नेत्रदान
काय करशील या डोळयांचे तुझ्या जाण्यानंतर
जमलेच तर दे कुणाला
ज्याला आस आहे बघण्याची जग हे सुंदर
सिकंदर सुध्दा गेला मोकळया हाताने जग सोडून
तुही काही घेऊन जाणार नाहीस कोणाकडून
सोडून जा तुझ्यामागे अशी निशानी
पिण्याआधी आंधळयाला कळेल विष का पाणी
रंगांचे फक्त नावच माहित असतात आंधळयाला
डोळयांनी तुझ्या बघेल तो सर्व रंग
सुंदरतेने जगाच्या होऊन जाईल दंग
जीवन जगण्याचे सर्वांचे असतात वेगवेगळे अंदाज
आंधळयाचे जीवन म्हणजे फक्तच अंदाज
तुझ्या जाण्यानंतर तुला काहीच नाही फायदा
का नाही करत ते देण्याचा वायदा
महेश बोरावके,
प्रवरानगर
|
साथ
आयुष्याचा एक खेळ
मांडायचा आहे जोडीनं
साथ दोघांनी एकमेकांची
द्या इतक्याच गोडीनं
एकत्र आलात तुम्ही
एकमेकांच्या ओढीनं
जपा आता दोघांनीही
तितक्याच लाडानं
एकटयानं खूप स्वप्न पाहिलीत
आता ती दोघांनी साकारायची आहेत.
साथ आमची असेल नेहमी
पण स्वप्न मात्र तुम्ही आकारायची आहेत.
रवि ढोके
|
मागून मिळत नाही
प्रेम मागून मिळत नाही
प्रेम वाटाव लागतं,
ध्यानी मनी नसताना
अवचित भेटाव लागतं.
माझ्यावर प्रेम करा
अस म्हणता येत नाही,
करू म्हटल्याने
असं काही होत नाही.
त्यासाठी जुळावे लागतात
उभयतांचे धागे,
भीड आणि भीती मग,
आपोआप पडते मागे.
प्रेमाचे फुलपाखरू
स्वच्छंद उडतं,
मनमोही रंगानी
पुरतं वेडं करतं.
पण त्यामागे धावलं तर,
आणखी पुढे पळतं,
डोळे मिटून शांत बसलं,
की हळूच खांद्यावर बसतं.
सुनिता केळकर
|
तू आणि पाऊस…..!
मला वाटतं पावसाचं नि तुझं
जुनंच नातं असावं
तू नाही तर त्याने तरी
नितांत बरसावं
तूझ्या नसण्याची जाणीव
तो भरून काढायचा
हव्याहव्याशा क्षणांसाठी
तुझ्या स्वप्नात ओढायचा
मातीचा सुगंध
फुलांना लाजवणारा
वेणीपेक्षा तूझ्या
वाटेला सजवणारा
आठवतं मला, एकदा
पाऊस घेऊन तू आली होतीस
सुगंधाने घरात
सर्वत्र दरवळली होतीस
निरोप तुझा घेताना
तो तुझ्या डोळयात आला होता
वचन देऊन जसा काही
माझाच झाला होता
वाटलं तू पुन्हा येशील पण
त्या पावसाचं बरसणं एकदाचच होतं
माझ्या पावसाला मात्र, तू गेल्यावर
दररोज येण्याचं निमित्त होतं.
प्रविण देशपांडे
|