जमले असेल प्रेम तुम्हाला गडी
ऐसे नव्हे आम्ही ना ते केले कधी !
जमले असेल प्रेम तुम्हाला गडी,
ऐसे नव्हे आम्ही ना ते केले कधी
लुटली असेल तुम्ही, प्रेमाची धुंदी
पाहिलीत आम्ही, रुपे प्रीतीची खरी
लढवल्या आम्ही, कल्पना अनेक भारी
कधी दिली फुलांची परडी
तर कधी पंचतारांकित पार्टी
झटलो कायम तिच्यासाठी
कारणे शोधली छोटी-मोठी
अन घडवल्या अनेक भेटी-गाठी
कधी गल्लीच्या कोप-यावरी
तर कधी थेट तिच्या घरी
रंगल्या गप्पा जवळी बसुनी
दिले वचन हातात हात देऊनी
रमलो कधी गळयात गळे टाकुनी
वाटले मग भाळली ती माझ्यावरी
बोलावले आम्हा चहाला तिने घरी
आई तिची वाटली, दुर्गा माता काली
कठीण सवाल अनेक विचारूनी
मज दानवाचा घेतला तिने बळी
फोन तिने मला, केला दुस-या दिवशी
घरच्यांच्या स्थळाला, तिने दिली पसंती
संसार तिने थाटला, दुस-याच्या संगती
अन सांगे मजला, विसर तू आपुली प्रीती
झालो आम्ही एकदम एकाकी
वाटले गमावले सारेच काही
न राहिली आता जीवनात गोडी
आले मनी, जावे फासावरी
मग आल्या मनी, प्रीतीच्या गोड आठवणी
आमुच्या दिलास दिली, त्याने नवी उभारी
पडुनी खोल दु:खाच्या सागरी
का करावी जीवनाची बरबादी
वाट मग दिसली, आम्हाला एक नवी
तिने घडविला मजसी, एक शायर कवी
मनात फक्त जपुनी, चांगल्याच गोष्टी
दिल्या शुभेच्छा आम्ही, तिला भरभरूनी
विसरूनी तिची बेवफाई
जपली प्रेमातली जिंदादिली
काटे वाटेतले सोडुनी
फुलेच सदा वेचली
जमले म्हणे प्रेम तुम्हां मंडळी
ऐसे नव्हे की, आम्ही हार खाल्ली
मिळाली ना प्रीती आम्हास जरी
कळाली तरी, ही दुनिया आहे कशी !
शैलेंद्र
|
माणूस
जगणे न सफल झाले
मृत्यु न विफल होवो
असे काही कर्म करावे
की मरण सुंदर होवो….
जगी शाश्वत न असे काही
चिरंतन जगणे ते काय असावे
जगण्याने आपल्या जिवंत रहावे
मृत्युनेही ती आशा करावी…..
व्यर्थ नको ते हेवे दावे
क्षणिक सुखाच्या मोहापायी
माणुसकी हा धर्म आपला
माणुस म्हणूनी जगावे मरावे……
राहुल गुजर
|
कोकणची राणी
झुक-झुक गाडीचे कोकणच्या राणीचे
झुक-झुक गाडीचे कोकणच्या राणीचे
चंगु-मंगू यारे सारे स्वागत करू ॥ धृ ॥
हिरव्या हिरव्या झाडीतून
डोंगरांच्या कुशितून
पळणा-या गाडीला टाटा करू ॥ १ ॥
उंच-उंच पूल अन्
सुंदर हिरवे रान
पाहताना सारे देहभान विसरू ॥ २ ॥
गावांमागेगावं टाकत
दिमाखानं डोलात
आली आगीनगाडी चला नका वेळ करू ॥ ३॥
कोकण विकासाची हिनं आणली हो गंगा
पिकांवर पिकं घेऊ करू फळ गा
गती घेऊन तिच्याकडून
आळस दूर ठेऊन
सुजलाम्-सुफलाम कोकण हे करू ॥ ४ ॥
उन्हं-पाऊस सारं सोसून
असाध्य ते साध्य करून
स्वप्न ज्यांनी केले साकार नित्य त्यांना स्मरू
झुक-झुक गाडीचे कोकणच्या राणीचे
झुक-झुक गाडीचे कोकणच्या राणीचे
चंगु-मंगु यारे सारे स्वागत करू
दीपक ग. शिंगण
|
हरकत नाही
जाते म्हणतेस हरकत नाही
कढत अश्रू पाहून जा
नाते तोडतेस हरकत नाही
विझता श्वास पाहून जा
जाणून सारे संपवताना
हिच एवढी विनंती
हसते आहेस हरकत नाही
बुडती नाव पाहून जा
जाळते आहेस हरकत नाही
जळणारे गाव पाहून जा
अरूण झगडे
|