मराठी रसिकांनी पाठवलेल्या ‘कविता’

आठवतं मला

आज ही आठवतं मला
माझी म्हणून भेटली होतीस
भेटलीस कसली,
कोसळीच होतीस तू…..
जशा श्रावणसरी चौफेर
अन् सगळं कसं चिंब चिंब
‘हे काय नवीनच….!’ बावरलेला मी
सरसर तुला शब्दबध्द करत गेलो.
अन् मनावरले थार उतरवत गेलो.
मन होतं अगदी मोकळं…..
जणू मागचा मी, एक तरंग पाण्यावरचा
अशी भेटलीस, अन् भेटतच गेलीस
कधी नाराज : ओढलेल्या पायांनी
कधी अधीर : छम् छम् पैंजणांनी
माझ्या इच्छा, माझी स्वप्नं
अंगावर मिरवत राहीलीस
सैतानाचा रिकामा कोपरा
भरत राहीलीस, तुझ्या मंद पायखानं
(मी खरा कसा! ‘डेव्हिड कि गोलिएथ्’ बिंबवत राहीलीस)
मी विचारलं प्रत्येक वेळी : मी कसा !, मी कसा ?
प्रत्येक वेळी सुचवत गेलीस : तू असा, तू असा (ही)
आज कधी कोणी सांगतं
तू असा, तू असाच !
मी थांबतो क्षणभर, हसतो
‘हळुच तुझ्या कुशीत शिरतो’
अन् स्वत:च अनुभवतो
मी असा, मी तसा (ही)
 

वी. जोशी

रडलो नाही-लढलो

रडलो नाही – लढलो मी रडू नकोस आई – तुझं बाळ शांत
झापेलय त्याला मरण रडता रडता नाही,
तर लढता-लढता आलय
पुन्हा रडणार नाही कधी, शपथ घे हात ठेवून चितेवर
मी देखील शपथ घेतली होती, मरे पर्यंत लढण्याची,
हात ठेवून गितेवर रडू नकोस आई –
मला मरण रडता रडता नाही, तर लढता-लढता आलय

रडू नका बाबा-रडू नका बाबा माझ-तुमचं रक्ताचं नाते आहे,
दुष्मनांना कापत गेलेलं हे तलवारीच पातं आहे
तुम्हीच तर म्हणाला होतात ना, की जा यशस्वी हो दीर्घायुषी हो
तुमची इच्छा मी पुरी केली आहे. पण तुम्ही दु:ख आवरा,
कारण मला मरण रडता रडता नाही, लढता लढता आलय

रडू नको ताईं-रडू नको ताई, मी राखीला येऊ शकलो नाही
तू दिली होतीस हाक – मी साथ देऊ शकलो नाही.
आता आई बाबांच्या प्रेमा सोबत, तुझ्याही प्रेमास मूकणार आहे.
या वर्षी ओवाळणी तुला – माझा पराक्रम टाकणार आहे.
माफ कर मला, तुझं वचन पाळू शकलो नाही
प्ाण मातेचं वचन पाळलं आहे….तू रडू नको
कारण मला मरण लढता-लढता आले आहे.

रडू नको प्रिये, मी तुला साथ देऊ शकलो नाही.
तू दिली होतीस हाक – मी साथ देऊ शकलो नाही.
आज प्रत्येकाच्या नजरेत पहा, तु एक स्त्री सामान्य नाहीस
रडण स्वाभाविक आहे तुझं, पण मला मान्य नाही
तुझ्या कपाळावर कुंकु लावण्यासाठी पुढल्या जन्मी येणार आहे
तोच एक वर मागायला मी देवाकडे चाललोय
कारण मला मरण रडता-रडता नाही, लढता लढता आलय.

अन् रडू नका तुम्ही पण, माझ्या निरोपासाठी आलेल्यांनो
तुमच्यातच वाढलेलं मी एक रोप आहे.
तुमच्यासाठी ठेवलेला माझा एक निरोप आहे.
ज्या जन्मदात्यांनी माझ्यासाठी हाताचा पाळणा केला,
त्यांच्या अश्रूंना आवर घाला.
त्यांच्या काठीचा आधार बनलो नाही,
त्यांच्या दु:खाला सावर घाला.
हजारो हातांनी पुढं या –
व माझ्या भावांना देशासाठी मरण्याचं बळ द्या.
मगच वाटेल मला की,
माझ्यासाठी गाळलेल्या त्या तुमच्या अश्रुंनाही अर्थ आहे
माझं मरणही तुमच्या स्वरूपात जगणं सार्थ आहे.
माझं मरणही तुमच्या स्वरूपात जगणं सार्थ आहे
माझं मरणही तुमच्या स्वरूपात जगणं सार्थ आहे

सुमित कुलकर्णी