आषाढसंध्या
आषाढसंध्या आली दाटून,
दिवस चालला रे संपून,
पावसाची संततधार,
पडे झर झर बरसून ।
एकांती बसून घराच्या कोनाडयात
न जाणे कोणते विचार आले माझ्या मनात
चिंब भिजलेली हवा जुईच्या वनात,
काय संदेश चालली घेऊन ।
पावसाची संततधार,
पडे झर झर बरसून ।
आज तरंग उठला हृदयात,
पण किनारा नाही सापडत,
चिंब भिजलेल्या फुलांच्या सुगंधात,
हृदय गेले मोहरून ।
पावसाची संततधार,
पडे झर झर बरसून ।
काळोख्या रात्रीच्या प्रहरात
कोणते सूर भरावे उरात
काय चुकले की सरे विसरत
उठलो व्याकुळ होऊन ।
पावसाची संततधार,
पडे झर झर बरसून ।
‘आषाढसंध्या घनिये एलो’
गीतांजलि
अनुवाद : मकरंद नाईक
|
आंबोली
एकलवेडया प्रवासाला सगळा झाकोळ
धुतला गेला, नुरला शंकित मनात कल्लोळ
रचुनी तांडव किती धबधबे कभिन्न त्या कातळी
आव्हानांवर बरसुन त्वेषें मिळूनि जाती तळी
प्रतापवेडया सह्यागिरीचे हे दर्शन घेता
व्यष्टि-सृष्टिचे द्वैत सरोनी उरली निर्भयता
श्रावणधुंदी करी दृष्टिला अर्धोन्मिलिता ही
गमते अवती भवती धूसर मग सारे काही
ओहळ वाहती घेउन लालस समूर्त लाघव ते
लालबुन्द वेषात कधी वीरश्री ओघवते
स्वैरपणाने फुले उधळती रंग आसमंती
धवल-निळा गोकर्ण आणखी फुले जास्वंदी
कोकणच्या धरणीवर सजतो कुठला उत्सव हा
की सृष्टीच्या प्रिय सख्याचा वाजे पदरव हा ?
वेली लजवंतीला पुसता शंकाही फिटली
गणराजाच्या स्वागता पहा वनलक्ष्मी नटली
कौन्तेय प्रमोद देशपांडे
|
फुलपाखरू
ते एक फुलपाखरू
अलगद माझ्या जीवनात आले
आपल्या इंद्रधनुषी पंखांनी
माझे जीवन रंगीत केले
त्याच्या हळुवार स्पर्शाने
प्रेमाचा अर्थ मला समजला
त्याच्या सहवासात
जगण्याचा अर्थ मला उमगला
त्याच्या पंखांनी बळ दिले
माझ्या स्वप्नांना
त्याच्या डोळयांत पाहिली
मी माझीच स्वप्न
आता मनात हुरहुर आहे
ते नकळत निघुन तर जाणार नाही ?
हे माझे सुरेल स्वप्न तर नाही ?
हे फुलपाखरू खरेच माझे आहे का ?
सचिन प्रकाश दारने
|
परीक्षा
जीवनाच्या परिक्षेत कॉपी करायला चान्सच नाही
कारण अगदी सेम पेपर असणारा दुसरा कुणी विद्यार्थीच नाही
प्रत्येकाचा पेपर वेगळा प्रत्येकाचे उत्तर वेगळे
पण एकच ‘परिक्षक’ येथे तपासत असतो पेपर सगळे
कुणाला मिळते डिस्टींक्शन तर कुणाला फर्स्टक्लास
कुणी मिळावी गोल्ड मेडल तर कुणी नुसताच पास क्लास
पण फेल झाल्यावर मात्र येथे ए. टी. के. टी. मिळत नाही
कारण पुन्हा परीक्षा देण्याची या परीक्षेत सोयच नाही
राहुल सुदामे
|