मराठी रसिकांनी पाठवलेल्या ‘कविता’

विसर

विसर हे नाव आता
—-ओठी पुन्हा आणू नकोस
भंगलेल्या स्वप्नांची त्या
—-स्मृती पुन्हा देऊ नकोस
विसरून जा ती नजर
—-अर्थ तयाचा लावू नकोस
शीत चंद्र चांदण्यांची
—-वाट आता पाहू नकोस
भूतकाळ जरी गोड वाटला
—-तरी मागे तू येऊ नकोस
विसर आता सर्व काही
—-गत जीवनाचे किनारे
नको पेटवू उरी माझ्या
—-तृप्त आठवणींचे निखारे.

राजेश जाधव

नाते

नाते तिचे नी माझे, आहे म्हणावयाला
ओळीत शुष्क गाणे, आहे म्हणावयाला
उडलेत रंग सारे, उरल्यात फक्त रेषा
हे चित्र वास्तवाचे, आहे म्हणावयाला

मध्यान्ह कालचा हा, मज ताप साहवेना
अस्तित्व सावलीचे, आहे म्हणावयाला
रूंदावल्यात सीमा, क्षितीजास व्यापुनी त्या
ते भास मिलनाचे, आहे म्हणावयाला

राखेतुनी उठोनी येई फिनिक्स पक्षी
आशेत स्वप्न वेडे, आहे म्हणावयाला

राजेश जाधव

सखी

शाळेमध्ये उष्टी चिंच देणारी
त्या आठवणी जपणारी
रूसव्या गालावर मोरपीस फिरवणारी
सख्खी मैत्रिण सखी असते
उमलतांनाच चटका लावणारी
नजरेनं आव्हान देणारी
दोस्ताना निभावणारी
खटयाळ मैत्रिणही सखी असते
डोळयातल्या काजळानं
तीट लावणारी
भरकटलेल्या मनाला
दिशा देणारी सखीच असते
सखी नसते निव्वळ मैत्रिण
काळजातला श्वास असते
मनाचा प्राण असते
अभिनिवेषाने न जुळणारी
भंगतानाही न तुटणारी
रेशमाचा गोफ असते
साऱ्या दिशा अंधारतांना
पौर्णिमेचा ती चंद्र असते
मनावर फुंकर घालणारी
ती मंद झुळूक असते
कातरवेळी मिटून फुलतांना
इंद्रधनु होणारी
नजरेनं आस ओळखणारी
सखी मनकवडी असते
सखी असते आपली जाणीव
असते एक वृत्ती
कबिराचे दोहे गुणगुणणारी
सखी जीवनाची दिशा असते
कधी असते कविता
कधी असते तिचे तुफान
सुखदु:खाची वीण पेलणारी
अढळस्थानावरती सखी
चैतन्याचा तारा बनते
वर्तमानात जगतांना
भुतकाळाचा शेला पांघरणारी
लकाकती बिजली असते
मेंदीभरल्या हातांवरची
अबोध नक्षी असते
मनाच्या गाभा-यात ती परी असते
ज्याचं जळतं त्यालाच कळतं
अशा क्षणीही ती श्वास असते.

राजेश जाधव

पाऊस

वारा वाहतो आकाशी
काळया ढगांचे हे मेणे
येतो पाऊस पाऊस
गाऊ पावसाचे गाणे

वाटे लागले कधीचे
त्याच्या आतुर हे डोळे
ऊन सहून सहून
जीव कासावीस जळे

ढोल वाजती आकाशी
नाच नाचते ती वीज
उधळला आसमंती
धूळ गुलाल हा आज

रीते ढग सरी सरी
भिजे धरतीची कूस
फुले मृद्गंधाचे फूल
दरवळे हा सुवास

थेंबाथेंबातून मनी
झरे पावसाचा छंद
शब्दाशब्दातून पानी
झरे कवितेचा छंद

राजेश जाधव