एकदिलाने पुढे जाऊ या!
मा. पंतप्रधान श्री. अटलबिहारी वाजपेयी
यांच्या ‘कदम मिलाकर चलना होगा’
ह्या मूळ हिंदी कवितेचा मराठी भावानुवाद
एकदिलाने पुढे जाऊ या!
आल्या विपदा, जरी निरंतर,
वा मग येवो, प्रलय भयंकर,
पायाखाली, जळती निखारे,
वा वर्षू दे, नित अंगारे,
तळहातावर ज्योत ठेवूनी,
जिद्दीने हा मार्ग क्रमू या;
एकदिलाने पुढे जाऊ या!
सुख-दु:खातून, तुफानातून,
वा असंख्य त्या बलिदानातून
अपमानातून, सन्मानातून,
शिशिरातून वा, मग बहरातून
ताठ छाती अन् उन्नत माथा,
संकटातूनी सदा ठेवू या,
एकदिलाने पुढे जाऊ या!
घोर तमातून वा किरणातून,
संथ प्रवाही वा भव-यातून,
तिरस्कार अथवा प्रितीतून,
पराभवातून अन् विजयातून,
क्षणिक मोह या आयुष्यातील
या, जाळू या अन् संपवू या;
एकदिलाने पुढे जाऊ या!
समोर असता ध्येयाचा पथ,
नित्य चालणे हेच मनोरथ,
अपार श्रम परी हास्य मुखावरी
यशापयश पण, एक दृष्टि धरी,
समस्त अर्पूनी निरिच्छ केवळ,
आषाढातील घन होऊ या;
एकदिलाने पुढे जाऊ या!
प्रितीला जरी वंचित यौवन,
अन् काटयांनी भरले जीवन,
उजाड आयुष्याचे उपवन,
जनउध्दारा वेचू तनमन,
असंख्य त्यागाच्या ह्या समिधा,
जीवन यज्ञाला अर्पू या,
एकदिलाने पुढे जाऊ या!
मराठी अनुवाद- मानस
|
आला-आला माझा राजा
काळे ढग डोईवरी, दिस सांवळा भासला,
वीज चमचम झाली, राजा वरूण हासला !
होते ऊन किती काल, सोसवे ना ताप त्याचा,
वाफा दाट उष्णतेच्या जणूं सोवळे नेसल्या !
किती मन शांत झाले, तनूं सुखी शहारले,
गार झुळूक हवेची, तरू उत्साही भासला !
फडफडली झुडपं, झाले विहंग गडप,
क्षण भेदरली ढोरं, मोर वनात नाचला !
कड-कडाडले ढग, नभी नगारे वाजलें,
नव वर्षाचा आगोठ सा-या गावात पातला !
चहूकडे जलधारा, माझ्या कौलांवर गारा,
आला-आला माझा राजा, राजा पर्जन्य वर्षला !
थेंब टपोरे तिरके, गात्रा-गात्रात झिरपें,
चोच पंखात घालून राघू दारात थांबला !
राजेश पाध्ये
निवडुंगाचे फुल
एका रुक्ष वाळवंटामध्ये
एक निवडूंग उगवले
त्या रणातही त्याने मूळ धरले
उगीचच अस्ताव्यस्त पसरले
जीवनात त्याच्या ऊन रणरणते
वाळूची वादळे अन् उदास रजनी
चांदण्याची बरसात नव्हतीच त्याची,
पण त्यच्या होत्या कोसळणाऱ्या अशनी नियतीने खेळ केले,
निवडुंगाने ‘फुलाचे’ स्वप्न पाहिले
अन् त्यानेही ‘स्वप्नफुलास’
आपले सर्वस्व वाहिले ॥ त्या रणातही…..
ते ‘स्वप्नफुलही’ फुलले,
निवडुंगाच्या काटयांतही बहरले
त्याच्या कंटकरुपी बाहूंमध्ये,
विश्वासाने विसावले ॥ त्या रणातही….
