भेट तुझी माझी …..
भेट तुझी माझी झाली तेव्हा,
रात्र तशीच होती अर्धी
कळीही तु न उमललेली,
मिटलेली तु होती अर्धी.
चंद्र साक्षीस असता सखये,
आस अर्धीच राहिली,
सरू तळी पून्हा सखये
वाट तुझी मी पाहिली
लाजत बावरलेली तू,
मंद स्मित तव गाली
लावण्यमय मूर्ति तुझी
हृदयी भिडता नयन
ओष्ट पाकळी फुलली अर्धी
धुंद मिठीतही तु का संकोचली
ओढ भेटीची होतीच का अर्धी
दिलीप नरळकर
|
भाई आणि दादा (विडंबन)
(टिप – एका विभागाचा दादा, आणि
दुस-या विभागाचा भाई यांच्यातील संवाद.
चाल – तुझ्या गळा माझ्या गळा)
तुझा गळा माझा गळा, कापू चाकूने सगळा,
भाई आणखी कोणाला,
चल रे दादा खालच्या जगा. (अंडरवर्ल्ड)
तुज पिस्तुल मज घोडा, आणखी स्टेन-गन कोणाला,
घालीन गोळी दादाला,
मला कोणाची भाईला. ॥१॥
तुज चिरडी मज पागडी, आणखी हप्ता कोणाला,
दादा सांगू खादीला,
सांग तिकडच्या खाकीला. ॥२॥
एकमेकांची सुपारी घेऊ, आणखी रक्तपात करू,
चल सटक येथे नको बसू,
नाहीतर तुझा गेम करू. ॥३॥
नट-नटी बॉलिवूडची, गंमत भाईची बघशी,
आता गट्टी फू बॉलिवूडशी,
तर मग गट्टी कोणाशी ॥४॥
अद्वैत यशवंत कानडे
|
माझी अंत्ययात्रा
बरोबर आज वर्षापूर्वी
अंत्ययात्रा माझी निघाली होती,
निर्जिव झालेल्या माझ्या देहाभोवती
सारी मंडळी बसली होती.
कोणी धाय मोकलून रडले
कोणी फक्तच मुसमुसले
थंडगार शरीरावर माझ्या
अश्रु त्यांनी सांडले.
कोणी गात होता गुणगान
कोणी म्हणती, होता चांगला
कोणी मानती आभार देवाचे
लवकर याला मृत्यू आला.
जिवंतपणी ज्यांनी कधी स्पर्श नाही केला,
ते निघाले होते आज द्यायला खांदा,
दुभंगलेल्या संबंधाचा
जूळवू पहात होते सांधा.
मुखी घालुनी तुळशीपत्र
अंत्ययात्रा माझी निघाली होती
कधीही न उगवणारं पैशाचं धन,
आप्त मंडळी पेरत होती.
राम नाम सत्यच्या घोषात
अंत्ययात्रा माझी निघाली होती
लाकडांनी सुशोभित चिता
वाट माझीच पहात होती.
संपली माझी अंत्ययात्रा,
सारे सोबती मागे फिरले,
अंतिम मार्ग मात्र
एकटयाने मी आक्रमिले.
दिलीप नरळकर
|
एक विनवणी गुरूजी तुम्हा
नकोत मजला साने गुरूजी, नकोत मजला राधाकृष्णन
द्या मजला इतूकेच शिक्षण, होईल ज्याने सुकर जीवन
दबून गेलो वाहून रात्रंदिन, दफ्तर, वह्या पुस्तकांचे ओझे
वाहुन पालकांच्या आशा अपेक्षा, वाकुनी गेले खांदे माझे
माणूस म्हणूनी जगू द्या मजला, नसे मी काही सजिव यंत्र
विद्यार्थीच राहू द्या मजला, शिकवा फक्त जगण्याचा मंत्र
नाही लाभली गुरुजी मजला, साने गुरुजींपरी माता
तुम्हावरीच ना सोपवूनी मजला, निर्धास्त राहतो माझा पिता
हात जोडूनी एक विनवणी गुरूजी करतो तुम्हाला,
द्या पाठीवरती वळ छडीचे, जे स्मरती संस्काराला
नाही उरले भय आज तुमचे, नाही उरला मनी आदर
जीवनाची कशी घालु सांगड,
नसेल जर तुमच्या मायेचा पदर
एक विनवणी गुरुजी पुन्हा एकदा,
दाखवा मज असा सन्मार्ग
फूलवा मनी एक आत्मविश्वास,
होईल ज्याने जीवनाचा स्वर्ग.
दिलीप नरळकर
|