मराठी रसिकांनी पाठवलेल्या ‘कविता’

निरोप

आळंदीच्या मातीमधून
ज्ञानियाला साद आली,
निरोपाचा क्षण येता
मुक्ताबाई वेडी झाली।

पाठीवरचे मांडे त्याच्या
अजून नाही शिळे झाले,
अर्ध्यावरी उठताना
डोळे तिचे ओले झाले।

निवृत्तीच्या पायामधले
बळ सारे संपून गेले,
सोपानाच्या हातामध्ये
फुलांचेही ओझे झाले।

मूकपणे ढाळे अश्रू
संथ शांत इंद्रायणी,
आठवून खेळ त्याचा
भिंत पुन्हा थरारली।

महेश विश्वनाथ धुमे

विरह

स्वप्नवत झाले दिन ते तव सहवासातले
कठीण झाले दिन हे सखे विरहातले

अवकाशात आहेत रवी सोबतीला तारे
मज भासे प्रिये अंधारमय जग सारे
विरहअग्नीत लोपले सुख चैन सारे

क्षितीजसाक्षी धरती आकाश मिलनाला
आस तव मिलनाची सतावते मनाला
मधुरस्मृती तव मिलनाच्या स्वप्नवत झाल्या
विरहाने सखे पापण्या ओलावल्या

स्वप्नवत झाले दिन ते तव सहवासातले
कठीण झाले दिन हे सखे विरहातले.

महेश

माझं माझं आकाश

अंधाराने झाकोळली
पायाखालची वाट
संगतीला चालण्यासाठी
नाही कुणाची साथ
तरीसुध्दा वाटेवरती
पडेल माझा प्रकाश
माझं मीच शोधून काढीन
माझं माझं आकाश
रुतला जरी काटा
आसू नाही काढणार
वेदनेसह त्याच्या खोल
हसत हसत जगणार
संकटांवर येणा-या
नक्कीच करीन मात
माझं मीच शोधून काढीन
माझं माझं आकाश
नाही मिळाली माती
तरीसुध्दा रुजीन
नाही मिळालं पाणी
तरीसुध्दा उमलीन
जळेल माझा इवला दीप
ज्यात असेल माझीच वात
माझं मीच शोधून काढीन
माझं माझं आकाश
पहातील तिथे माझ्यासंगे
सळसळणारे वारे
माझ्यासवे चमकतील
लखलखणारे तारे
माझाच प्रकाश देईल
मला शेवटपर्यंत साथ
माझं मीच शोधून काढीन
माझं माझं आकाश

क्षिप्रा

मी

मी तुझ्या तळहातावरील
चमचमणा-या रुपेरी वाळूसारखा…
मुठ वळवलीस तर
बोटांच्या फटीतून
भुरुभुरु निसटणारा
आणि
मुठ न वळता
तुझ्या मऊसर तळहातावर
कायमचा विसावणारा

क्षिप्रा