निवडुंगाने त्या फुलाभोवती
विश्व प्रेमाचे उभारले
त्या दोघांमधले प्रेम पाहून
वाळवंटही शहारले ॥ त्या रणातही….
स्वप्नफुलाने निवडुंगाला
आपल्या रंगामध्ये भिजवले
निवडुंगाच्या काटयांनाही
नाजुकतेने सजवले ॥ त्या रणातही….
|
मराठमोळी
आईभावांनी तो येई कृपाळी, शहिरी मी बेतलेली या स्थळी
गंध लेवोनिया तुझे कपाळी, गातो मी कथा ही मराठमोळी
शेकडो वर्षांच्या शिवपूर्वकाळी, निर्भय जनता मराठमोळी ॥१॥
सोनपावलांत चांदसावली, मराठी मातीत रत्नांच्या वेली
मराठसंस्कृती भरास आली, जीवनी फुलली बकुलावेली
रामराज्याची ही खुलली कळी, निर्भय जनता मराठमोळी ॥२॥
संतसजनांचे दाटले उमाळे, भक्तीचा झराही तेथ खळाळे
वागीश्वरीची कृपा झळाळे, गीतेला वर्णिती कोवळी बाळे
कृष्णसख्याचीही वाजते टाळी, निर्भय जनता मराठमोळी ॥३॥
समृध्दी वाहे दुथडी भरून, यादव-देवगिरीला येऊन
विकारी नजरेनं पाहते कोण, गाफील राज्याची पटूनी खुण
सुलतानी वरवंटा लिहिला भाळी, निर्भय जनदा मराठमोळी ॥४॥
सुलतानी हिरवी कामना जागे, खिलजीची हावरी वासना जागे
समशेरी परजीत राक्षस मागे, घेऊन दख्खनच्या वाटेला लागे
दाटतसेरात्र अंधारकाळी, गांजली जनता मराठमोळी ॥५॥
तुर्काचा दरोडा पडला भूवरी, नासवली भूमी दुर्दशा भारी
निर्लज्ज राजाची तऱ्हाही न्यारी, लेकीला पाठवी शत्रूच्या दारी
अभिमानी मरणाची शक्यता मेली, गांजली जनता मराठमोळी ॥६॥
तीनशे वर्षाची मोठी मालिका, ऐकाव्या कोणी या जनांच्या हाका
समजेना साहवेना काळाचा झोका, ‘बाच्छावा मोऱ्हं हो समद्यांनी वाका’
तनुमनी दास्याची मोहोर काळी, गांजली जनता मराठमोळी ॥७॥
पैठणी बोलिला नाथांचा नाथ, आईच्या दाराला लावून हात
दाऽर उघड बयेऽ राही न आत, साहवेना आता ही अघोरी रात
तुझी शलाका प्रकटा या वेळी, गांजली जनता मराठमोळी ॥८॥
शहाजीराजाची राणी जिजाई, सोनपाऊलांनी घरात येई
संतापे पाहून सुल्तानशाही रणरंगी डोहाळे पोटाशी घेई
नाथांची भरली आईनं झोळी, पालवली आस मराठमोळी ॥९॥
आईभावानीही जिजाऊपाठी, आशीर्वादशब्द बोलते ओठी
प्रकाशाने तिची भरली ओटी, शिवजन्म घाटला जिजाऊपोटी
उत्सुकता दाटली बारा मावळी, पालवली आस मराठमोळी ॥१०॥
फाल्गुन वद्य तृतीयेची रात, स्तब्ध सह्याद्रीही गदगदे आत
मुग्ध शिवनेरीत तेवता ज्योत, आकाशी फाकला तेजाचा झोत
अतुलनीय या शिवजन्मवेळी, पालवली आस मराठमोळी ॥११॥
सह्यगिरीच्या कडेकपा-या, आतुर करण्याला शिवबाच्या कार्या
चैतन्य दाटले मुलुखात सा-या, मावळी आकांक्षा घई भरा-या
निर्भय भूमी हो स्वर्णसकाळी, पालवली आस मराठमोळी ॥१२॥
कौन्तेय देशपांडे
|