मराठी रसिकांनी पाठवलेल्या ‘कविता’

तर समजा, गझल झाली

(उर्दूतील सुप्रसिध्द शायर ‘जफर गोरखपुरी’
ह्यांच्या गझलचा मराठी भावानुवाद)

जुळली नजरेला नजर, तर समजा गझल झाली,
पडला स्वत:चा विसर, तर समजा गझल झाली.

बघुनी क्षणभरी तिने, हळु मग लाजेने,
झुकविली खाली नजर, तर समजा गझल झाली.

तिच्यास्तव झुरता येथे, जीव आपुला अन जर,
मन तिचेही हो कातर, तर समजा गझल झाली.

उदास शयनी सुरकुत्या, खुपती जीवा खूप अन,
जागले नयन रातभर, तर समजा गझल झाली.

रुसुनी असताना ती, शब्द सुचे ना कविता,
अन गोड ती हसली ‘जफर’, तर समजा गझल झाली.

मराठी भावानुवाद
जयंत खानझोडे

‘गिनीज बुक’

तीनशे किलो वजनाची राखी केलीस,
पण गणिकेची राखी पेलवेल का?

शंभर मीटर लांब साडी विणलीस,
पण द्रौपदीला वस्त्र पुरविलेस का?

नागांसोबत दहा दिवस होतास,
पण माणसातले भुजंग हाताळलेस का?

श्वास रोखुन पाण्याखाली राहिलास,
पण कोंडलेले जीवन जगलास का?

पाच मिनिटात वीस केळी खाल्लीस,
पण अर्धपोटी दिवस काढलेस का?

दोनशे किलोचा केक बनविलाय,
पण खपाटीचं पोट सललयं का?

दोनशे गुलाबांचा हार केलास,
पण भक्तिची पाकळी वाहलीस का?

एकवीस फूट उंच गणपती केलास,
पण ओंकाराची उंची जोखलीस का?

जयंत खानझोडे

सावट

पाऊस, की
तुझ्या आठवणींची रिमझीम

ऊन, की
माझ्या मनाची तगमग

फेसाळता समुद्र, की
तुझ्या प्रेमातलं वादळ

सुनी रात्र, की
तुझ्या विरहाचं चांदणं

कातर संध्याकाळ, की
तुझी सुन्न नाराजगी

भरलेलं आभाळ, की
माझ्या शेवटाचं सावट

प्रसाद टिळक

न लिहीलेली आत्मचरित्रं

पक्ष्यांना आत्मचरित्र असती तर
इतरांवरच्या कुरघोडीच्या
इतिहासाची पानं त्यात नसती
सामोरी येऊ नयेत पण आहेत अशी
अनेक नागडी सत्यं नसती

खोटेपणाने मिरवणारी
बोलती रखेल नसती
स्वाभिमानाच्या बुरख्याआडचा
नखरेल खोटारडेपणा नसता
असते फक्त निसर्गाच्या पावित्र्याचे
निखळ, सखोल, उमलते संदर्भ

मिळमिळीत वाटणा-या स्वच्छ सत्याचा प्रकाश
पण म्हणूनच पक्ष्यांना आत्मचरित्र नाहीयेत
कारण आम्हाला
आमच्यापुरती पटेल अशी सत्यं हवीयेत

प्रसाद टिळक