ऋण…
आज तुम्ही असता…खंत मनात सलते
यश किर्तीकमान तुम्हाविण उदास भासते…
धरूनि बोट तुमचे सावरली मी पाऊले
पंखातील बळ तुमचे मन आकाशी झेपावले…
मायेचा हात पाठीवर शिस्त कला संस्कार
बुध्दि ज्ञानविश्व सारे तुमच्यातुनि साकारले…
उन्हात तुम्ही उभे मी सावलीत सुखावले
चंदन तुम्ही आजन्म सुगंधात मी बहरले…
आसवे कृतज्ञतेची चरणावर तुमच्या वाहते
वाटचाल यशाची तुमच्या पावलावर ठेवते…
जन्मोजन्मी तुम्हीच मायबाप हीच भावना
मनात जपते राहुनि आजन्म तुमच्या ऋणात…
हेमलता भुरके
|
चांदरात…
थांब जरा थांब जरा थांब जरा तू
अजुनि चंद्र नाही आला माथ्यावर
निज कशी झाली तुला अनावर
नको जाऊस सांगोनि झाला उशीर…
थांब जरा थांब जरा थांब जरा तू
अजुनि अधीर आहेत हे अधर
घे मिटुनि पाकळयात प्रणयभर
नको जाऊनि सोडोनि हात हतातुन…
थांब जरा थांब जरा थांब जरा तू
अजुनि श्वास गुंतुनि आहेत श्वासात
घे सामावुनि मला तुझ्या अंतरात
नको जाऊस सोडोनि ही चांदरात…
हेमलता भुरके
|
सल
अफाट या शहराला शेवट नाही
एका कोप-यात माझा मित्र राहत आहे.
काळाची पाने भराभर उलटून जात आहेत.
मनाच्या कोप-यात अजून तो गात आहे.
दिवसामून दिवस वर्षामगून वर्ष पळत आहे
मित्राचा चेहरा कुठे दिसतो कां मी ते शोधत आहे
धावपळीचे जीवन जबरदस्त शर्यतीचे झाले आहे
आठवणी मागून आठवणी येऊन जात आहे.
मला तो खूप प्रिय आहे हे त्याला माहित आहे
त्याच्या बालपणापासून मी जीवलग मित्र आहे
आम्ही छोटे होतो तव्हा मैत्री आमची दाट होती
मोठे झालो जवळकीची छाया धुसर होत आहे
कळत नाही स्नेहाचा झरा कसा आटत जात आहे
स्मृतीगंध मात्र वा-याच्या झुळकीप्रमाणे येत आहे
उद्या त्याच्याशी संपर्क साधेन रोजच म्हणत आहे
विसरलो नाही तुला असं बोलून दाखवेन म्हणत आहे
उद्या येतो-जातो, काळ पळत आहे. अंतर वाढत आहे
कित्येक योजने दूर अजूनही मनात तो लपून आहे.
पुन्हा एकदा सुखद स्मृतीचा किरण चमकत आहे
रात्रीच्या अंधाराबरोबर हळुहळु विरूनही जात आहे
तार येते काळीज लकाकते तार तुटली आहे
मन कळवळतं मी काय गमावले काय मिळवलं
वेळ निघून गेली आहे मनात सल टोचत आहे.
शहराच्या कोप-यात मित्राचे अस्तित्व संपलं आहे
म्हणूनच सारे संपल्यावर कळत आहे
खूप उशिर झाल्याची खंत मन जाळत आहे
मनात येईल तीच वेळ असते भेटायची
तीच वेळ असते आतला आवाज ऐकायची
काय बोलायचं आहे ते सांगून टाका
भावना मनात लपून ठेवू नका
आपल्या माणसाजवळ इतके पोहचा
की तोच क्षण आपला आहे समजा
उशीर मागे पुसट खूणा कधी ठेवत नाही
वाईट वाटून गेलेला क्षण पुन्हा येत नाही
खोल अंतरंगात सल मात्र रुतत राहतो
कधीच तुम्हाला तो माफ करत नाही
हेमलता चंद्रकांत भुरके
|
मन माझे घर
मन माझे घर
खुले आहे त्याचे द्वार
स्नेहदीप अंतरी
प्रकाशे आरपार
अतिथी सुविचार
मन स्वागतास तयार
अंतरंगी समाधान
राहे साथ सदाचार
मातापित्यांचे संस्कार
मनवस्तुचा आधार
लक्ष्मीची पाऊले
माझ्या उंबऱ्यावर
आत्म्याचे देवघर
तेवे तिथे प्राणज्योत
साधना निरंतर
जपे रामनाम जीवनभर
हेमलता चंद्रकांत भुरके
|