अनामिक
सहस्त्ररूपे जागर ज्याचा
जरी असे तो लुप्त सर्वथा
उदंड सचराचरी
वसे तो अनामिक ह्रदयांतरी
जळी स्थळी तो असे निरंतर
ठेवुन अस्तित्वाचे अंतर
नजर न कोणा कधी पडे
परि विलसे अभ्यंतरी
उदंड सचराचरी
वसे तो अनामिक ह्रदयांतरी
प्रभात काले चाहुल त्याची
परोपकारी नितकर्माची
रोमांत शिरे जे तेज
जयाचे प्रभुत्व जगतावरी
उदंड सचराचरी
वसे तो अनामिक ह्रदयांतरी
जीवनातुनी जीवन फुलते
नित्य निर्झरासवे वाहते
झुळझुळणा-या गाण्यामधुनी
गीत नवे उमलते
तराया या जलभूमीवरी
उदंड सचराचरी
वसे तो अनामिक ह्रदयांतरी
धरणी मातेच्या या उदरी
अणुरेणुतही वास्तव त्याचे
प्रत्येकाचा मार्ग निराळा
मुक्ति मिळण्या जगी
उदंड सचराचरी
वसे तो अनामिक ह्रदयांतरी
रामकृष्ण पटवर्धन
|
एक नाही दोन
प्रत्येकाजवळ एक गोष्ट नक्कीच असते
एक नाही दोन
एक जगाला दाखवायचा मी
कठोर शिस्तबध्द साधे सरळ जीवन जगणारा
आणि दुसरा तितकाच हळवा
फुलपाखरासारखा भिरभिरणारा कोमल
वेगवेगळयाच जगात वावरणारा
आपण मनाच्या एका कोपऱ्यात जपून ठेवलेला
लाडावून ठेवलेला पण
तितकचं आपण रडताना
आपल्याबरोबर मनापासून रडणारा
संकटात मदत करणारा
जुन्याची ओढ असणारा
शाळेतली मस्ती
कॉलेजचं ते वातावरण
गोड अनुभवाची शिदोरी बांधून
आपल्याबरोबर चालणारा
आपण आणि तो
वेगळे आहोत हे जणवून न देणारा
खोटं वाटतय ना बघा ना
आत्ता ही कविता मी आणि त्यांनी मिळूनच केली
पण तुम्हाला फक्त मीच दिसत आहे.
तो आहे तुमच्यात माझ्यात
एकदा वेळ काढून भेटा स्वत:लाच
तेव्हा तो येईल तुम्हाला भेटायला
अनुभवा या कोरडया जगात
आपलच हळवेपण आपलच नवं रूप
वेगळचं हरखून जावं असं
मग माझ्याजवळ काहीच नाही असं कोणालाच सांगू नका
एवढी एक दोन गोष्ट नक्कीच असेल
एक नाही दोन
मानसी सोमण
|
समतेच्या रेषा
तुझ्यासारखे सगळेच अव्हेरतात म्हणून
मी मलाच मर्यादा आखून घेतो
समानतेच्या रेषा चारही बाजूला आखून
असमानतेच्या वेदना लपवतो
तुला जाणवते तरीही उमगत नसते
कुणी कसाही असू शकतो
समानतेच्या रेषा चारही बाजूला आखून
भिंतीमागे मन दडवतो
कुठलाही उपाय निरूपाय ठरतो
रोग इलाज अन् भावनाही भयंकर
समानतेच्या रेषा चारही बाजूला आखून
जखमा त्यावर भरायला टाकतो.
कुणीही म्हणते सुधार स्वत:ला
मी चुकीच्या पत्रावळी बनवायला घेतो
समानतेच्या रेषा चारही बाजूला आखून
आपलच गावजेवण घालत बसतो
तुला काळीज नसते काळजी नसते
फाटल्या सदऱ्यात तरीही काज शोधतो.
समानतेच्या रेषा चारही बाजूला आखून
काळजात काळजी अडकवत बसतो
तुझ्याच मताने सगळं चालतो
मी शरण आलेला राजा असतो
समानतेच्या रेषा चारही बाजूला आखून
दुनियेचा पहारा स्वत:वर लादतो
माझं असं सगळंच उघडयावर
कुत्रेही भुंकतात रात्री बेरात्री
समानतेच्या रेषा चारही बाजूला आखून
कुत्रा आत नि मी बाहेर बसतो.
कल्पेश आनंद
|
कला
तलवारीच्या म्यानेत बंदिस्त
उद्या येणारा माझा दिवस
आतल्या आतच तीक्ष्ण धारेने
दिवसाचे चार भाग करतो.
मी मग्न म्यानेवर नक्षी कोरतो.
इतक्यात कुणीतरी तलवार उपसून
एका देहाला दोघांत वाटतो.
शस्त्रधारी ओठं नुसतीच हलतात.
शब्द कुणीतरी मागून भरतो.
तलवारींच्या आवृत्त्या वाढत जातात
प्रेतांची प्रतिकृती रेखाटली जाते
आणि कला लोकप्रिय होऊ लागते
जात धर्म समाज वर्णाचा
कुणीही सहज जन्माला घालतो
कुणाचाही तिरस्कार बेसावध क्षणाला
तशातच उमलवू पहातोय दूरवर
अंकूर… कुणी उलटया काळजाचा
प्रेयसी मात्र मिठीत विसाऊन
मिलनाच्या दिवसाचं निमित्त जाणते….
तो आपल्याच धर्मातला खालच्या जातितला..
उद्रेकाला तो पर्यंत काळ दाबतो
आणि तापवतो हळूवर प्रेम-लाव्हा
‘धारेविनाही मनं कापली जातात’
जुन्या कलेला तिनं पैलू पाडला.
कल्पेश आनंद
|