प्रश्नांच्या जंजाळात…
हस-या डोळयांचा ताबा
अचानक आसवांनी का घ्यावा?
ऊन वेचता वेचता सावलीचा ध्यास का लागावा?
नुसत्याच प्रश्नांच्या जंजाळात …
दोष कुणाला आणि का द्यावा?
पापण्यांतील नाजूक स्वप्नांना
अचानक तडा का जावा?
जगता जगता मध्येच
आयुष्याचा खेळ का संपावा?
नुसत्याच प्रश्नांच्या जंजाळात…
मदतीला धावलेल्या माणसासाठी
मनात किंतू का यावा?
माणसा माणसां मधला
फरक तरी कसा जाणावा?
नुसत्याच प्रश्नांच्या जंजाळात….
आसपासचं असलेला कुणीतरी
एकदम दुरचा का भासावा?
अन् मैलों लांब असलेला
हवाहवासा का वाटावा?
नुसत्याच प्रश्नांच्या जंजाळात….
सगळयाच प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीतच,
आणि तरी उत्तरे शोधता शोधता
दरवेळी नवाच प्रश्न का पडावा?
नुसत्याच प्रश्नांच्या जंजाळात
दोष कुणाला आणि का द्यावा?
सपना
|
काजवा
कणभर प्रकाश उरात साठवून
क्षणभर उभा होतो,
सूर्याशी स्पर्धा करू पहाणाऱ्या
काजव्याच्या मिजाशीत
शोधित होतो तुझी सावली
बाभुळवनातल्या लांबलेल्या सावल्यांत
धरतीच्या खांद्यावर आभाळाच्या पार्श्वभूमिवर
न्याहाळीत होतो.
तुझी आकृती, तशीच लांबलेली!
यज्ञवेलीवरल्या धुमसणाऱ्या
राखेजलेल्या धुरकट निखाऱ्यासारखा
सूर्याचा अग्निगोल
क्षितिजाआड गेला तरीही
दिसली नाही ती,
तुझी सावली लांबलेली..
मग मात्र…
भोवती चांदण्या उमलत असताना
मी मात्र कोमेजून –
विझून चाललो होतो.
कारण काजव्याचं भाग्य
नव्हतं मला लाभायचं!!
विजय खाडिलकर ,
माझगाव, मुंबई
|
हृदय
हृदय हे एक गाव असतं
त्यात एक चिरेबंदी वाडा असतो
सर्वांना एकसंधी बांधून ठेवलेला
त्यात प्रेमाचा संगम असतो
हृदय प्रत्येक नात्याच्या
धाग्यातून प्रेमळ संदेश
देत राहतो
हे हृदयाचं नात असंचं
जोडायचं असतं
हृदयात आठवणींच जाळ असतं
ते असंचं जपून ठेवायचं असतं
हृदय हे नाजूक असतं
त्याला धक्का लागला तर
दुखावतं,
दुखावलेल्या हृदयावर
आपणचं मलम बनायचं
असतं
हृदयात प्रेमाचा खळखळणारा
झरा असतो
त्याला तसचं वाहू द्यायचं असतं
अन् त्यातून दुस-यांना आनंद
द्यायचा असतो व स्वत: आनंद
घेता घेता त्यात हरवून
जायचं असतं
वर्षा घडीगांवकर
|
माझं स्वप्नं
ना आपला
ना परका
ना माझा;
माझं स्वप्नं
हरेक देवाचा!
ना स्वकीय
ना आप्त
ना ज्येष्ठ;
माझं स्वप्नं
माणूसकी श्रेष्ठ!
ना घरदार
ना ऐश्वर्य
ना प्रसिध्दी;
माझं स्वप्नं
विकसित भारतभूमी!
मच्छिंद्र पवार
|