कळी रूजताना
कळी रूजताना
कुजबुजताना
मी ऐकत होते काही
मज गुपित कळले बाई!
भ्रमर फिरताना
थरथरताना
शहारली होती जाई
मज गुपित कळले बाई!
आकाश झरताना
सरसरताना
चिंब झाली धरती माई
मज गुपित कळले बाई!
वारा घोंघावताना
भिरभिरताना
पराग रूजले काही
मज गुपित कळले बाई!
बीज वाढत जाताना
अंकुरताना
फुलून गेली आमराई
मज गुपित कळले बाई!
काया मोहरताना
फुलताना झुरताना
मी ओळखले सर्व काही
मज गुपित कळले बाई!
मज गुपित कळले बाई!
राहुल सुदामे
|
उत्तर मजला हवे!
कोण साकारतो
चित्र नित्य नभी नवे
तू सांग अनंता
उत्तर मजला हवे!
नभातल्या रंगांची उधळण
कल्पनेपेक्षाही आहे विलक्षण
कोण चितारतो मेघांना
रंगांची संगत घेऊन सवे!
मेघांचा कुंचला अन् चांदण्यांची नक्षी
आकाशाचा पडदा खुलवितात पक्षी
कोण बल देते त्यांना अन्
कोण उडवितो त्यांचे थवे!
धरणीचे सौंदर्य मेघांच्या पाठी
सर्वच छटांची येथे दाटी
कोण बनवितो हे रंग अन्
कोण सांधतो त्यामधले दुवे!
रोज रविकर झळाळतो अन्
रोज चंद्रमा साकारतो
कोण लावितसे दिनरात्री हे
चंद्र-सूर्यांचे दिवे
रोज येते नवीन उषा
रोज दाविते नवीच दिशा
कोण सांभाळतो हा भार सारा
अव्याहत मनोभावे!
उत्तर मजला हवे!
राहुल सुदामे
|
संकेत निसर्गाचा
ही रंगलेली मेंदी
काय सांगते आहे ?
आपल्या रंगलेल्या प्रेमाची
ती कथा सांगते आहे
हा गंध मोग-याचा
काय सांगतो तुजला
आयुष्य व्हावे सुगंधी
हा आशिर्वाद देई मजला
या मंजुळ पक्ष्यांची
काय सांगतसे वाणी
घरटयात आपुल्या ईवल्याशा
ते गातात प्रणय गाणी
ही वाट सांग प्रिये
दूरवर कोठे जाते आहे
ही वाट अनामिक सखया
स्वप्नांच्या गावा जाते आहे
ही झुळुक मंद वा-याची
काय सुचविते आहे
लहरींवर व्हावे स्वार
हेच याचे निमंत्रण आहे
हा संकेत निसर्गाचा
उमगला का राणी तुजला
आज वसंत आहे फुलला
राजसा ठाउक आहे मजला
राहुल सुदामे
|
निदान तुझ्याकडूनतरी
ज्याच्या खांद्यावर विश्वासानं मान टाकली
त्याच्याकडूनच झिडकारलं जायला नको होतं
निदान तुझ्याकडूनतरी असं व्हायला नको होतं
ज्याच्याबरोबर संसाराचं स्वप्न रंगवलं
त्याच्याकडूनच ते तुटाययला नको होतं
निदान तुझ्याकडूनतरी असं व्हायला नको होतं
ज्या शब्दांवरती मी विसंबून राहिले
त्या शब्दांनीच दगा द्यायला नको होतं
निदान तुझ्याकडूनतरी असं व्हायला नको होतं
माझं सर्वस्व, माझी आठवण म्हणून मी जे तुला दिलं
किमान ते ‘मोरपीस’ तरी तू परत द्यायला नको होतं
निदान तुझ्याकडूनतरी असं व्हायला नको होतं
इतरांनी घरटं तोडलं तर त्याने इजा होणार नाही
पण, स्वत:चंच घरटं तु स्वत:च मोडायला नको होतं
निदान तुझ्याकडूनतरी असं व्हायला नको होतं
राहुल सुदामे
|