मला वाटते जसे जगावे……
इंद्रधनूचे रंग मनावर, रंगवून घेता येईल का ?
सात सुरांच्या लकेरिवर, लहरत जाता येईल का ?
गंध फुलांचा श्वासामध्ये, साठवून घेता येईल का ?
मला वाटते जसे जगावे तसेच जगता येईल का ?॥ १ ॥
सागराची अथांगता, या हृदयी घेता येईल का ?
गंगेसम निर्मल आणिक, विशाल मन होईल का ?
तारे नभिचे या नयनातील, स्वप्न उद्याचे होतील का ?
मला वाटते जसे जगावे, तसेच जगता येईल का ?॥ २ ॥
सागराच्या गर्तेहून खोल वेदना बूडतील का ?
शिंपल्यातील मोत्यासम, सुप्त कल्पना सुचतील का ?
अवकाशाहून गूढ भावना, मनी सहज फुलतील का ?
मला वाटते जसे जगावे, तसेच जगता येईल का ?॥ ३ ॥
रवि पसरतो किरणांनी, तशी किर्ती कर्मानी होईल का ?
हिमशिखरासम उंच आणिक, ताठ मानही राहिल का ?
निसर्गाची निरपेक्षता, स्वभावातही येईल का ?
मला वाटते जसे जगावे, तसेच जगता येईल का ?॥ ४ ॥
सोने नाही तर दगडातील शिल्प होता येईल का ?
हिरा नाही निवारा होऊन उजळता येईल का ?
अनंत आकाश नाही तर क्षितीज होता येईल का ?
मला वाटते जसे जगावे, तसेच जगता येईल का ?॥ 5 ॥
संदिप साकरे
|
फक्त तुझ्यासाठी
को-या कागदावर काय लिहावं,
नाव तुझं कि तुझ्यावर लिहावं..
कुणीतरी आपलं म्हणणांर असावं,
स्वप्न तुझं कि वास्तव असावं..
असंच मनात नेहमी का तु यावं,
मन तुझं कि तुझ्यातच रमावं..
आशेचं नेहमी असंच येणं असावं,
जगणं तुझं कि जगण्यात तुच असावं..
एक हरविलेला मी….
विश्र्वनाथ क्षिरसागर
|
सागरा प्राण तळमळला
स्वातंत्र्यदेवीच्या चरणतला तुज धूता
मी नित्य पाहिला होता
मज बदलासाठी अन्य देशी चल जाऊ
संधीचा देश मग पाहू
या देशी इथे लोक फार हे भष्ट
होइना आरक्षण नष्ट
मग कामाचे चीज कसे होणार
ऐश्वर्य किती मिळणार
उपयोग शिकल्याचा काय रे
नाही धड नोकरीचा ठाव रे
बुध्दीस नाही मम वाटा रे
घेऊन त्वरे इथुनि जा रे तू मजला
सागरा प्राण तळमळला
नभि नक्षत्रे बहुत परी मम प्यारा
मज अमेरिकेचा वारा
प्रासाद तिथे उंच किती रे भारी
सगळीच भव्यता न्यारी
मम मित्र बहु मातृभूमीचे प्यारे
पोचले अमेरिकी का रे
हो सवंगडी साद घालती सारे
घेऊन मला तू जा रे
मंदार जोगळेकर
|
झाड चैतन्याचे
माझ्या दारी झाड चैतन्याचे,
बहरल्या प्राजक्ताचे
फांदी फांदीवरी सजता
शुभ्र साज माझ्या अंतरी फुलतो
सुगंधी मोहोर रोज
मोहोरांत वसे हंसू उद्याचे,
माझ्या दारी झाड चैतन्याचे
फुलणे तोवरी सजणे
वाटत सुगंध सतत
कोमजणे असेल चक्र
उद्याचे उमलणे निश्चित
उमलण्याचा ध्यास सूत्र जीवनाचे,
माझ्या दारी झाड चैतन्याचे
जीवनात जरी कांही
नाही कधी शाश्वत
उमलत मन ठेवणे
स्वत:च्या असे हातात
कोमजल्या मना सदा फुलवावयाचे.
माझ्या दारी झाड चैतन्याचे
वसंत देशपांडे
|