मराठी रसिकांनी पाठवलेल्या ‘कविता’

क्षणोक्षणी जीवाला तुझाच ध्यास

क्षणोक्षणी जीवाला तुझाच ध्यास
क्षणोक्षणी जीवाला तुझाच ध्यास
हा लागून राहतो
मनोमनी सुगंधी तुझाच श्वास
मजभोवती वाहतो ॥धृ॥

मलमल दुप्पट्टा तुझा फुलोरी
नजरेवर लहरत राहील
सांजसकाळी कातरवेळी
तुझी आठवण खूपच येईल ॥१॥

उष्णउन्हाळी जीवनात माझ्या
तू सुगंध उधळित येशी
अंधारून गेल्या दिशांतून
किरण तू उजळीत येशी
नयनात फुलवून बगीचा

मी तुझी वाट पाहतो ॥२॥

तुज वाटेल का तुझ्यावरी
मी इतके प्रेम करावे
वेडेपणात की मी माझ्या
तुजसाठी किती झुरावे
शब्दावाचून कळावयाचे मलाच ते कळते
एक दिपीका तुझ्याचसाठी
मम अंतरात जळते ॥३॥

काल तुला पाहिले मी तुळशीपुढे माझ्या
अन् गुंफुन घेतले स्वत:ला अनुबंधनात तुझ्या
आधी-अधूरी कविता माझी तुलाच वाहतो ॥४॥

अमोल भांगरे

स्वप्न

तुला न कळता मला न कळता
स्वप्न जळले रे
सजना स्वप्न जळले रे
तुझे नि माझे स्वप्न जळले रे ॥१॥

ते दिवस त्या रात्री
त्या छाया पडछाया
कसे नशिब फिरले रे
कशी आटून गेली माया
तू न मागता, मी न मागता
अघटित मिळाले रे॥२॥

किती वाट पाहावी मी
वैरीणी दिशा बनल्या
कुठे जाऊ, कुठे पाहू तुला
सख्याच फितूर बनल्या
तू न सांगता, मी न सांगता
दुनियेला कळले रे॥३॥

ही तडफड उराची
उरात मरून जावी
तुझी-माझी कहाणी कुणाच्या
नशीबी कधी न यावी
तुझ्या प्रितीच्या संगमात मी
मी मात्र पोळले रे ॥४॥

अमोल भांगरे

दान

एका अश्रुचे तरी दान द्या,
मनुष्यवस्तीपायी उजाडलेल्या,
केविलवाण्या माडपोफळीसाठी !
एका अश्रुचे तरी दान द्या,
भीषण क्रुरतेने चिरडलेल्या,
इवल्याश्या तृणफुलासाठी !
एका अश्रुचे तरी दान द्या,
हिरवाईला पुकारणा-या,
उघडयाबोडक्या डोंगरासाठी !
एका अश्रुचे तरी दान द्या,
अमृतसावलीवाचून तळमळणा-या,
विराण,आर्त धरेसाठी !
एका अश्रुचे तरी दान द्या,
प्रदुषणामुळे तांबडलेल्या,
लोकमाता सरीतेसाठी !
एका अश्रुचे तरी दान द्या,
फुलण्याआधीच खुडलेल्या,
गुलाबाच्या कळीसाठी !
एका अश्रुचे तरी दान द्या,
रखरखाटात लपेटलेल्या,
उद्याच्या भीषण वास्तवासाठी !

वेदवती परांजपे

एकली दुपार

निचळ झाडे,
अचल वारा,
धगधगलेला,
आसमंत सारा,
एकली दुपार, कणाकणाने,
जळते आहे, जळते आहे..
सरीतेमधुनी,
थिजले पारे,
दुर जाहले,
दोन किनारे,
एकली दुपार, रानोमाळ,
फिरते आहे, फिरते आहे..
वाटांवरती,
लोट धुळीचे,
मळले रस्ते,
स्वप्नीलतेचे,
एकली दुपार, मुग्धपणातुन,
झुरते आहे, झुरते आहे…

वेदवती परांजपे