जय नावाचा इतिहास
काढल्या चारशे धावा। दीडशे कळस वरी व्हावा॥
गडी चार गमावून फक्त। स्कोअर शंभरच झाला॥1॥
हे नशीब म्हणती काही। कुणी फुकटच निराश होई॥
मग निराश काही स्फुरले। हारतील कसोटी म्हणाले॥2॥
तरीही तो खचला नाही। तिमिरात थांबला नाही॥
कर्मनिष्ठ चुकला नाही। एकाग्र लक्ष्यही पाही॥3॥
अहोरात्र लढला तोही। पाठीस लक्ष्मण राही॥
धावांचे डोंगर रचले। आशेचे दीप उजळले॥4॥
तो द्विशतकाशी रूकला। निस्तब्ध सारे झाले॥
तो परत जेधवा आला। नैराश्य निवळले होते॥5॥
मग अजित उदया आला। विजयाचे कारण झाला॥
तेंव्हाही काही जणांना। वाटले गमवतील संधी॥6॥
जरी अवघड नव्हते काही। ते अवघड करतच गेले॥
मग पुन्हा राहूलच आला। सोबतही लक्ष्मण झाला॥7॥
चेंडूचे रोख अन् टप्पे। उसळीला फसवत होते॥
ती फिरकी वळते कोठे। मुळी कुणास कळले नव्हते॥8॥
स्थिरचित्त होऊनी दोघे। दत्तचित्त होते झाले॥
ते लढले खेळची त्यांचे। देशाला गौरव झाले॥9॥
लक्ष्मणही कामी आला। अन् राहूलही थकलेला॥
पण निराश मुळी तो नव्हता। अन् संग अजितही आला॥10॥
मग त्यांनी लिहीली गाथा। हो, देशाचा उन्नत माथा॥
ते खेळातची समरसले। ग्रह साथ तयांना झाले॥11॥
पत्रकार मग ते त्याला। प्रतिक्रिया विचारत होते॥
‘मज धन्य वाटले वदला। ते साऱ्याचे यश होते’॥12॥
नरेंद्र गोळे
|