शोध
आरश्यात दिसते प्रतिबिंब,
सुखावते नजरेला प्रतिमा,
एक फसवी प्रतिमा…
जिला नसतो आत्मा
नजरेतील प्रतिमेला असंख्य कंगोरे
तसा स्वभाव तसे अनेक कंगोरे,
नजरेतील प्रतिबिंब एक मृगजळ,
चातकाप्रमाणे फसवे…
तरीही नजर शोधत रहाते
माणुसकीवरील ”विश्वास”.
सीमा पुराणिक
|
सारीपाठ
आकाशात ढग जमलेत
तसे मनावर मलभ चढलेत,
किरणांचा रस्ता अडवला गेला
तशी मनाची पाऊलवाट चुकली
मन भरकट गेले दूरवर….
कधी खडकांवर आपटले
कधी समुद्रांच्या लाटात विरघळले,
कधी सुमनांनी प्रफुलित झाले,
कधी पक्षी होऊन विहंगत गेले,
मेघ बरसले, मळभही सरले
आभाळ निरभ्र, मनही नितळ,
किमया सारी किरणांची,
खेळ सारा ऋतुंचा!
सीमा पुराणिक
|
पुतळा
एका स्वातंत्र्यवीराचा जयंती समारंभ चाललेला असतो. पुतळयाच्या आजुबाजूची जागा स्वच्छ करून, पुतळयाला पाण्याने धुवून हार, शाल घातलेली असते. बाजूला मोठा मंडप टाकून त्यात नेते मंडळीची भाषणं चाललेली असतात. मंडपाच्या पाठीमागे प्रिती भोजनाचा कार्यक्रम चाललेला असतो. हे सर्व एकीकडे चाललेले असतांना, एक म्हातारी आपल्या नातवंडांबरोबर त्या पुतळयाजवळ येते नातवंडं फुले वाहून पुतळयाला नमस्कार करतात. अचानक पुतळा हालायला लागतो. मुलांना पाहून तो हसतो आणि आजुबाजूला चाललेले कार्यक्रम बघून तो त्यांच्याशी बोलू लागतो.
चार रस्त्यावर नशिबानं आज आणून टाकलं.
चांगली कामं केली म्हणून लोकांनी ओळखलं
शेतीमध्ये केली क्रांती स्वातंत्र्यातही सिंहाचा वाटा
पण तुम्हां सांगतो आजच्या युगात हा धंदा लई खोटा
आज क्रांती शेतात नाही शेताच्या बाहेर होतेय
म्हणून पिकांपेक्षा ही नेते मंडळीच जास्त वाढताहेत.
अर्धा जमिनीत नि अर्धा वर असा अर्धवट म्हणून जगतोय
आणि फक्त जयंतीसच माझ्या, मी यांना आठवतोय
आज दिवसभर हे असे एकमेकांवर शेरोशायरी करणार
आणि रात्रभर मग दंगामस्ती होणार
एरवी फिरतीवर असणारी छत्री
जन्मतिथीपुरती डोक्यावर असते
सोबतीला हार नि शाल
दिवसाचे मोल, आयुष्याची कमाल??
माझी काही चांगली कामं या फळयावर लिहीलीत
चांगले होईल त्यातली काही जरी वर्तनात आणलीत
स्वाभिमान सोडू नका,
पारतंत्र्य परत स्विकारू नका
आपापसात भांडून मरू नका
नाहीतर भारत माता सुध्दा रडेन
आणि सुखा समाधानाने शांतीत जगा
हेच मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगेन
हेच मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगेन.
अशोक राऊत
|
तुझं नि माझं
छोटसं मोटसं गोरगोमटं
गुलाबी ओठाचं मऊ कापसासारखं
तुझं नि माझं आपलसं
दुडुदुडु धावणारं, प्यां प्यां करणारं
आजीला त्रास देणारं, आजोबांकडेच रहाणारं
पप्पांची खोडी काढून तुझ्या पदराखाली लपणारं
तुझं नि माझं आपलसं
धावपळ, मस्ती, खोडकर पण शांत
आजी, आजोबांच, काका, मामांचं लाडकं
तुझ नि माझं आपलसं
मम्मी बरोबर चोरून चॉकलेट, आईस्क्रीम खाणारं
थोडसं हट्टी, नटखट पण प्रत्येकाला आवडणारं
कलाप्रेमी, कलाकार, गुणी, हुशार असणारं
तुझं नि माझं आपलसं
हळुहळु मोठं होऊन शाळेतून कॉलेजमध्ये जाणार
डॉ., इंजि, वकिल किंवा नेता न होऊन
प्रख्यात कलाकार असणारं
आपल्या घराण्याचं नांव रोशन करणारं
तुझं नि माझं आपलसं.
आई बाबांच्या आशिर्वादाने
कुलस्वामिनीच्या कृपेने
आपल्या दोघांचं स्वप्न साकार करणारं
लवकरच अवतरणारं
तुझं नि माझं आपलसं
अशोक राऊत
|