मराठी रसिकांनी पाठवलेल्या ‘कविता’

ध्वज अविरत………….!!

ध्वज अविरत हा फडकला
ताठ मानेने उभा जाहला
सर्व जगाला संदेश दिधला
सत्यमेव जयते ॥

रक्तरंजीत क्रांती स्मरुनी
ह्रदय उचंबळूनी आले
ती पाशवी राजवट स्मरुनी
बाहू स्फुरण पावले ॥

टिळकांनी शिकविला खंबीरपणा
गांधीनी शिकविली सत्य आहिंसा
नेहरूनी शिकविली देशभक्ती
लालांनी दिधली बलीदान तृप्ती ॥

सारे आता सरुन गेलें
पाठी नच काही उरले
मन हे अकांत करु लागले
या देशासाठी मी काय केले? काय केले?

मनिषा

कळी

बागेत फिरतांना जानुला दिसली कळी,
झाडाचं बाळ आई म्हणाली ‘तोडायची नाही मुळी’
हे तर झाडाचं छोटं बाळ;
तुझ्यासारखं चिमणं लडिवाळ!
तोडलीस तर बाळाला रडू येईल
आईला तिच्या दु:ख होईल!
सकाळ होताच जानु बागेत धावली,
कळीचं फुल पाहून हरखून गेली.
कळीवर होते थेंब पाण्याचे
जानुला कळले दु:ख कळीचे!
जानु म्हणाली बाळ रडतय!
इथून त्याला कोण तोडतय?
हातात मी मोठी काठी घेईन
तोडणा-याला पळवून लावीन,’

सौ. अनघा जोग, तासगाव

विरह

शरदाचा गारवा सखे
आज मजला बोचतो गं,
चांदण्यांच्या मैफिलीतही
क्षण विरहाचा टोचतो गं….

मधूचंद्राचा चंद्र नसे हा
तरी माहौल नशिला असे,
धूंद शरदाचं चांदणही आज
तूझ्या विरहासम काळोखं भासे,
आसमंतात या गंध तूझा….तरी
तूझसाठी का मी झूरतो गं?
चांदण्यांच्या मैफलीतही…

स्पर्श तूझा रेशमापरी
आज या वा-यातही घूळला,
तूझ्या कोमलतेचा अर्थ
आज या फूलांनाही कळला,
पण तूझ्याशिवाय या शब्दांना
काय अर्थ उरतो गं…
चांदण्यांच्या मैफिलीतही…

तुझ्यासाठी आणिन मी सखे
सुखस्वप्ने ओंजळीतून,
घेशील का मजसाठी तू
पापण्यांत ती उतरवून
स्वप्नांना या अर्थ द्यायला
आज सखे येशील का?
साद ही ह्रदयाची
प्रतिसाद आज देशिल का?
चंद्र वरूनी हसरा हा
दू:खाने आतूनी खचतो गं….
चांदण्यांच्या मैफिलीतही….

साहित्य

तुझ्यासाठी

जिंकून सारे, हरलो तारे
तुझ्याचसाठी तुझ्याचसाठी

ऐश्वर्याचे सोडूनी घोडे, विस्तवातुनी वेची निखारे
तुझ्याचसाठी तुझ्याचसाठी

मानवजात एकच मजला, जातीधर्माचे खणतो पारे
तुझ्याचसाठी तुझ्याचसाठी

घामाच्या वाहूनि धारा, पाषाणाचे करीतो गारे
तुझ्याचसाठी तुझ्याचसाठी

गोठवूनी वेदनेस सा-या, आनंदाचे वाहिन वारे
तुझ्याचसाठी तुझ्याचसाठी

काटयांची करूनि गादी, फुलविन मोरपिसारे
तुझ्याचसाठी तुझ्याचसाठी

सर्वरंगात रंगूनी स्वप्ने, भिरभिरती फुलपाखरे
तुझ्याचसाठी तुझ्याचसाठी

विशाल बाईकर