मराठी रसिकांनी पाठवलेल्या ‘कविता’

तुझ्या असण्याने आणि नसण्याने

तुझ्या असण्याने आणि नसण्याने
जीवन तसं काही फारसं बदलले नाही
तू होतीस तेव्हा
सखल रस्ते उंचावले होते
तू नाहीस तर
पुन्हा सखल खडतर रस्ते चालतोय
तू होतीस तेव्हा
आयुष्याने एक वळण घेतलेले
तू नाहीस तर
आयुष्य वळून पुन्हा त्याच रस्त्यांवर
तेच आयुष्य तेच रस्ते
आणि त्यांचा एकच एकाकी प्रवासी
तुझ्या असण्याने आणि नसण्याने ……….
तू होतीस तेव्हा
आयुष्यांच्या क्षणांना पंख फुटलेले पाखरांचे
तू नाहीस तर
मंद क्षण आणि मी एकमेकांना सोबत
देतो आहे, जीवनाच्या वळणावर तू भेटेपर्यंत
तुझ्या असण्याने आणि नसण्याने…….
एकटाच रस्ते चालत आलो आहे
आणि एकटाच चालण्याचे ठरवलं आहे
तुझी साथ असेल तर विसाव्यांची आस असेल
तू नसशील तर अंतिम विसावा एकच
तुझ्या असण्याने आणि नसण्याने…….

सतीश ज्ञानदेव हारुगडे

धबधब्यासारखं आयुष्य असावं

खळाळते दुग्धतुषार उडवत जगावं
रस्त्यांसारखे इमले असावेत
बुलंद आणि खूप लांब जाणारे
धुक्यासारखं प्रेम करावं
सगळयांना आपल्यात सामावून घेणारं
डोंगराएवढी दु:खं असावीत
सर्वांना हेवा वाटावी अशी
ओल्या जखमेंसारखे अपमान असावेत
सतत भळभळणारे
थंडीसारखी क्षमा असावी
घरटयात परतायला लावणारी
प्राज्क्तासारखं सुख असावं
मंद मंद तुकडा वाटत फिरावं
पांघरूणासारखी नाती असावीत
उबच उब देणारी
आणि
सूर्यास्तासारखं मरण असावं
विषण्ण मनाने पाहावं असं

प्रसाद टिळक

एस. टी. महामंडळाचे गाणे

हळु येणे हळु जाणे
कधी वेळेवर न येणे
तर कधी वेळेच्या आधी येणे
यातूनच प्रवाशांचा अंत पाहणे
हेच एस. टी. महामंडळाचे गाणे
शताब्दी वर्ष साजरे करायचे
म्हणून सुधारले वागणे
संपले एकदा वर्ष की मग
करू त्यांच्याशी भांडणे
हेच एस. टी. महामंडळाचे गाणे
सेवा हाच खरा धर्म
बोंबलू धर्म गुरूंसारखे सवलती देतो
सांगून फसवू नेहमी सारखे
हेच एस टी महामंडळाचे गाणे
मंत्र्याना गाडीतू फिरताना
नसतात नफे नसतात तोटे
प्रवाशांचे मात्र हाल होतात
कारण त्यांच्यासाठी आहेत फक्त तोटे
हेच एस. टी. महामंडळाचे गाणे
मराठमोळया या प्रवाशाला
एस टी म्हणजे वाटते घरटे
घराचे भाडे नेहमी वाढते
मात्र सोयींची निराशाच घडते
हेच एस. टी. महामंडळाचे गाणे
तोटा दाखवताना
लाज खूप वाटते
खिसे भरत नाही म्हणून
खाजगीकरण कारवेसे वाटते
तरी सांगतो एस.टी. महामंडळ आपले
हेच एस. टी. महामंडळाचे गाणे.

कुठे ठेवु रे भावना माझ्या?

उगीचच कुणाच्या आठवणीने डोळे भरुन येतात
सहवास त्याचा हवाहवासा नेहमीच वाटतो.
भेट झाली की मन सुखावते,आणि जायची वेळ झाली
की रडू अनावर होते.
कानावर त्याचे शब्द झेलून उरात जपून ठेवायचे
ओठावरचे स्मित तर सरळ काळजात भिडते.
दुरून जरी दर्शन झाले तरी ह्दयाची गती तेज होते
अन् जवळ येऊन भेटला तर स्वर्ग म्हणजे
काय ते कळते.
कुठे ठेवु रे भावना ह्या माझ्या ?
मनात लपवून खूप दिवस झाले
न बोलून कमी होण्याऐवजी त्या रोज
वाढतच जात आहेत.
आहे का रे अशी जागा जिथे मी त्या साठवून
ठेवू शकते?
जिथे कधी त्या तुला न दिसाव्या
कारण त्या समजण्यात हित तुझे नसते
सांग न मला राजा, आहे का रे अशी जागा?

सॉनेट