मराठी रसिकांनी पाठवलेल्या ‘कविता’

अनमोल

धन्य तुझी परमेश्वरा
तू दिलेस दोन नयन
आणि म्हणूनच इच्छा धरली मनी की
हे सुंदर जग पाहूनच जाईन
धन्य तुझी परमेश्वरा
तू दिलेस दोन कान
श्रवण करून घ्यावे चांगले तेवढे
आणि द्यावे त्याचे इतरांना ज्ञान
धन्य तुझी परमेश्वरा
तू दिलेस दोन कर
कष्ट केले तयांनी तर
मिळते खाया पोटाला पोटभर
धन्य तुझी परमेश्वरा
तू दिलेस दोन पाय
पांगूळगाडयावरी पाहूनी अपंगा
मन हेलावून जाय
धन्य तुझी परमेश्वरा
तू दिलेस हे अनमोल जीवन
आणि म्हणूनच जोडोनी दोन्ही कर
होऊनी नतमस्तक
करिते तूला मी वंदन

सौ. मनिषा नवले
पुणे

यश – अपयश

यश अपयश या आहेत
एकाच नाण्याच्या दोन बाजू
तरीसुध्दा यशाने माणूस होतो आनंदी
तर अपयशाने लागतात डोळे अश्रूंनी भिजू
अपयश हे पचवायला असते अवघड
पण यश सुध्दा होते कधी कधी डोईजड
अपयश हीच असते खरी
यशाची पहिली पायरी
त्यासाठी नसते ठेवायची आपली भूमिका दुहेरी
अपयशाला मानले जर आपला गुरू
तर तिथूनच होईल तुमचे यश सुरू
यश मिळवायचे असेल तर
असावे आपल्या मतांवर ठाम
आणि त्यासाठी ठेवावी लागते जिद्द
करण्याचे कुठलेही कठीण काम
म्हणूनच सांगते तुम्हा सर्वांना
अपयशाने नाही गेलात डगमगून
तर तुमचे जिवन निघेल
लक्ष लक्ष यशदिपांनी झगमगून

सौ. मनिषा नवले
पुणे

सुनामी लाटा

निसर्गाचे चक्र चालू राहते सदा
पण कधी कधी समुद्रालाही येतो राग
कारण त्याच्या भावनांना पण असते मर्यादा
त्यातून होतो जेव्हा समुद्रात भूकंप
तेव्हा तयार होतात मोठया लाटा
त्या आदळतात जेव्हा येऊन किनाऱ्यावर
तेव्हा मागे उरत नाही काहीच धरतीवर
ज्या समुद्राने दिले होते जीवनदान
त्याच्याच लाटांनी मागितले मासेमारांना बलिदान
निसर्गाच्या या कोपापासून
नाही झाली कुणाची सुटका
आपल्या माणसाच्या शोधामध्ये
घालवत आहे लोक घटका
शौर्याने काही जणांनी केली
ह्या संकटावर मात
तरीसुध्दा या भयानक घटनेची
मनातून भिती नाही जात
या भयानक घटनेने केले
कितीतरी जणांना बेघर
म्हणूनच भिती बसलीय मनांमध्ये
जर आपल्यावर ही वेळ आली असती तर?
ह्या लाटांना दिले नाव सुनामी
जिने केली सर्वांची ह्रदयं जखमी
माय बापाविना पोर
कुणाचे हरवले यात पोर
म्हणूनच त्याचे दु:ख साऱ्या जगा झाले फार
शक्ती देवो देव त्यांना
दु:ख मोठे पचविण्याची
आस आहे त्यांना, आमच्या मदतीची
केली मदत त्यांना सढळ हाताने
देतील दुवा तुम्हा ते हसत मुखाने
आज आपल्या मायेची
यांना गरज आहे फार
कारण त्याना करायचा आहे
दु:खाचा सागर मोठा पार
कित्येकांचे संसार केले
या लाटेने उध्वस्त
त्यांना आपल्या मदतीची
गरज आहे जास्त
अशी वेळ देवा कुणावरही ना येवो
समुद्रातून मिळालेल्या दु:खांना
सावरणारी त्यांची नौका पार होवो

सौ मनिषा नवले
पुणे

शहरी रस्ते

शहरातील रस्त्यावर असतो गजबजाट
त्याच्यावर वाहने धावतात सतराशे साठ
प्रत्येकजण इथे चालतो आपल्याच चालीने
रस्ता फक्त माझ्यासाठीच आहे ह्या जाणिवेने
वाहतुकीच्या नियमांना त्यांना बसवायचे असते धाब्यावर
पण कधी कधी रस्त्यावरची मस्ती बेतते जीवावर
आजकालच्या तरुणांना गाडी वाटते साधन शाईनिंगचे
‘मी’ही नाही कुठेच कमी हे इतरांना असते दाखवायचे
त्यातच हल्ली प्रत्येकाच्या हातात असतो मोबाईल
गाडी बाजूला घेऊन बोलले तर शाईनिंग तुमची का जाईल?
त्यातच बस ड्रायव्हरचा असतो वेगळाच बाणा
अपघात करायचा जणू खात्याने दिला आहे परवाना
खाजगी वाहतूकदारांची असते घाई गाडीत माणसे कोंबायची
भिती त्यांना नसते कारण मधे कुणी अडवायची
रिक्षावाले मारतात बाजूने कट
तर सायकलवाला वळतो न दाखवता हात
कुणास ठाऊक कूठली शर्यत जिंकून
करायची असते कुणावर मात?
प्रत्येकजण असतो आपल्याच दुनियेत गोल
केव्हा समजणार यांना परमेश्वराने दिलेल्या जीवाचे मोल

सौ मनिषा नवले
पुणे