मराठी रसिकांनी पाठवलेल्या ‘कविता’

सावळा घन

घननिळया सावळया
येशील कधी भेटीस?
आसमंत अवघे पेटलेले
तन-मन कासाविस
वेलीवरती फुललेले
पुष्प कोवळे सुकले रे
ग्रीष्माच्या या उष्ण झळांनी
उन्मेषांकुर मिटले रे
प्रकाश साहवेना आता
दे दान तव काजळाचे
नक्षत्रांच्या मालेगत
रात्री बरसणा-या चांदीचे
सावळया रूपात तुझ्या
मिसळ माझे माझे पण
मी धारा, मीच वारा
मी आकारहीन मी अस्तित्त्वहीन
घननिळया सावळया
सत्त्वरी येई भेटण्यास
मन जाहले उत्सुक
शरीरबंध तोडण्यास

मुक्ता

आभाळाचा एक हुंदका

आभाळाचा एक हुंदका
मनात माझ्या शिरला रे!
मिसळूनी गेला हास्यामधूनी
ओठातूनी झगमगला रे!

आभाळाचा एक हुंदका
मनात माझ्या शिरला रे!
श्वासात अडकला असा की
मोती होऊनी झरला रे!

आभाळाचा एक हुंदका
मनात माझ्या शिरला रे!
तव प्रितीचे रूप लेवूनी,
हृदयातच तळमळला रे!

मुक्ता

साद

मी स्वत:ला झोकून देते
जेव्हा तू बरोबर असतोस
आठवणीतच हरवून
तू स्वत:ला का सावरतोस
आठवणीत राहून मला
ईतिहास न बनायचय
तुझ मनही झुरतय
त्याला माझं व्हायचय
असा तू कधिच नव्हतास
मनविरूध्द जाणारा
एवढयाश्या धक्क्याने
ढासळून जाणारा
मी खचण्याआधी
तुला हात देतेय
तुजवर न पोहचते
तरी साद देतेय

शिल्पा सणस

आठवणी

तू दूर जाताना
हृदय थांबल होतं
तुला आयुष्यात शोधताना
आयुष्यच विस्कटलं होत
ओंजळीत आहे म्हणताना
अचानक निसटुन गेल
विश्वासाच नात माझ
नकळत तुटुन गेलं
रहिल्या फक्त आठवणी
तुला जिवंत करायला
हसत जमेल आता
मरणाला कवटाळायला

शिल्पा सणस