मला वेळ दे
माझी मी परत येईन
पुन्हा एकदा गच्च गुलाबी
आलिंगन तुला देईन

चढ उतार व्हायचेच सारे
पुन्हा असा चिडू नको
उतरणीचे दिवस चाललेत माझे
वाट निसरडी करू नको

एवढा सरला काळ की
पुन्हा डोंगरावरती येईन
तुझ्या सप्तरंगी पायऱ्यांवरून
अगदी तुझ्या कुशीत येईन

क्षितिजवरती उरु दोघेच
झाकोळून टाकू सारं मग
अनुरागा अजूनही कुशीत तुझ्याच सामावलय सारं माझं जग !

– मधुरा महेश ताम्हनकर

मावळले रविराज

रंग कांचनी आकाशाला
चढे आगळा साज
पश्चिम क्षितीजावरती आणि
मावळले रविराज

दाही दिशांवर , चहुबाजूंवर
राज्य करितसे तो अवनीवर
जीवनदाता , स्वयंप्रकाशी
अश्वारूढ महाराज ..

पश्चिम क्षितीजावरती आणि
मावळले रविराज

तेज सरले , नेत्र हे मिटले
चैतन्य आकाशातूनी विरले
जाता जाता रंग उधळीत
गेले अंबरराज


पश्चिम क्षितीजावरती आणि
मावळले रविराज

भगवी वस्त्रे हि उतरवली
किरण कुंडले आणि ठेविली
थकल्या गांत्रा पुनश्च उगवण्या
जरा विसावा आज

पश्चिम क्षितीजावरती आणि
मावळले रविराज

– सौ.मधुरा महेश ताम्हनकर

दुःख नाही , खंत आहे

दु:ख नाही , खंत आहे
पण मी शांत शांत आहे
प्रश्न आहे एक वेडा
काय उत्तराचा रंग आहे ?

असो हि वा असो ती
हि वाट कुठलिही असेना
एवढेच कळावे कि
काय हाच माझा पाथ आहे ?
दु:ख नाही , खंत आहे
पण मी शांत शांत आहे

मन भिरभिरले इथे तिथे
शोधीत वार्याची दिशा
ढिल मांज्या किती द्यावी
काय पतंगाची चाल आहे ?
दु:ख नाही , खंत आहे
पण मी शांत शांत आहे

वाहू दे वारे कसेही
दु:ख मी करणार नाही
वाटते पण कोण वळणावर
नशिब हे वळणार आहे ?
दु:ख नाही खंत आहे
पण मी शांत शांत आहे

अर्धे अधिक आधी झाले
उरले सुरले आता पेलले
राहीन ताठ न वाकेन मी
फक्त ओझे कुठले कधी कळणार आहे ?
दु:ख नाही खंत आहे
पण मी शांत शांत आहे

भाबड्या मनावर अजून
घालीन घाव कठोर काही
उठत जाईल काय नक्षी
काय त्या आकार आहे ?
दु:ख नाही खंत आहे
पण मी शांत शांत आहे

नको करू आणि देवा
तू मनाची शकले अशी
सांग काय सत्य आणि
काय नुसता भास आहे ?
दु:ख नाही खंत आहे
पण मी शांत शांत आहे

– सौ. मधुरा महेश ताम्हनकर

तळ

सैरभैर झाले मन
ठाव लागता लागेना
शोधिते मी काय आहे
माझे मलाच कळेना ..

दडपल्या किती गोष्टी
खोल खोल अंतराशी
वावटळ काय आली
सारे दाटले काठाशी ..

होते सांगत माझे मला
नको पाण्यावर जाऊ
खोल खोल तळ आहे
नको वाकूनीया पाहू ..

पण गेला , तोल गेला
असा .. असह्य आवेग
बुडीते मी खोल आत
भूतकाळाच्या सवे गं !

– सौ. मधुरा महेश ताम्हनकर